Thursday, June 19, 2025

तळीयेतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तळीयेतील दरडग्रस्तांच्या पुनर्वसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर

तळीयेवर दरडीची टांगती तलवार कायम; २७१ पैकी केवळ ६६ कुटूंबांचे पुनर्वसन


महाड : महाड तालुक्यातील तळीये गावातील कुटूंब आजही दरडींच्या छायेखाली वावरत आहेत. म्हाडाच्या माध्यमातून सुरू असलेले पुनर्वसनाचे काम अतिशय संथ गतीने सुरू असून तीन वर्षात २७१ पैकी केवळ ६६ घरांचा ताबा देण्यात आला आहे. तर तळींये गावच्या उर्वरीत सर्व वाड्यांचे पुर्नवसन आजही बाकी असून हे दरडग्रस्त ग्रामस्थ आजही दरडींच्या छायेत गावातील घरात रहात आहेत. आपले पुनर्वसन केंव्हा होणार, असा प्रश्न तळीये ग्रामस्थांकडून विचारला जात आहे. पावसाळ्याला सुरुवात झाली असल्याने तळीयेतील दरडग्रस्तांच्या पुर्नवसनाचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.


महाड तालुक्यातील तळीये गावावर २२ जुलै २०२१ रोजी दरड कोसळली होती. या दुर्घटनेत गावातील ८७ जणांचा बळी गेला. त्यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्यासह अनेक मंत्र्यांनी गावाला भेट देवून पाहणी केली. यानंतर गावाच्या पुनर्वसनाची जबाबदारी शासनाने घेतली होती. म्हाडाच्या माध्यमातून संपुर्ण गावाचे पुनर्वसन करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यासाठी भूसंपादन करून सुरूवातीला घरांचे काम वेगात सुरू झाले. नंतर मात्र हे काम मंदावले. झालेल्या कामांच्या दर्जाबाबत ग्रामस्थांनी अनेकदा शंका उपस्थित केल्या.


तळीयेच्या सात वाड्यांमधील २७१ कुटुंबांचे पुनर्वसन करण्याचा निर्णय झाला होता परंतु आज तीन वर्षात रडतखडत केवळ ६६ कुटुंबांना निवारा मिळाला आहे. लोणेरे येथे झालेल्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत या घरांच्या चाव्या दरडग्रस्त कुटुंबाना सुपूर्द करण्यात आल्या. उर्वरीत कुटुंबांपैकी काही कुटुंब कंटेनर शेडमध्ये तर बरीचशी कुटुंबे अद्यापही गावातच आपल्या जुन्या घरात रहात आहेत. सध्या दुसऱ्या टप्यातील घरांची कामे सुरू आहेत. मात्र हे काम कासवगतीने सुरू आहे. तळीये गावच्या सातही वाड्यांसाठी २०० हून अधिक घरे उभी करायची असली तरी तेथे कामगारांचा राबता दिसत नाही. मोजक्याच कामगारांच्या मदतीने हे काम केले जात आहे. हे काम असेच सुरू राहिले तर पुढील दोन वर्षात तरी ही घरे पूर्ण होतील का अशी शंका दरडग्रस्त कुटुंबे व्यक्त करीत आहेत. ज्या ६६ दरडग्रस्तांना घरांचा ताबा दिला आहे त्या घरांचा दर्जा किती चांगला आहे हे यावर्षी च्या पावसाळ्यात स्पष्ट होईल



तीन वर्षांनंतर देखील पुनर्वसन अपुर्णच


तळीये गावला सात वाड्या आहेत. कोंडाळकर वाडीवर दरड कोसळल्यानंतर शासनाने भुगर्भ शास्त्रज्ञांमार्फत संपूर्ण तळीये गावचा सर्वे करून घेतला. या सर्वे नुसार संपूर्ण तळीये गावाला म्हणजे तळीये गावच्या सातही वाड्यांना दरडीचा धोका असल्याचे सांगण्यात आले. त्या नुसार शासनाने तळीये गावच्या दरडीखाली गाडल्या गेलेल्या कोंडाळकर वाडी सह बौध्दवाडी, चर्मकारवाडी, शिंदेवाडी, कुंभेनळी, खालचीवाडी आणि मधली वाडी या सातही वाड्यावरील २७१ कुटूंबांचे पुर्नवसन करण्याचा निर्णय घेतला. दरड दुर्घटनेनंतर आज तीन वर्षात केवळ कोंडाळकर वाडीच्या पुनर्वसनासाठी घर बांधुन झाली आहेत तर तळीये गावच्या उर्वरीत सहा वाड्यांवरील २०५ कुटूंब आजही दरडींच्या भितीने डोंगराच्या कुशीत रहात आहेत.

Comments
Add Comment