
केंद्रातही मंत्रीपद मिळणार?
नवी दिल्ली : बारामती लोकसभा मतदारसंघात (Baramati Lok Sabha) अजित पवार (Ajit Pawar) यांच्या पत्नी सुनेत्रा पवार (Sunetra Pawar) यांचा सुप्रिया सुळेंकडून (Supriya Sule) पराभव झाला. या पराभवानंतर सुनेत्रा पवार यांनी संसदेत बॅकडोअर एन्ट्री घेतली आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावावर राष्ट्रवादीकडून राज्यसभेच्या खासदारकीसाठी (Rajyasabha MP) उमेदवार म्हणून शिक्कामोर्तब करण्यात आलं. यानंतर त्यांनी आज उमेदवारी अर्ज भरला आणि त्या बिनविरोध निवडून आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांची काल रात्री उशिरा देवगिरी निवासस्थानी बैठक पार पडली आणि या बैठकीमध्ये सुनेत्रा पवार यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आलं. त्यानंतर विधानभवनात जाऊन सुनेत्रा पवारांनी अर्ज दाखल केला. सुनेत्रा पवार यांच्या व्यतिरिक्त कोणाचाही राज्यसभेच्या जागेसाठी अर्ज न आल्याने त्या बिनविरोध खासदार म्हणून निवडून आल्या आहेत.
खासदारकी जाहीर झाल्यानंतर सुनेत्रा पवार म्हणाल्या, 'पक्षाने मला आज अधिकृत उमेदवारी दिली आहे. पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार, कार्याध्यक्ष, कार्यकर्ते व पक्षातील सर्व नेत्यांचे मी आभार मानते. मी दिलेल्या संधीचं सोनं करेन. लोकसभेच्या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली होती. या उमेदवारीचीही जनतेतून मागणी करण्यात आली आहे. माझ्यावर जो विश्वास पक्षाने दाखवला आहे. त्यांचे मी आभार मानते', अशा भावना सुनेत्रा पवार यांनी व्यक्त केल्या.