कल्याण : कल्याणवरून अहमदनगरला जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावरील माळशेज घाटात मोठी दुर्घटना घडली आहे. झाले. ही घटना बुधवारी पहाटे ४.३० च्या सुमारास घडली. मागील काही दिवसांपासून या भागात जोरदार पाऊस कोसळत आहे.
महामार्गावरून जात असताना रिक्षावर अचानक डोंगरकडा पडला. त्यामुळे या अपघातात दोनजण जागीच ठार झाले आहेत. मृतांमध्ये एका काका-पुतण्याचा समावेश आहे. ३० वर्षीय राहुल भालेराव आणि ७ वर्षीय स्वयंम भालेराव अशी मृत्यू झालेल्या काका-पुतण्याची नावे आहेत. तर, तीनजण जखमी असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, मुलुंड येथे राहणारे भालेकर कुटुंबीय रिक्षाने अहमदनगर जिल्ह्यातील संगमनेर तालुक्यामधील चंदनापुरी येथे मूळ गावी जात होते. कल्याणकडून नगरकडे जात असताना मुरबाड सोडल्यानंतर टोकावडे पोलीस ठाण्याच्या हद्दीत त्यांच्या रिक्षावर दरड कोसळल्याने हा अपघात झाला. यावेळी रिक्षातील तिघांना तातडीने आपले स्वत:चे प्राण वाचवले. पण, दुर्दैवाने या अपघातात काका-पुतण्याचा जागीच मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच टोकावडे पोलीस ठाण्यातील पोलीस कर्मचारी आणि अधिकारी घटनास्थळी तत्काळ दाखल झाले. रिक्षातील तीन जणांचा जीव थोडक्यात वाचला असून त्यांना किरकोळ दुखापत झाली आहे. कल्याणवरुन अहमदनगरच्या दिशेने जाण्यासाठी माळशेज घाटातून जाणारा हा एकमेव मार्ग आहे.
दरवर्षी दरड कोसळण्याच्या घडतात घटना
पावसाळ्यामध्ये माळशेज घाटात निसर्गाचे नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी अनेक पर्यटक गर्दी करतात पण या भागात दरड कोसळण्याच्या घटना दरवर्षी घडत असल्याने पर्यटक आणि या मार्गावरून वाहतूक करणारे प्रवासी देखील जीव मुठीत घेऊन ये-जा करत असतात. या भागात काही ठिकाणी नेट फेंसिंग केले आहे. मात्र हा भाग दरडरडप्रवण क्षेत्र असून दरवर्षी या ठिकाणी असे अपघात होत असतात.