‘या’ जिल्ह्यांना अजूनही पाणीटँकरचा पाणीपुरवठा
हिंगोली : मागील महिन्यात उन्हाच्या कडाक्यात अनेक गावांना पाणीटंचाईच्या (Water Crisis) समस्यांना सामोरे जावे लागत होते. महिलांना ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी वणवण करावी लागत होती. मात्र आता जून महिन्याला सुरुवात झाली असून मान्सूनचेही (Monsoon) आगमन झाले आहे. पावसामुळे नागरिकांना उन्हाच्या काहीली पासून काहीसा दिलासा मिळाला आहे. परंतु अजूनही अनेक गावांना पाणीबाणीच्या समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे दिसून येत आहे.
मराठवाड्यात आजही टँकरने पाणीपुरवठा
दुष्काळी मराठवाड्यात यावर्षी मान्सून एक दिवस आधीच दाखल झाला. छत्रपती संभाजीनगरसह सर्वच मराठवाड्यात हा पाऊस धो-धो बरसला. पहिल्याच पावसात नद्या-नाले ओसंडून वाहू लागले. तर काही ठिकाणी नद्यांना पूर देखील आला. त्यामुळे पहिल्याच पावसात मराठवाड्यात पाऊसपाणी झाले. एकीकडे असे चित्र असताना आजही मराठवाड्यातील टँकरची संख्या कमी झालेली नाही. त्यामुळे ही टँकर लॉबी तर नाही ना, असा प्रश्न नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
पावसाळा सुरू होऊनही जिल्ह्यात १० टँकर सुरू
जून महिना लागून जवळपास दहा दिवस झाले. या महिन्यात चांगला दमदार पाऊस होऊनही पाणीटंचाई कायम आहे. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील अनेक गावांना पाणीपुरवठा करण्यासाठी टँकर सुरू करण्यात आले आहेत. गावात दररोज टँकर येऊन त्यातील प्रत्येक घराला १५ घागर पाणी मिळते. नागरिकांना याच पाण्यामधून पिण्याच्या पाण्यासह इतर कामासाठी देखील वापर करावा लागत आहे. नागरिकांना पावसाळा सुरु झाल्यावर पाणीटंचाई भासणार नाही असे वाटत होते, मात्र अजूनही नागरिकांना पाणीटंचाईच्या झळा सोसाव्या लागत असल्यामुळे तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
‘या’ शहरात पाणीटँकरने पाणीपुरवठा
- छत्रपती संभाजीनगर येथे ५५५ गाव वाड्यांवर ७४१ टँकर सुरू आहेत.
- जालना ४७५ गाव वाड्यांवर ५४२ टँकर सुरू आहेत.
- बीड ७३९ गाव वाड्यांवर ४६८ टँकर सुरू आहेत.
- परभणी ३२ गाव वाड्यांवर ३३ टँकर सुरू आहेत.
- हिंगोली १० गाव वाड्यांवर १० टँकर सुरू आहेत.
- नांदेड ४० गाव वाड्यांवर ३९ टँकर सुरू आहेत.
- धाराशिव १०२ गाव वाड्यांवर १५० टँकर सुरू आहेत.
- लातूर ४७ गाव वाड्यांवर ४१ टँकर सुरू आहेत.
दरम्यान, गेल्या काही वर्षात मराठवाडा दुष्काळ आणि टँकर हे एक जणू समीकरण बनले आहे. यातूनच टँकर लॉबी सारखा प्रकार समोर आल्याचे अनेकदा पाहायला मिळाले. त्यामुळे धो धो पाऊस पडूनही मराठवाड्यातील दुष्काळ कधी मिटणार हे पाहणे महत्वाचे असणार आहे.