पेण : प्रवाशांच्या सेवेकरिता असे ब्रीदवाक्य असलेल्या एसटीने प्रवाशांना मात्र आर्थिक भुर्दंड देण्याचा निर्णय पुन्हा एकदा घेतला आहे. खाजगी हॉटेल्स व ढाब्यांवर एसटीला थांबा दिल्याने प्रवाशांची लूट होते.. या निर्णयामुळे प्रवाशांना चढ्या दराने खाद्यपदार्थ विकत घ्यायला लागत असल्याने त्यांच्या खिशाला फटका बसत आहे. तर दुसरीकडे एसटी स्थानकामध्ये भाड्याने दिलेल्या स्टॉल व कॅन्टीन प्रवासी ग्राहकांवीना ओस पडल्याने व्यवसाय शेवटची घटका मोजत आहेत.
या अन्यायकारक निर्णयाविरोध यापूर्वीही प्रवाशांनी वृत्तपत्रांच्या माध्यमातून आवाज उठवल्याने एसटी प्रशासनाने काही दिवसांकरिता या खाजगी हॉटेल्स व ढाब्यांवरील एसटीचे थांबे बंद केले होते. परंतु राज्य परिवहन महामंडळाच्या अधिकारी व ढाबे मालकांच्या अर्थपूर्ण संबंधामुळे पुन्हा ढाब्यांवर एसटी थांबविण्याचा निर्णय घेऊन प्रवाशांवर अन्याय केला आहे.
गोरगरिबांची लालपरी म्हणून ओळख असलेल्या एसटीबरोबर सर्वसामान्य प्रवाशांची नाळ जोडलेली आहे. एसटीचा प्रवास स्वस्त, सोयीचा व सुरक्षित असल्याने सर्वसामान्य नागरिक एसटीच्या प्रवासाला पसंती देतात. परंतु एसटी महामंडळाने पेण तालुक्यातील हॉटेल मिलन, हॉटेल तरणखोप, शालीमार हॉटेल आदी महामार्गावरील हॉटेलांवर एसटी थांबवण्याची परवानगी दिली आहे.
यामुळे टेंडरचे हजारो रुपये भरूनही एसटी महामंडळाच्या अल्पोपहार केंद्रावर गाडी थांबत नसल्याने या केंद्रांवर आता सन्नाटा दिसू लागला. तर खाजगी हॉटेल्सची चंगळ दिसून येते. एस.टी.चे महागड्या हॉटेलवरील थांबे हे प्रवाशांना डोकेदुखी ठरत आहे.
ज्या एसटी गाड्यांना परवानगी नाही त्या गाड्या सुद्धा अर्थपूर्ण संबंध जपण्याकरिता या ढाब्यांचा आश्रय घेतात. हॉटेल चालक व एसटी कर्मचारी त्यांच्यात आर्थिक हितसंबंध गुंतल्याने एसटी कर्मचारी पॅसेंजरला लघुशकेंकरीताही एसटी स्टँडमध्ये उतरू देत नाही. ढाब्यावर एक तास गाडी थांबते तर एसटी स्टँडला केवळ गाडीची नोंद करण्याकरीताच थांबते. खाजगी हॉटेल्सचे थांबे बंद करून महामंडळाच्या एसटी स्थानकातील मान्यता दिलेल्या खानावळ, अल्पोपहार गृहात प्रवाशांना स्वस्त व उत्तम प्रकारचे पदार्थ देण्याची व्यवस्था करावी अशी मागणी प्रवासीवर्ग करीत आहे.
पेण येथील रामवाडी एसटी डेपोत असलेल्या कॅन्टीनला १ लाख १० हजार रुपये भाडे आहे, तर दोन पैकी एका जनरल स्टोअरला सुमारे २० हजार तर दुसऱ्या स्टोअरला १२ हजार, फ्रुट स्टॉलला सुमारे ४० हजार, चिक्की स्टॉलला सुमारे २० हजार, झुणका भाकर केंद्राला ७५ हजार अशी भाडे आहेत. येथे आठ फेरीवाले विक्रेते कार्यरत होते.
एसटी महामंडळाला एवढे उत्पन्न असताना देखील एसटी प्रशासनाने केवळ १३५ रुपये प्रति एसटी या दराने एसटी गाड्यांना खाजगी हॉटेल ढाब्यांवर थांबण्याची परवानगी दिली आहे. हीच रक्कम शिवशाहीकरिता १८० रुपये आहे. त्यामुळे एसटी स्थानकामधील अधिकृत व्यावसायिकांना ग्राहक मिळत नसल्याने धंदा बंद करण्याची पाळी आली आहे.
पेण रामवाडी येथील एक जनरल स्टॉल व एक फ्रुट स्टॉल तसेच पेपर स्टॉल हे तीन स्टॉल ग्राहक नसल्याने बंद झाले आहेत. ४ फेरीवाल्यांनी सुद्धा व्यवसाय बंद केला. त्याचप्रमाणे कॅन्टीन व इतर व्यवसाय ही बंद होण्याच्या मार्गावर आहे.
प्रवाशांनी त्यांच्या होण्याला लुटीच्या विरोधात आवाज उठवल्यानंतर अधिकारी थातूरमातूर कारवाई करतात. कोकणात प्रवासी गणपती ते दिवाळीपर्यंत व मार्च ते जून पर्यंत प्रवास करणाऱ्या प्रवाशांची संख्या जास्त असते आणि याच वेळेत ढाब्यांना परवानगी देऊन अधिकारी वर्ग स्वतःचा उखळ पांढरे करून घेतात. एसटी कॅन्टीन व स्टॉलच्या तुलनेने हॉटेल्सवर चढ्या भावाने खाद्यपदार्थांची विक्री केली जाते. एसटीच्या अल्पोपहार केंद्रात चहा १० रुपये तर वडापाव १५ रुपयांना मिळतो. तर खाजगी हॉटेल व ढाब्यांवर चहा १५ ते २० रुपये व वडापाव २० ते २५ रुपयांना मिळतो. अनेक वेळेला धाब्यांवर नाश्ता उपलब्ध नसल्याचे सांगून भाजीची डिश व रोटी प्रवाशांना घ्यावी लागते व त्याकरिता एकूण २५० ते ३०० रुपये खर्च होतात.
पनवेल – पेण प्रवासाला १ तास लागतो. परंतु ढाब्यावर जेवणाकरीता गाडी थांबल्याने एक तासाच्या प्रवाशाला दोन तास लागतात. त्यामुळे अनेक प्रवासी एसटीने प्रवास करण्याचे टाळून विक्रम, इको तसेच खाजगी वाहनाने प्रवास करण्याला पसंती देतात. यामुळे एसटी महामंडळाला मात्र आर्थिक फटका बसत आहे. – दीपक मोकल, प्रवासी-रामवाडी
कोलकाता: इंडियन प्रीमियर लीग २०२५मध्ये कोलकाता नाईट रायडर्सचा गुजरात टायटन्सविरुद्ध लाजिरवाणा पराभव झाला आहे. गुजरातने…
२४ एप्रिलला एकनाथ शिंदे यांची शक्तिप्रदर्शन सभा! सिंधुदुर्ग : राज्याचे उपमुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ…
माजी नगरसेवक राकेश कांदे यांचा वैभव नाईकांना थेट इशारा सिंधुदुर्ग : चेंदवण येथील सिद्धिविनायक उर्फ…
लहान नाल्यातील गाळ काढण्यापूर्वीचे आणि नंतरचे सीसीटीव्हीद्वारे चित्रीकरण मुंबई (खास प्रतिनिधी): पावसाळापूर्व कामांचा भाग म्हणून…
PM Modi : आजची धोरणे, निर्णय पुढील हजार वर्षांच्या भविष्याला आकार देणार आहेत : पंतप्रधान…
World Earth Day 2025: आपली शक्ती, आपला ग्रह - विश्व पृथ्वी दिन २०२५ मुंबई :…