Monday, September 15, 2025

School Nutritious Food : पोषण आहारात मिळणार अंडा पुलावासह खीर

School Nutritious Food : पोषण आहारात मिळणार अंडा पुलावासह खीर

सहा प्रकारच्या पुलावांचा समावेश

मुंबई : प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२४-२५ मध्ये राज्यातील शासकीय तसेच शासन अनुदानित शाळांमध्ये पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांना पोषण आहार योजनेच्या माध्यमातून अधिक सकस आणि पौष्टिक आहार देण्याचा निर्णय शालेय शिक्षण विभागाने घेतला आहे. पोषण आहारातील खिचडी रोज खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आता दोन आठवड्यांत प्रत्येक दिवशी वेगवेगळे पदार्थ दिले जाणार आहेत. यात विविध सहा प्रकारचे पुलाव, तांदळाची खीर, उसळ, नाचणीचे सत्व यांसह १५ प्रकारचे पदार्थ दिले जाणार आहे.

या निर्णयानुसार व्हेजिटेबल पुलाव, अंडा पुलाव, मटर पुलाव, चना पुलाव, सोयाबीन पुलाव, मसुरी पुलाव अशा प्रकारच्या पाच पुलावांसह मूगडाळ खिचडी, चवळी खिचडी, मोड आलेल्या मटकीची उसळ, गोड खिचडी, मूग शेवगा, वरण भात, तांदळाची खीर, नाचणीचे सत्व व मोड आलेले कडधान्य (स्प्राऊटर) आदी पदार्थांचा यात समावेश राहणार आहे. राज्यात सद्यःस्थितीत योजनेसाठी पात्र असलेल्या सर्व शाळांमधून प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत तांदळापासून बनवलेल्या पाककृतीच्या स्वरुपात नियमित आहाराचा लाभ विद्यार्थ्यांना देण्यात येतो. तसेच शासन निर्णयानुसार आठवड्यातून एक दिवस विद्यार्थ्यांना अंडी, केळी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर आता शालेय पोषण आहारात अधिक पूरक घटक समाविष्ट करण्यात येणार आहेत.

विद्यार्थ्यांना प्रत्येक दिवशी आहारासोबत मोड आलेले कडधान्य दिले जाणार आहे. तसेच विद्यार्थ्यांना आडवड्यातील चार दिवस तांदळाची खीर व एक दिवस नाचणी सत्व या गोड पदार्थांचा लाभ दिला जाणार आहे. विद्यार्थ्यांना आठवड्यातून एक दिवस अंडी किंवा केळी देण्यात येत आहे. त्यामुळे अंडी खाणाऱ्या विद्यार्थ्यांना आठवड्यातून एकदा अंडा पुलाव दिला जाणार आहे, तर अंडी न खाणाऱ्या विद्यार्थ्यांना त्या दिवशी व्हेजिटेबल पुलाव दिला जाणार आहे.

Comments
Add Comment