Sunday, May 11, 2025

महामुंबई

नवी मुंबईत अद्याप एकाही अनधिकृत शाळेवर गुन्हा नोंद नाही

नवी मुंबईत अद्याप एकाही अनधिकृत शाळेवर गुन्हा नोंद नाही

नवी मुंबई : शहरातील तीन अनधिकृत शाळा चालू असून, या पैकी एकाही शाळेवर अद्याप संबंधित पोलीस ठाण्यांकडून फौजदारी गुन्हा नोंद करण्यात आला नसल्याचे उघड झाले आहे. विशेष म्हणजे नवी मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त कैलास शिंदे यांच्या आदेशाने शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी एका महिन्यापूर्वी या संदर्भात तक्रार केली होती.


यावरून आयुक्तांचे आदेश किती गांभीर्याने घेतले जातात, हेच यातून स्पष्ट झाले आहे. याविषयीचे वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर खडबडून जागे झालेल्या प्रशासनाने एप्रिल महिन्याच्या अखेरीस ही यादी घोषित केली. नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मार्च २०२४ अखेर ५ प्राथमिक शाळा शासनाची / नवी मुंबई महानगरपालिकेची मान्यता न घेता, अनधिकृतपणे चालू असल्याचे निदर्शनास आले होते.


या अनधिकृत शाळांमध्ये पालकांनी त्यांच्या मुलांचे नव्याने प्रवेश घेऊ नयेत, असे आवाहन शिक्षण विभागाच्या माध्यमातून करण्यात आले होते. तसेच संबंधित शाळा व्यवस्थापकांना शाळेतील विद्यार्थ्यांना जवळच्या महानगरपालिका किंवा अन्य मान्यताप्राप्त खासगी शाळेत शिक्षणासाठी दाखल करावे. तसेच परवानगीशिवाय चालू केलेली शाळा तत्काळ बंद करावी, अन्यथा शाळा चालकांच्या विरुद्ध बालकांचा मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाचा हक्क अधिनियम २००९ मधील कलम १८ (५) नुसार कारवाई करण्यात येईल, अशी नोटीस बजावली होती. या शाळांच्या विरुद्ध फौजदारी गुन्हे नोंद करण्याचे आदेश दिले होते.



कोणत्याही प्रकारची कारवाई देखील नाही


शासनाच्या परवानगीशिवाय चालू असलेल्या वरील अनाधिकृत शाळेच्या संस्थाचालकांवर शिक्षण हक्क कायद्याच्या कलम १८ (५) नुसार तसेच शासन, विद्यार्थी आणि पालक यांचीही फसवणूक केल्याप्रकरणी फौजदारी गुन्हा नोंद करण्यात यावा, असे पत्र शिक्षण अधिकारी अरुणा यादव यांनी सीबीडी, एनआरआय आणि नेरूळ पोलीस ठाण्यामध्ये ९ मे या दिवशी देण्यात आले होते. पत्र देऊन एक महिना उलटला, तरी अद्याप एकाही पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याची कार्यवाही करण्यात आली नाही. मागील वर्षी तत्कालीन आयुक्त राजेश नार्वेकर यांनी देखील अशाच प्रकारे गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते; त्या बिनबोभाटपणे चालू होत्या. त्यामुळे या शाळांना नेमक्या कोणाच्या पाठिंब्याने चालू आहे, असा प्रश्न सर्वसामान्य जनतेला पडला आहे.



अनधिकृत शाळा



  • इस्माइल एज्युकेशन ट्रस्टचे अल मोमीन स्कूल आर्टिस्ट व्हिलेज, सेक्टर-८ बी, सी. बी. डी. बेलापूर

  • ग्लोबल एज्युकेशन ट्रस्टचे अग्रीपाडा, मुंबई, इकरा ईस्लामिक स्कूल ॲण्ड मक्तब, सेक्टर-२७, नेरूळ,

  • आटपती एज्युकेशन ट्रस्टचे ऑर्किडस् द इंटरनॅशनल स्कूल (CBSE) सीवूड, सेक्टर-४०, नेरूळ.

  • इलिम फूल गोस्पेल ट्रस्टचे इलिम इंग्लिश स्कूल आंबेडकर नगर, रबाले

  • मारानाथ संस्थेचे शालोम प्री प्रायमरी स्कूल शिवशक्तीनगर, शर्मायी मंदिर रोड, तुर्भे स्टोअर्स, नवी मुंबई.

Comments
Add Comment