Tuesday, April 29, 2025

महाराष्ट्ररायगड

गांधारी नदीला पाणी वाढल्यास लाडवली पुलाचे काम रखडणार

गांधारी नदीला पाणी वाढल्यास लाडवली पुलाचे काम रखडणार

योग्य नियोजनाअभावी पुलाच्या कामास विलंब

महाड : महाड-रायगड मार्गावर लाडवली येथील पूल पावसाळा सुरू झाला, तरी अर्धवट अवस्थेत असल्याने, ग्रामस्थांनी आक्रमक होत, सोमवारी आंदोलन केले व संबंधित ठेकेदार व महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. दरम्यान सोमवारी दुपारनंतर रायगड खोऱ्यासह मांडला परिसरात झालेल्या मुसळधार पावसामुळे गांधारी नदीला पाणी आले असून, लाडवली पुलाजवळ बंधारा घालून, हे पाणी अडवण्यात आले आहे. मात्र पाण्याचा जोर वाढला, तर हा बंधारा फोडून पर्यायी मार्गावरून वाहू लागेल आणि त्यानंतर नवीन पुलाचे काम करणे अवघड जाईल.

महाडचे प्रांताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे यांनी या संदर्भात घेतलेल्या बैठकीत लाडवली येथील नवीन पूल २० दिवसांत पूर्ण करून वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, अशी ग्वाही दिली. मात्र पुढील वीस दिवसांत नदीतील पाण्याचा प्रवाह वाढला, तर नवीन पुलाच्या कामात अडचणी वाढण्याच्या शक्यता आहे.

महाड-रायगड महामार्गावरील लाडवली येथील पुलाचे काम पावसाळ्यापूर्वी पूर्ण करून, त्यावरून वाहतूक सुरू करणे अपेक्षित होते. मात्र तसे न झाल्याने आणि या पुलाखालून नदीपात्रातून काढण्यात आलेला तात्पुरता पर्यायी मार्ग पावसाळ्यात पाण्याखाली जाण्याची शक्यता होती. तसे झाले तर या पुलापलीकडे असलेल्या रायगड विभागातील सुमारे चाळीस गावांचा महाड शहराशी असलेला संपर्क पूर्णपणे तुटणार होता.

याच मुद्द्यावरून सोमवारी रायगड विभागातील नागरिकांनी या पुलाच्या ठिकाणीच आंदोलन करून वाहतूक रोखून धरली होती. या संदर्भात आज महाड प्रांत कार्यालयात बैठक घेण्यात आली. या बैठकीला प्राताधिकारी ज्ञानोबा बाणापुरे, महामार्ग विभागाच्या कार्यकारी उपकार्यकारी अभियंता कु. आकांक्षा मेश्राम, नायब तहसीलदार वाय. बी. भांबड, ठेकेदार कंपनीचे प्रकल्प अभियंता श्री. राजमाने, भाजपाचे जिल्हा सरचिटणीस बिपीन म्हामुणकर, महेश शिंदे, अनिल मोरे, चंद्रजीत पालांडे, रवींद्र तथा बंधू तरडे, सागर हिरवे यांच्यासह रायगड विभागातील नागरिक उपस्थित होते.

या पुलाच्या कामाची सद्यस्थिती आणि कामात येणाऱ्या अडचणींची माहिती प्रांताधिकारी श्री. बाणापुरे यांनी घेतली. जर या पुलाचे काम रखडले, तर त्याचे गंभीर परिणाम रायगड विभागातील नागरिकांना पावसाळा संपेपर्यंत सहन करावे लागणार असल्याची बाब महेश शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिली. त्यानंतर महामार्ग विभाग आणि ठेकेदार यांचेही म्हणणे प्रांताधिकाऱ्यांनी ऐकून घेतले. त्यानंतर येत्या वीस दिवसांत या पुलाचे काम पूर्ण करून, त्यावरून वाहतूक सुरू करण्यात येईल. त्याची जबाबदारी आपली असेल, असे सांगत श्री. बाणापुरे यांनी नागरिकांना आश्वस्त केले.

पर्यायी मार्ग मजबूत करणार

दरम्यानच्या काळात पर्यायी मार्ग देखील वाहतुकीच्या दृष्टीने सुरक्षित राहील याबाबतही निर्णय घेण्यात आला. पावसामध्ये या पर्यायी मार्गावर पाणी येवून वाहतूक बंद पडू नये यासाठी या ठिकाणी शंभर पाईप टाकण्यात येतील. त्यामुळे नदीला कितीही पाणी आले तरी वाहतूक सुरळीत सुरु राहील याची दक्षता घेण्यात येईल असेही प्रांताधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

Comments
Add Comment