Sunday, August 31, 2025

पोलादपूर तालुक्यात पेरा, नांगरणीला वेग

पोलादपूर तालुक्यात पेरा, नांगरणीला वेग

मृगाच्या राखणीसाठी कोंबड्यांची प्रचंड कमतरता

पोलादपूर : तालुक्यात रोहिणी नक्षत्रावर गेल्या गुरूवारपासून शेतकऱ्यांनी बियाणांचा पेरा करण्यास सुरुवात केली असून, पेऱ्याच्या वाफ्याभोवतीच्या शेतात नांगरणीच्या कामाने वेग धरल्याचे सर्वत्र दिसत आहे. दरम्यान शेताच्या आणि देवांच्या राखणीसाठी मृग नक्षत्राची सुरुवात शुक्रवारी झाली असून, तालुक्यात रविवारी कोंबड्यांची प्रचंड कमतरता निर्माण झाल्याने, चाकरमान्यांचा खोळंबा झाला आहे.

पोलादपूर तालुक्यामध्ये अवकाळी पावसापाठोपाठ मान्सूनची सुरुवात झाल्याने, पाऊस चांगलाच स्थिरावला आहे. शेतजमिनीमध्ये नांगरणी करून, रोहिणी नक्षत्रावर गेल्या गुरुवारी पेरलेले भातबियाणे आता रूजून वाफा हिरवा होऊ लागला आहे. शेतकऱ्यांनी पेरणीसाठी जमिनीची मशागत करताना, पेऱ्याच्या वाफ्याभोवतीच्या शेतजमिनीवर नांगरणी सुरू केली आहे. कोकणात मृग नक्षत्राच्या पंधरवड्यात देवाला आणि शेताला पक्षी धरून राखण देण्याची प्रथा असून, शुक्रवारी नक्षत्राचा प्रारंभ झाल्यानंतर रविवारी राखण देण्याच्या हेतूने असंख्य चाकरमानी मंडळी पोलादपूर तालुक्यातील आपआपल्या गावांमध्ये सर्वसज्जतेसह दाखल झाले होते.

मात्र या दिवशी राखणीसाठी आरवते कोंबडे न मिळाल्याने, चाकरमान्यांचा हिरमोड होऊन, बुधवारपर्यंत मुक्काम लांबवावा लागला असून, चिकन सेंटरच्या दुकानांमध्ये कोंबडा मिळण्यासाठी, अनेक चाकरमान्यांनी आगाऊ रक्कम देऊन, आपआपला पक्षी आरक्षित केल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

गावा-गावांतील कोंबडे रविवारपासून महागले असून आरवणाऱ्या गावठी कोंबडयाची किंमत ७०० ते १२०० रूपयांपर्यंत पोहोचल्याने आत पोल्ट्रीतील बारामती आणि सुरती कोंबडादेखील चालवून घेणाऱ्या चाकरमान्यांना गावातील वृद्ध मंडळींनी कोंबडे पाळायला हवे असल्याचे साक्षात्कार देखील झाल्याचे अनेकांनी सांगितले. मृग नक्षत्रावर पावसाचा जोर रोज कायम असून वातावरणातील गारव्यावर शेताची राखण देऊन कोंबड्याची सागोती नैवेद्य म्हणून भक्षण करण्यासाठीचा इलाज आज बुधवारी तसेच येत्या शुक्रवार व रविवारी मोठ्या प्रमाणावर बिगरवारकरी शेतकरी मंडळींकडून केला जाणार आहे.

Comments
Add Comment