जिल्हा परिषदेच्या उपमुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांचे गटविकास अधिकाऱ्यांना निर्देश
अलिबाग : ग्रामपंचायत कार्यालयातील अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या कामाचे स्वरूप, तसेच त्यांचे वेतन, नेमणुकीचा दिनांक आदी माहिती ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात लावण्याबाबत कार्यवाही करावी, असे आदेश रायगड जिल्हा परिषदेचे ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र भालेराव यांनी सर्व गटविकास अधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील ग्रामपंचायत विभागातील अधिकारी, कर्मचाऱ्यांविषयी माहिती आता दर्शनी भागावर झळकणार आहे.
अलिबाग येथील सुनीलकुमार करुणाकरण पुविल यांनी ही बाब जिल्हा परिषदेच्या निदर्शनात आणून दिल्यानंतर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. शासकीय कार्यालयात होत असलेल्या भ्रष्टाचाराची माहिती मिळविण्यासाठी माहितीचा अधिकार शासनाने उपलब्ध करून दिला आहे. त्याचबरोबर ग्रामपंचायत विभागातील कर्मचारी, अधिकाऱ्यांचे काम काय आहे, त्याचे वेतन किती आहे, नेमणूक कधी झाली, याबाबत माहिती अधिकार अधिनियम २००५, कलम ४-अ नुसार माहिती दर्शनी भागात लावणे बंधनकारक आहे.
दरम्यान नियमांचे पालन होताना दिसत नाही. याबाबत अलिबाग येथील सुनीलकुमार करुणाकरण पुचिल यांनी रायगड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याकडे लिहून मागणी केली होती. सुनीलकुमार यांनी याबाबत सर्वोच्च न्यायालयात दाखल झालेल्या रिट पिटीशनबाबत निकालही अर्जासोबत जोडला होता. या निकालानुसार अंमलबजावणी सर्व कार्यालयांना करणे बंधनकारक अनिवार्य केले आहे, याची आठवण करून दिल्यानंतर जिल्हा परिषदेने हा निर्णय घेतला आहे. सुनीलकुमार यांनी जिल्हा परिषदेकडे सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाची अंमलबजावणी करण्याबाबत मागणी केल्यानंतर हा निर्णय झाल्याने माहिती अधिकार क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी सुनीलकुमार यांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या या मागणीमुळे आता ग्रामपंचायतीच्या दर्शनी भागात माहितीचे फलक झळकणार आहेत.