
मुंबई महापालिकेचे नागरिकांना आवाहन
मुंबई : पालिकेने (Mumbai Municipal) पावसाळा पूर्व तयारीच्या कामांमध्ये शहरातील अतिधोकादायक झाडांचे सर्वेक्षण करून ठिकठिकाणी छाटणी देखील केली आहे. असे असले तरी मुंबईकरांनी पावसात झाडांखाली थांबू नये, तसेच वाहनेदेखील झाडांखाली उभी करू नयेत, असे आवाहन उद्यान विभागाकडून करण्यात आले आहे.
पावसाळ्यातील संभाव्य धोके ओळखता, पालिकेच्या उद्यान विभागाद्वारे मुंबई शहरातील प्रामुख्याने धोकादायक झाडांची शास्त्रोक्त पद्धतीने छाटणी करण्यात आली आहे. वेगाने वारे वाहिल्यास, त्या दरम्यान झाडे किंवा फांद्या कोसळण्याची शक्यता नाकारता येत नाही, ही बाब लक्षात घेता, नागरिकांनी पावसात झाडांखाली थांबणे टाळावे. सोसाट्याचा वारा आणि पाऊस सुरू असताना झाड पडण्याची अथवा फांदी तुटण्याची दाट शक्यता असते. त्यामुळे पावसापासून बचाव करताना नागरिकांनी शक्यतो झाडांखाली थांबणे टाळावे, असे आवाहन उद्यान विभागाने केले आहे. याबाबत उद्यान विभागाने मुंबई शहर, पूर्व आणि पश्चिम उपनगरांमध्ये ठिकठिकाणी माहिती पत्रके प्रदर्शित करून, जनजागृती केली आहे.
तत्काळ संपर्क करा
इमारती तसेच गृहनिर्माण संस्थेच्या आवारातील, परिसरातील, रस्त्यांभोवती धोकादायक वाटणाऱ्या झाडांबाबत मुंबईकरांनी विभाग कार्यालयात (वॉर्ड) उद्यान विभागाशी संपर्क साधावा किंवा १९१६ या नागरी सेवा क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन उद्यान अधीक्षक जितेंद्र परदेशी यांनी केले आहे. तसेच मुंबईकरांनी आपल्या इमारती, सोसायटी आवारातील धोकादायक झाडांची रीतसर परवानगी घेऊन छाटणी करून घ्यावी आणि संभाव्य धोका टाळावा, असेही त्यांनी आवाहन केले आहे.