Tuesday, November 5, 2024
Homeताज्या घडामोडीMumbai Rain : मुंबईकरांनो काळजी घ्या! पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

Mumbai Rain : मुंबईकरांनो काळजी घ्या! पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता

‘या’ तारखेनंतर अतिमुसळधार पाऊस कोसळणार

हवामान अभ्यासकांनी व्यक्त केला अंदाज

मुंबई : महाराष्ट्रात यंदा वेळेआधीच मान्सूनचे (Monsoon) आगमन झाले आहे. मान्सून वेळोवेळी आपले पॅटर्न बदलत असल्यामुळे यावेळी कमी वेळेत अधिक पाऊस पडणार असल्याचे हवामान अभ्यासकांनी (Meteorologist) सांगितले आहे. त्यामुळे यावेळी चार ते पाच वेळा अतिमुसळधार पाऊस कोसळणार असून मुंबईकरांवर (Mumbai Rain) पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता वर्तवली आहे. यामुळे अभ्यासकांनी मुंबईकरांना वेळेआधीच सावधानतेचा इशारा दिला आहे. त्याचबरोबर मान्सून जसा पुढे सरकेल तसे चित्र आणखी स्पष्ट होईल, याकडेही हवामान अभ्यासकांनी लक्ष वेधले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, यंदा जूनच्या शेवटी, जुलैमध्ये दोनवेळा, ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये प्रत्येकी एकदा, असा किमान चार वेळा अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान अभ्यासकांनी वर्तविली आहे. मुंबईत एकूण सरासरीच्या ४० टक्के पाऊस हा पावसाळ्यातील दोन ते तीन दिवसांत कोसळतो. मुंबईत समुद्र सपाटीच्या तुलनेत खाली असलेल्या परिसरांमध्ये पावसाळ्यात पाणी साचते. त्यामुळे मुंबईत पूरसदृश परिस्थिती निर्माण होण्याची भीती हवामान अभ्यासकांनी व्यक्त केली आहे.

२० जूननंतर अतिमुसळधार पावसाची शक्यता

गेल्या पाच-सात वर्षांत मान्सूनचा पॅटर्न बदलला आहे. अतिवृष्टीची अनेक कारणे असतात, परंतु जेव्हा तीव्र ट्रफ, बंगालच्या उपसागरातील मान्सूनचे कमी दाबाचे क्षेत्र आणि जोरदार मान्सून लाट, अशा अनेक परिस्थिती उद्भवतात तेव्हा मोठे पाऊस होतात. २० जूननंतर अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. जुलैमध्ये अतिवृष्टीचा अंदाज असून यावेळी किमान २-३ वेळा अतिमुसळधार पाऊस पडेल. त्यामुळे पूर स्थिती निर्माण होऊ शकते, असे हवामान अभ्यासक अथ्रेया शेट्टी यांनी म्हटले.

पावसाची वार्षिक सरासरी

१) कुलाबा :२२१.३ सेमी
२) सांताक्रुझ :२५०.२ सेमी

३६५ दिवसांपैकी प्रत्यक्षातील एकूण पावसाचे दिवस ७५ ते ७८ असून मुंबईची वार्षिक पावसाची सरासरी २३५.८ सेमी आहे.

जुलैमधील पावसाच्या नोंदी 

१) कुलाबा-७६.९ सेमी (सरासरी)
२) सांताक्रुझ- ९२ सेमी (सरासरी)

यंदा ४ ते ७, १८ ते २१ व ३१ जुलैदरम्यान पावसाची शक्यता.

ऑगस्टमधील पावसाच्या नोंदी 

१) कुलाबा – ४७.२ सेमी (सरासरी)
२) सांताक्रुझ- ५६ सेमी (सरासरी)

यंदा १ ते ४, १५ ते १९, २९, ३०, ३१ ऑगस्टदरम्यान पावसाची शक्यता.

सप्टेंबरमधील पावसाच्या नोंदी 

१) कुलाबा- ३५.६ सेमी (सरासरी)
२) सांताक्रुझ- ३८.४ सेमी (सरासरी)

यंदा १, १२ ते १६, २५ ते २९ सप्टेंबरदरम्यान पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -