पंतप्रधान मोदींचे सुरक्षा यंत्रणांना निर्देश
नवी दिल्ली (वृत्तसंस्था) : काश्मीर खोऱ्यामध्ये गेल्या काही दिवसांपासून दहशतवाद्यांनी डोके वर काढण्यास सुरुवात केली आहे. काही दिवसांपूर्वी शिवखोडीला जाणाऱ्या बसवर दहशतवाद्यांनी गोळीबार केला होता, ज्यात १० जणांचा मृत्यू झाला होता. हा भाग इतरांच्या तुलनेत सुरक्षित मानला जात होता आणि तिथे दहशतवादी हल्ल्याच्या घटना देखील घडत नव्हत्या. मात्र या घटनेनंतर चित्र बदललं आणि सुरक्षा दलाने या भागात शोध मोहिम अधिक तीव्र केली. ही घटना ताजी असतानाच दहशतवादी हल्ल्याच्या आणखी चार घटनांनी जम्मू काश्मीर हादरलं आहे. या घटनानंतर आता केंद्र सरकारने तिथल्या परिस्थितीचा आढावा घेण्यास सुरुवात केली. पंतप्रधानांनी जम्मू-काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांच्याशीही बोलून तिथल्या परिस्थितीचा आढावा घेतला.
गेल्या काही दिवसांत जम्मू-काश्मीरमध्ये अनेक दहशतवादी हल्ले झाले आहेत. गेल्या चार दिवसांत रियासी, कठुआ आणि डोडा जिल्ह्यात दहशतवाद्यांनी चार ठिकाणी हल्ले केले असून त्यात नऊ यात्रेकरू आणि एक सीआरपीएफ जवान ठार झाला आहे. सात सुरक्षा कर्मचारी आणि अनेक जण जखमी झाले. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी जम्मू-काश्मीरमधील सुरक्षा परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बैठक घेतली. या बैठकीत नायब राज्यपाल मनोज सिन्हा, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल आणि इतर अधिकारीही सहभागी होते. यावेळी पंतप्रधानांना जम्मू-काश्मीरमधील परिस्थितीची माहिती देण्यात आली.
बैठकीदरम्यान, पंतप्रधान मोदींनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना भारताची दहशतवादविरोधी क्षमता पूर्णपणे तैनात करण्याचे आवाहन केले. तसेच गृहमंत्री अमित शाह यांच्याशी सुरक्षा दल तैनात करण्याबाबत आणि दहशतवादविरोधी कारवायांबाबतही चर्चा केली. तसेच पंतप्रधान मोदींनी सुरक्षा यंत्रणा आणि इतर यंत्रणांना दहशतवाद्यांना पूर्ण क्षमतेने प्रत्युत्तर देण्याचे स्पष्ट निर्देश दिले आहेत. आपल्यायाकडे जी काही संसाधने उपलब्ध आहेत, ती दहशतवाद्यांशी सामना करण्यासाठी वापरली जावीत, असेही पंतप्रधानांनी सांगितले.
जम्मू काश्मीरमध्ये तीन दिवसांत चार वेळा दहशतवादी हल्ले आणि चकमकी झाल्यानंतर विविध जिल्ह्यांमध्ये पोलिस आणि निमलष्करी दलाच्या जवानांकडून मोठी शोधमोहीम राबविली जात आहे. तपास नाक्यांवर वाहनांची तपासणी सुरू असून संशयितांची चौकशी केली जात आहे. एका महिलेने केलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी दोन संशयितांना अटकही केली आहे. दहशतवाद्यांनी मागील तीन दिवसांमध्ये रिआसी, कथुआ, दोडा या जिल्ह्यांमध्ये दहशतवाद्यांनी हल्ले केले होते. जवानांच्या गोळीबारात दोन संशयित दहशतवादीही मारले गेले होते. जवानांनी कथुआमधून मोठ्या प्रमाणावर शस्त्रसाठाही हस्तगत केला आहे. या मोठ्या घडामोडींमुळे सुरक्षा दले सावध झाली आहेत. लष्कर, निमलष्कर आणि पोलिसांनी दोडा जिल्ह्यातील तीन गावांमध्ये आज मोठ्या प्रमाणावर शोधमोहिम राबविली. याच गावांमध्ये झालेल्या चकमकीत सात जवान जखमी झाले होते. पोलिसांनी चार दहशतवाद्यांची रेखाचित्रेही जारी केली असून त्यांचा ठावठिकाणा सांगणाऱ्यास २० लाख रुपयांचे इनाम जाहीर केले आहे. राजौरी जिल्ह्यातील नौशेरा भागातही पोलिसांनी काही ठिकाणी छापे घातले. कथुआ, सांबा आणि जम्मू जिल्ह्यातील पोलिसांना सावध राहण्याचा इशारा देण्यात आला आहे.