Saturday, July 6, 2024
Homeसंपादकीयअग्रलेखउबाठासेना विरूद्ध काँग्रेस महाआघाडीत कलगीतुरा

उबाठासेना विरूद्ध काँग्रेस महाआघाडीत कलगीतुरा

राजकारणात वयाला मर्यादा नसते. जशी राजकीय पक्षांची स्थापन कधी झाली, तो किती वर्षे जुना आहे, याकडे मतदार लक्ष देत नाही. जो पक्ष सर्वसामान्य जनतेचे प्रश्न मांडण्याचा प्रयत्न करतो, त्यालाच जनता आपला मानते; परंतु निवडून आलेल्या जागांवरून आमचा पक्ष मोठा, आम्हीच मोठा भाऊ, असे बोलले जाते. आघाडीतील ज्या मित्रपक्षाला निवडणुकीत जागा कमी मिळतात त्याला छोटा भाऊ असे समजले जाते. महाराष्ट्रात शिवसेना-भाजपाची युती असताना, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला त्याकाळी भाजपा नेतेमंडळी मोठा भाऊ मानत असत, तर प्रमोद महाजन, गोपीनाथ मुंडे यांच्या नेतृत्वाखालील भाजपाने भरसभेत स्वत:ला छोटा भाऊ म्हणून संबोधून घ्यायला संकोच बाळगला नाही. नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीमध्ये छोटा भाऊ आणि मोठा भाऊ कोण? यावरून जुंपल्याचे पाहायला मिळाले.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी महाविकास आघाडीमध्ये काँग्रेस हाच मोठा भाऊ असल्याचा दावा केला. महाराष्ट्रात १३ जागा काँग्रेसला मिळाल्या. त्याचे श्रेय राहुल गांधी यांना देऊन नाना पटोले मोकळे झाले, त्यामुळे ठाकरे संतापले. नानांच्या या मोठा भाऊ असल्याच्या दाव्यावरून मात्र मातोश्रीच्या नाकावर राग आला. नाना यांनी मातोश्रीवर चर्चेसाठी भेट मागितली होती. मात्र मातोश्रीवर आपला फोन उचलला नाही, त्यांनी वेळ दिला नाही, असे उघडपणे सांगायला नाना विसरले नाहीत. त्यामुळे महाराष्ट्रात ४८ जागांपैकी ३० जागा जिंकून महायुतीला मागे टाकले, या अाविर्भावात असलेल्या महाविकास आघाडीत आता तू तू मै मै सुरू झाले आहे.

कोकण पदवीधर आणि नाशिकच्या जागेसाठी काँग्रेस आग्रही होते. मात्र लोकसभा जागा वाटपाप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी परस्पर उमेदवार घोषित केल्याने काँग्रेस नेत्यांमध्ये तीव्र संताप निर्माण झाला. ठाकरे गटाने विधान परिषदेच्या चारही जागा परस्पर घोषित केल्याने काँग्रेसमध्ये प्रचंड नाराजी होती. महाविकास आघाडी असताना घोषणा करण्याच्या आधी चर्चा केली पाहिजे होती, अशी काँग्रेसची रास्त मागणी होती. मुंबईतून विधान परिषदेसाठी अर्ज भरलेले शिवसेना उबाठाचे उमेदवार ठाकरेंनी कायम ठेवावेत. मात्र कोकण पदवीधर आणि नाशिक शिक्षक उमेदवार ठाकरेंनी मागे घ्यावेत, असा निरोप नाना पटोलेंनी उद्धव ठाकरेंना दिला होता. पण, नाना काय बोलतात याकडे ठाकरे गटाने दुर्लक्ष केले. त्यामुळे विधान परिषदेच्या जागांवरून निर्माण झालेला घोळ सोडविण्यासाठी काँग्रेस हायकमांडला मधस्थी करावी लागली. उद्धव ठाकरे यांच्याशी झालेल्या चर्चेनंतर काँग्रेसच्याही दोन उमेदवारांनी माघार घेतली. मात्र उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन संवादाचा अभाव झाल्याचे मान्य केले आणि त्यानंतर आता कोकण पदवीधर मतदारसंघातील ठाकरे गटाचे उमेदवार किशोर जैन यांनी अर्ज मागे घेतला.

लोकसभेच्या जागावाटपाच्या वेळी सांगलीच्या जागेवर ठाकरे गटाने शेवटपर्यंत हट्ट धरत ती जागा महाविकास आघाडीच्या फॉर्म्युल्याप्रमाणे स्वत:च्या पदरात पाडून घेतली होती. सांगलीचा निकाल आला. ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील यांचे डिपॉझिट वाचू शकले नाही, तर काँग्रेस बंडखोर उमेदवार विशाल पाटील विजयी झाल्यामुळे, महाविकास आघाडीतील काँग्रेसने आघाडीचा धर्म पाळला नाही, असा आरोप करत ठाकरे गटाने काँग्रेसच्या नावाने दातमुठी आवळल्या. पण करणार काय? निवडून आलेला अपक्ष विशाल पाटील यांचे काँग्रेस नेत्यांसोबतचे फोटो पाहून, मातोश्रीला काही दिवस काँग्रेस पक्षावर रुसून बसण्याची वेळ आली. उद्धव ठाकरे यांनीही काँग्रेसबद्दल ब्र शब्द काढला नाही; परंतु इकडे आड आणि तिकडे विहीर अशी अवस्था ठाकरे गटाची झाल्याने नाराजीनंतर पुन्हा काँग्रेसशी जुळून घेतल्याशिवाय पर्याय नाही. त्याची कारणे ही तशीच आहेत. ठाकरे गटाचे जे खासदार निवडून आले त्यांना मुस्लीम मतदारांनी भरघोस मतदान केल्याचे लपून राहिलेले नाही. त्यामुळे सेक्युलर मतावर डोळा ठेवून हिंदुत्वाची फक्त टोपी घालायची, ही नवी पद्धत ठाकरे गटाने अवलंबिली असल्याने काँग्रेसने मोठ्या भावावरून हिणवले तरीही सध्या सहन करण्याचे ठरविलेले दिसते.

लोकसभा निवडणुकीतील जागावाटपावरून महाविकास आघाडीत नाराजी नाट्य रंगले होते. भिवंडी, दक्षिण-मध्य मुंबई आणि सांगली या तीन महत्त्वाच्या जागांचा त्यात समावेश होता. सांगलीसाठी तिथल्या काँग्रेस नेत्यांनी मोठाच आटापिटा चालवला होता. वसंतदादांच्या काळापासून सांगली हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला असल्याने हा मतदारसंघ आपल्याच ताब्यात राहिला पाहिजे, असा आग्रह तेथील काँग्रेसजनांनी धरला होता. तथापि ही जागा या आधीच शिवसेनेने स्वत: लढविणार असल्याची घोषणा केल्याने काँग्रेसचे कोंडी झाली. काँग्रेसच्या वरिष्ठ पातळीवरील नेत्यांनी एखाद्या जागेवरून संपूर्ण महाराष्ट्रातील वातावरण खराब होऊ नये म्हणून ठाकरे गटाचा आग्रह मान्य केला होता.

आता तीन महिन्यांनंतर होणाऱ्या महाराष्ट्र विधानसभेसाठी काँग्रेस आणि ठाकरे गट यांच्यात जागावाटपावरून खटके उडू शकतात, अशी स्थिती आतापासून दिसायला सुरुवात झाली आहे. ना ना करके प्यार… असे एक हिंदी चित्रपटातील गाणे आहे. त्याच धर्तीवर मनात नसताना सत्तेची ऊब मिळेल या आशेने ठाकरे गट आणि काँग्रेस यांची फंटास राजकीय लवस्टोरी सुरू आहे, असे वाटते. केवळ भाजपाला सत्तेपासून दूर रोखण्यासाठी कदाचित महाविकास आघाडीतील बिघाडी टाळण्याचा प्रयत्न काँग्रेसचे हायकंमाड करतील. पण एका जागेवरून १३ ते १४ जागांवर मजल मारणाऱ्या नाना पटोले यांच्या नेतृत्वाखालील राज्यातील काँग्रेस पक्ष मातोश्रीच्या दबावाखाली राहील की नाही, हे पाहणे आता औत्सुक्याचे आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -