जम्मू : जम्मू आणि काश्मीरच्या कथुआ जिल्ह्यात दहशतवाद्यांबरोबरच्या चकमकीत केंद्रीय राखीव पोलीस दलाचा जवान शहीद झाला. मंगळवारी रात्रीपासून ही चकमक सुरू असून, यात दोन्ही दहशतवाद्यांना ठार करण्यात आले आहे.
जम्मूपासून ६० किमी अंतरावर आंतरराष्ट्रीय सीमेनजीक सईदा सुखेल खेड्यात घुसलेल्या दहशतवाद्यांविरोधात लष्कर व केंद्रीय राखीव पोलीस दलाने मोहीम हाती घेतली आहे.
सुरक्षा दलांवर या दहशतवाद्याने पहाटेच्या सुमारास अंदाधुंद गोळीबार केला. त्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे जवान कबीर दास हे गंभीर जखमी झाले होते. बुधवारी उपचार सुरू असताना त्यांचे निधन झाले.
प्रत्युत्तरादाखल पोलिसांनी केलेल्या गोळीबारात दोन अतिरेकी ठार झाले. घटनास्थळी मोठा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. परिसरात आणखी काही दहशतवादी लपले असल्याच्या शक्यतेने शोधमोहीम सुरू आहे.
शहीद जवान कबीर दास यांनी या मोहिमेत अतुलनीय शौर्य दाखविल्याचे अतिरिक्त साहाय्यक पोलीस महासंचालक आनंद जैन यांनी स्पष्ट केले. ठार झालेले दोन्ही दहशतवादी हे पाकिस्तानी नागरिक असल्याचा संशय आहे. गोळीबारात एक नागरिक जखमी झाला.