Monday, June 30, 2025

शौचालयाजवळ जेवतात सुरक्षा रक्षक

शौचालयाजवळ जेवतात सुरक्षा रक्षक

अत्याधुनिक उद्यान: मीरा-भाईंदरमध्ये अद्यावत ७३ उद्याने


भाईंदर : मीरा-भाईंदर महापालिकेने हिरकणी कक्ष, ग्रंथालय, लॉकर्स अशा विविध सुविधायुक्त अत्याधुनिक पद्धतीने बनविलेल्या आणि राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झालेल्या मीरा रोड येथील संत रविदास महाराज उद्यानात महापालिका सेवेत असलेल्या सुरक्षारक्षकांना मात्र त्यांचा जेवणाचा डबा उद्यानातील स्वच्छागृहात असलेल्या शौचालयाजवळ खावा लागत असल्याचे उघडकीस आले आहे.


उद्यानाचे शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मीरा-भाईंदरमध्ये अद्यावत ७३ उद्याने आहेत. महापालिकेने अर्थसंकल्पात ५७.६३ कोटी रुपयांची तरतूद केली आहे. शहराचे प्रवेशद्वार असलेल्या काशीमीरा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या समारकासमोर संत रविदास महाराज या थोर संतांचे नाव दिलेल्या अत्याधुनिक उद्यानात लहान मुलांसाठी खेळणी तर आहेतच, त्याचबरोबर मॉर्निंग वॉकसाठी ट्रॅक, ज्येष्ठ नागरिकांसाठी विविध सोयी, सर्वांसाठी मोकळी जागा, एवढेच नव्हे तर ग्रंथालय, लॉकर्स तसेच स्तनपानासाठी हिरकणी कक्षसुद्धा आहे. या उद्यानाचे लोकार्पण महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले होते.


एवढ्या सुखसोयी असताना तेथे कर्तव्य बजावत असलेल्या महापालिकेच्या सुरक्षारक्षकांना मात्र जेवणाचा डबा खाण्यासाठी कोणतीही व्यवस्था नाही. उद्यानाचे देखभाल करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी कपडे बदलणे, जेवणे यासाठी स्वतंत्र कक्ष आहे. परंतु तेथे सुरक्षारक्षकांना प्रवेश नाही. त्यामुळे कामावर आल्यावर स्वच्छागृहात असलेल्या शौचालयाजवळ कपडे बदलून कपडे तसेच जेवणाचा डबा तेथेच ठेवावा लागतो आणि जेवणाची वेळ झाली की, तेथेच खावा लागतो.


स्वच्छतागृहातील शौचालयाचे दरवाजे तुटलेले आहेत. महिलांसाठी असलेल्या शौचालयाला दरवाजा नसल्याने प्लास्टिक लावण्यात आले आहे. उद्यानात असलेल्या गर्दुल्यांचा वावर धोकादायक आहे.


उद्यानाच्या समोरच असलेल्या प्रभाग कार्यालयात सुरक्षा रक्षकांना कपडे बदलणे, जेवण करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मेट्रोचे काम सुरू असल्याने उद्यानाचे लोखंडी दरवाजे तुटले. ते त्वरित लावण्याच्या सूचना बांधकाम विभागाला दिले आहेत. तसेच पाण्याचा कुलर लावण्यात येईल आणि सहा सुरक्षा रक्षक तैनात कारण्याची मागणी केली आहे, असे उपायुक्त कल्पिता पिंगळे यांनी सांगितले.

Comments
Add Comment