बांधकाम विभागाची कारवाई, पाडले ५ हजार चौरस फूट बांधकाम
पुणे : शहरातील फर्ग्युसन रोडवरील शिरोळे प्लॉट येथील विनापरवाना शॉपिंग मॉलवर पुणे महापालिकेच्या (Pune Municipal Corporation) बांधकाम विभागाने कारवाई केली. येथे छोटी-मोठी मिळून ७० स्टॉल वजा दुकाने चालू होती. त्यावर कारवाई करून पाच हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले.
पुणे महापालिका प्रशासनाने वकील देऊन आठ वर्षे चाललेला स्थगिती आदेश उठवून घेतला. या कारवाईबाबत उच्च न्यायालयामध्ये कॅव्हेट दाखल केली होती. त्यानंतर ४ डिसेंबर २०२३ रोजी तातडीने कारवाई सुरू केली. या कारवाईत सात हजार चौरस फूट बांधकाम पाडण्यात आले. मात्र या कारवाईला त्याच दिवशी दुपारी साडेचार वाजता उच्च न्यायालयाने स्थगिती दिली. त्यामुळे हे आदेश दिल्यामुळे कारवाई थांबवण्यात आली. मात्र आता या कारवाईवरील स्थगिती न्यायालयाने उठविली. त्यामुळे पालिकेच्या बांधकाम विभागाने या अनधिकृत शॉपिंग मॉलवर कारवाई करून बांधकाम पाडण्यात आले. या ठिकाणी लोखंडी एंगल, गर्डर, पत्रे यांच्या सहाय्याने दोन मजली विनापरवाना मॉल तयार करण्यात आला होता. यामध्ये छोटी-मोठी मिळून ७० स्टॉल वजा दुकाने चालू होती.
या मॉलमुळे फर्ग्युसन रोडवर वाहतुकीचा ताण येत होता. तसेच मॉलमध्ये हवा उजेडाची सोय नसल्याने आणि मॉलमध्ये मोठ्या प्रमाणावर ग्राहक आणि विक्रेते असल्याने आगीसारखी दुर्घटना घडली असती तर मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली असती. एक जेसीबी, गॅस कटर, ब्रेकर, १५ बिगारी, पोलीस कर्मचारी यांनी या कारवाईत भाग घेतला. या मॉलमध्ये कपड्यांची दुकाने असल्याने आग लागण्याची शक्यता होती. यामुळे अग्निशमनची एक गाडी तयार ठेवण्यात आली होती.
शिवाजी नगर पोलीस स्टेशन वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे यांच्यासह अन्य कर्मचारी उपस्थित होते. अधीक्षक अभियंता राजेश बनकर, कार्यकारी अभियंता बिपीन शिंदे, उपअभियंता सुनील कदम, शाखा अभियंता राहुल रसाळे यांनी ही कारवाई पूर्ण केली.