Monday, July 15, 2024
Homeमहामुंबईतळोजा औद्योगिक विभागातील प्रदूषणात वाढ; नागरिकांमध्ये संताप

तळोजा औद्योगिक विभागातील प्रदूषणात वाढ; नागरिकांमध्ये संताप

विषारी पाण्याने कासाडी नदी झाली लाल

पनवेल : तळोजा औद्योगिक विभागातील कारखान्यातून सोडण्यात आलेल्या विघातक विषारी पाण्याने कासाडी नदीला लाल रंग आला आहे. या बेसुमार वाढत्या विघातक प्रदूषणाने नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून, त्यांचे जीवनच उद्ध्वस्त झाले आहे. त्यांना अनेक आजारांना सामना करावा लगत आहे. या विषारी प्रदूषणापासून नागरिकांची सुटका होईल का? की आम्हा स्थानिकांचा जीव घेण्यावर बसले आहे, अशा संतप्त सवाल काँग्रेसचे पनवेल जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी येथील नागरिकांच्या वतीने महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला केला आहे.

तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्प तळोजा औद्योगिक विकास मंडळाकडे गेल्यापासून कासाडी नदीच्या प्रदूषणात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. प्रदूषण नियंत्रण मंडळ अधिकारी बेलापूर व तळोजा औद्योगिक विकास मंडळ याच्यामधून विस्तव जात नसल्याने, याची किंमत येथील स्थानिक नागरिकांना मोजावी लागत आहे. प्रदूषण करणाऱ्या कारखान्याकडून दोन्ही आस्थापना हप्ते वसूल करत असल्याने, येथील प्रदूषण कमी होण्याऐवजी वाढत असल्याचा गंभीर आरोप पाटील यांनी केला आहे. गेली काही दिवसांपासून रात्री कारखान्यातून विघातक पाणी सोडण्यात येत आहे. दीपक कंपनी ते वलप गणेश नगर विसर्जन घाट दरम्यानच्या कासाडी नदीचे पाणी लालच लाल झाले आहे. याची माहिती प्रदूषण नियंत्रण मंडळ नवी मुंबई व तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांना देण्यात आली असता, कासाडी नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले. पण त्यावर अद्याप कोणतीही कारवाई न करता, येथे आर्थिक हितसंबंध जपले गेले. त्यामुळे येथील कंपन्यांना कासाडी नदीत विषारी पाणी सोडण्याची मुभा देण्यात आली.

आज त्यापेक्षा भयानक परिस्थिती कासाडी नदीची झाली असून, नदीचे पाणी लाल झाले आहे. हे पाणी जमिनीत मुरले जाऊन, नागरिकांच्या पिण्यात येऊन त्यांना आस्थमा, छातीत जळजळ, फुफ्फुसाचे आजार जडले आहेत. लहान मुलांची वाढ खुंटत असून, अनेक आजारांना सामोरे जावे लागत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ व तळोजा औद्योगिक विकास मंडळ यांच्याकडून न्यायालयाचे अवमान करताना, तळोजे औद्योगिक वसाहतीमध्ये सर्रासपणे रासायनिक सांडपाणी प्रक्रिया न करताच कासाडी नदीत, मोकळ्या भूखंडावर ओतले जात असताना तळोजे पोलिसांपासून प्रदूषण नियंत्रक मंडळ, एम आय डी सी, प्रांताधिकारी, जिल्हाधिकारी तसेच पनवेल महापालिका प्रशासन डोळ्यावर कातडे ओढून मांजरीसारखे गप्प बसले आहे. तळोजा सांडपाणी प्रकल्पाला वाहून आणणाऱ्या वाहिन्या दिशाहीन व्यवस्थापनामुळे टाकण्यात आल्याने, त्या जागोजागी जाम झाल्या वा फुटल्या आहेत.

या वाहिन्यांचे चेंबर जाम झाल्याने, कारखान्यातील विघातक पाणी थेट कासाडी नदीत जात आहे. नवीन टाकलेल्या वाहिन्या आणि त्याचे जाम झालेले चेंबर साफ करण्यासाठी, एमआयडीसीने भागीदारीत ठेकेदार नेमल्याने, त्यावर महिना लाखो रुपये खर्च केला जात आहे, असा गंभीर आरोप सुरेश पाटील यांनी केला आहे. तळोजे औद्योगिक नगरीत प्रदूषणाचा महाराक्षस पोसणाऱ्या ‘प्रदूषण’च्या ‘वाझेफेम’ अधिकाऱ्यांनाही राज्य शासनाने जबाबदार ठरवून, त्यांना सहआरोपी का केले जात नाही, असा प्रश्न सुरेश पाटील यांनी केला आहे.

प्रदूषणामुळे जनजीवन धोक्यात

राज्य सरकारचे उद्योगमंत्री, नगरविकास मंत्री आठवड्यातून तळोजे औद्योगिक नगरीत या ना त्या कारणाने पायधूळ झाडत आहेत. त्यांच्या कानावर गंज चढेपर्यंत स्थानिकांनी, वारकरी, नागरिकांनी हजार वेळा प्रदूषणामुळे जनजीवन धोक्यात आल्याच्या तक्रारी केल्या आहेत. परंतु प्रदूषणाला आळा घालण्याचे काम कुणीही करायला मागत नाही. त्यामुळे तळोजासह पनवेल महापालिका क्षेत्र एक दिवशी भोपाळ होण्याच्या मार्गावर आहे. तळोजा सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पाचे काम एमआयडीसी वर्ग केल्यानंतर येथील प्रदूषणात बेसुमार वाढ झाली असल्याचा आरोप काँग्रेसचे पनवेल जिल्हा पर्यावरण अध्यक्ष सुरेश पाटील यांनी केला आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -