माझे कोकण: संतोष वायंगणकर
लोकसभा निवडणुका पार पडल्या. देशात, महाराष्ट्रात जनतेने त्यांच्या मनामध्ये जे होते ते केले आणि ज्यांना बहुमत मिळाले ते निवडून आले. लोकशाही प्रक्रियेमध्ये नेहमीच जो जिता वही सिकंदर. यश आणि अपयश या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. यश मिळालं की त्याला बाप हजार, मात्र अपयशाची जबाबदारी स्वीकारायला कधीच कोणी पुढे येत नाही. भाजपाला, महायुतीला महाराष्ट्रात जे अपेक्षित यश मिळाले नाही, त्याची जबाबदारी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री आणि भाजपा नेते देवेंद्र फडणवीस यांनी स्वीकारली. राजकारणामध्ये नेहमीच यश मिळेल असे नाही. यश-अपयश हा पाठशिवणीचा खेळ असतो. प्रत्येकालाच नेहमीच यशस्वी होता येते असे नाही. फार थोड्यांच्या आयुष्यात असा ‘राजयोग’ असतो. नारायण राणे हे असं महाराष्ट्राच्या राजकारणातलं नावं आहे, जेव्हा राणे विरोधकांना वाटतं की राणे आता संपले आणि त्याचवेळी नारायण राणे नव्या उमेदीने नवीन डाव मांडून उभे ठाकलेले असतात. तेव्हा मग मात्र खासगीत चर्चा केली जाते. नाही यांच(राणें) काही खरं नाही. ते काहीही होऊ शकतात. २०१४ नंतर आता सिंधुदुर्गात राणेंचं अस्तित्व संपलं म्हणत असताना कोकणातील ग्रामपंचायत, जिल्हा बँक, नगरपालिका, नगरपंचायत अशी सर्व सत्तास्थानं राणेंवर विश्वास दाखवत त्यांच्याकडे सोपवली.
नगरसेवक, बेस्ट चेअरमन, आमदार, मंत्री, मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, राज्यसभा सदस्य, केंद्रीय मंत्री, लोकसभा खासदार अशा सर्व पदांवर काम करताना प्रत्येक पदाला केवळ न्याय दिला असं नव्हे तर त्या त्या पदाचा उपयोग सर्वसामान्य जनतेला, कोकणातील जनतेला कसा होईल यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. लोकसभा निवडणुकीत मुंबईत बेस्टमध्ये नोकरीला असलेले सेवानिवृत्त झालेले असे काही कर्मचारी त्यांच्या प्रचारार्थ आले असता मला भेटले. त्यांनी राणेसाहेब बेस्ट चेअरमन असतानाच्या अनेक आठवणी सांगितल्या. १९८८ मध्ये बेस्ट कर्मचाऱ्यांना वेतन फारच कमी होते. राणेसाहेबांनी दुप्पट वेतन देऊन कर्मचाऱ्यांना धक्काच दिला. अनेक चांगले निर्णय तर घेतलेच; परंतु कोकणातील हजारो तरुणांना बेस्टच्या सेवेत ठेवले. १९९० मध्ये आमदार झाल्यावरही असंच सेवाभावी काम केलं. १९९५ साली पशुसंवर्धन व दुग्धविकास मंत्री झाल्यावर महानंदामध्ये कोकणातील शेकडोंनी तरुणांना नोकरीत ठेवले. तत्पूर्वी काँग्रेस नेते पुण्याचे अनंतराव थोपटे दुग्धविकास मंत्री असताना पुण्याची ट्रक भरून माणसं आणून महानंदामध्ये नोकरीला ठेवल्याचे ऐकलं होतं.
राणेंचा कामाचा धडाका हा पश्चिम महाराष्ट्रातील नेत्याला लाजवेल किंवा त्याच्याशी स्पर्धा करेल अशा पद्धतीने त्यांची कार्यपद्धती राहिली आहे. महाराष्ट्र विधानसभेत विरोधी पक्षनेते म्हणून काम करतानाही त्यांनी पूर्वीच्या विरोधी पक्षनेत्यांपेक्षा स्वत:ची रेषा कार्यकर्तृत्वाने, अभ्यासूवृत्तीने अधिक मोठी करून ठेवली. अर्थसंकल्पावरील भाषणं तर सत्ताधाऱ्यांना घाम फोडणारी होती. आकडेवारी मुखोद्गत असणं आणि विधिमंडळात त्याची मांडणी करताना सभागृहाला अवाक् करणं ही तशी सोपी गोष्ट निश्चितच नव्हती आणि नाही. राष्ट्रवादी काँग्रेसचे जयंत पाटील अर्थमंत्री असताना आता राणे काय बोलणार, त्यांना उत्तर कसं देणार या चिंतेत आ. जयंत पाटील असायचे; परंतु एकीकडे विधिमंडळात सत्ताधाऱ्यांना धारेवर धरणारे राणे दुसरीकडे मात्र जयंत पाटील यांनी सुटाबुटातच कोट घालूनच विधिमंडळात यावं यासाठी तशी व्यवस्था करणारे, मैत्रीला जागणारे नारायण राणे आहेत. किस्सा दस्तुरखुद्द राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष आ. जयंत पाटील यांनीच जाहीरसभेतून सांगितला आहे.
विरोधी पक्षनेते असताना मुख्यमंत्री विलासराव देशमुख यांची दमछाक करतानाही त्यांच्याशी असणारा मैत्रीचा स्नेहही त्यांनी तितकाच जपला होता. राणे मुख्यमंत्री झाले. त्यांना फक्त ८ महिन्यांचा कालावधी मिळाला; परंतु कोकणचा मोठा ‘बॅकलॉग’ त्यांनी संधी मिळताच भरून काढला. त्यानंतरही त्यांना मंत्रीपदाची संधी मिळाली. काहीकाळ विधान परिषद सदस्य, नंतर राज्यसभा सदस्य झाल्यावर केंद्रीय मंत्री म्हणून महाराष्ट्राला जे आणता येईल, देता येईल ते करण्याचा त्यांचा प्रयत्न राहिला. राणेंना विकासकामांसाठी मंत्रीपद हवेच असं नाही. नारायण राणे हे नावच खूप मोठं आहे. कोणत्याही विकासकामांची जेव्हा राणेंकडून मागणी होईल तेव्हा समोर मंत्री कोणीही असेल, समोरच्या मंत्र्याकडून नाही हा शब्दच येणार नाही. याचे कारणही तसेच आहे. जेव्हा जेव्हा नारायण राणे कोणत्याही पदावर असतात, मंत्री असतात तेव्हा कोणाचीही जात, धर्म, पक्ष न पाहता समोर येणाऱ्याचं काम करणं, त्याला मदत करणं ही राणेंच्या स्वभावाची खासियत आहे.
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीतही निवडणूक लढविण्यासाठी नारायण राणे फार उत्सुक नव्हते; परंतु भारतीय जनता पार्टीकडून उमेदवारी नारायण राणे यांनीच करावी असा आग्रह पक्षाच्या वरिष्ठांनी केला आणि महायुतीतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजितदादा पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अशा सर्वांच्या आग्रहामुळे राणेंनी ही निवडणूक लढवली. निवडणूक असो की आणखी काही कोणत्याही गोष्टीला सामोरे जाताना राणे कधी डगमगत नाहीत. पूर्ण आत्मविश्वासाने सामोरे जातात आणि समोरच्याला वाटतं आपणच जिंकणार तेव्हा राणे जिंकून मोकळे झालेले असतात. मी जिंकणारच हा प्रचंड आत्मविश्वास घेऊनच ते सामोरे जातात. ४ जूनला मतमोजणी केंद्रात सकाळी ८ वाजता नारायण राणे उपस्थित झाले. त्यावेळीही अत्यंत शांत, स्मितहास्य करीत आपण जिंकणारच हा विश्वास घेऊनच त्यांची मतमोजणी केंद्रात एण्ट्री झालेली.
राजकीयदृष्ट्या विचार करताना मुंबई महानगरपालिकेत नगरसेवक, कोकणातून आमदार, विधान परिषद सदस्य, राज्यसभा सदस्य, लोकसभेत खासदार म्हणून विजयी होणे हे खरंतर नारायण राणे यांचे राजकीय वर्तुळ पूर्ण झाले आहे. यातलं काहीच त्यांना सहज मिळालं नाही. संघर्ष करावाचं लागला; परंतु त्या प्रत्येक पदावर नारायण राणे हेच नाव कोरलेलं होतं. म्हणूनच यश त्यांचा पाठलाग करत राहिलं. केंद्रीय मंत्रिमंडळ स्थापन झालं तेव्हा नारायण राणे मंत्रिमंडळात नाहीत. त्यावर एका गावखेड्यातल्या सामान्य शेतकऱ्यांने अशी व्यक्त केलेली भावना. आमचे दादा मंत्री झाले, तर आमका आनंदच आसा. पण मंत्री नसले तरीच आमका नारायण राणे या नावचं आमच्यासाठी खूप मोठा आसा. आमचा खयचा काम कधी थांबाचा नाय आणि अडाचा नाय. ही त्या शेतकऱ्यांची प्रतिक्रिया नारायण राणे यांच्या कार्यकर्तृत्वावर कोकणच्या जनतेचा असणारा विश्वास जसा अधोरेखित करणारा आहेच; परंतु त्यांचा मोठेपणाही दाखवून देणारा आहे.