इटानगर : भाजपचे ज्येष्ठ नेते पेमा खांडू यांनी गुरुवारी अरुणाचल प्रदेशचे ११वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्याचा हा तिसरा कार्यकाळ आहे.
खांडू यांना राज्याचे राज्यपाल लेफ्टनंट जनरल (निवृत्त) के. टी. पारनाईक यांनी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत येथील डी. के. स्टेट कन्व्हेन्शन सेंटरमध्ये एका शानदार समारंभात पद आणि गोपनीयतेची शपथ दिली.
यावेळी खांडू यांच्यासह चौखम मतदारसंघातून सलग दुसऱ्यांदा निवडून आलेले चौना मीन यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तसेच भाजपचे प्रदेशाध्यक्ष बियुराम वाहगे, न्यातो दुकम, गॅब्रिएल डेनवांग वांग्सू, वांगकी लोवांग, माजी विधानसभा अध्यक्षांसह पासांग दोर्जी सोना, मामा नातुंग, दसांगलू पुल, बालो राजा, केंटो जिनी आणि ओजिंग तासिंग यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
खंडू यांच्या मंत्रीमंडळात आठ नवीन चेहरे आहेत. पासांग दोर्जी सोना, बियुराम वाहगे, न्यातो दुकम, गॅब्रिएल डेनवांग वांगसू, दसांगलू पुल, नालो राजा, केंटो जिनी आणि ओजिंग तासिंग हे ते आहेत.
चीनच्या सीमेला लागून असलेल्या अंजाव जिल्ह्यातील हायुलियांग मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करणाऱ्या दसांगलू पुल या एकमेव महिला मंत्री आहेत. त्या माजी मुख्यमंत्री कालिखो पुल यांच्या पत्नी आहेत.
या शपथविधी सोहळ्याला पक्षाचे केंद्रीय निरीक्षक रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग, केंद्रीय मंत्री किरेन रिजिजू, आसामचे मुख्यमंत्री आणि नॉर्थ ईस्ट डेमोक्रॅटिक अलायन्सचे निमंत्रक, सिक्कीमचे मुख्यमंत्री प्रेमसिंग तमांग, खासदार तापीर गाओ आणि नबाम रेबिया आणि अरुणाचलचे नेतेही उपस्थित होते.
तत्पूर्वी, पक्षाचे केंद्रीय निरीक्षक, रविशंकर प्रसाद आणि तरुण चुग यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत पक्षाच्या आमदारांनी खांडू यांची भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी एकमताने निवड केली. या बैठकीला अरुणाचलचे तिन्ही खासदारही उपस्थित होते.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत ६० सदस्यांच्या सभागृहात ४६ जागा जिंकून भाजपने अरुणाचल प्रदेशमध्ये सलग तिसऱ्यांदा सत्तेत परतले आहे.