डॉक्टर होण्याचे स्वप्न बाळगणाऱ्या देशातील लाखो विद्यार्थ्यांच्या विश्वासाला तडा जाणारा गैरप्रकार पहिल्यांदाच देशभर गाजत आहे. प्रकरण सर्वोच्च न्यायालयात गेले आहे. यावर्षी झालेली नीट यूजी परीक्षा रद्द करण्यात यावी आणि पुनर्परीक्षा घेण्यात यावी, या संदर्भात याचिका दाखल करण्यात आली. सुनावणीच्या वेळी सर्वोच्च न्यायालयाच्या खंडपीठाने निकालानंतरच्या प्रक्रियेला तूर्तास स्थगिती देण्यास नकार दिला असला तरी, परीक्षा आयोजित करणाऱ्या नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए) या संस्थेला जाब विचारला आहे. या संदर्भात नोटीस जारी करून अहवाल मागवला आहे. तसेच या परीक्षेच्या विश्वासार्हतेवर परिणाम झाला असून यावर सविस्तर उत्तर देण्यात यावे, अशी टिप्पणी न्यायालयाने लगावली आहे. पुढील सुनावणी आता ८ जुलै रोजी पार पडणार असल्याने, सर्वोच्च न्यायालय काय निर्णय देणार याकडे लक्ष लागले आहे.
एकीकडे विद्यार्थी पालकांच्या वतीने न्यायालयाचे दरवाजे ठोठावण्यात आले असताना, महाराष्ट्राचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनीही नीट परीक्षा पुन्हा घेण्यात यावी, अशी मागणी केली होती. त्यामुळे नीट यूजीच्या परीक्षेत नक्कीच गोंधळ झाला असावा, असा संशय बळावण्यास जागा निर्माण झाली. दुसरीकडे तामिळनाडूमध्ये नीट यूजी परीक्षेवरून गेल्या तीन वर्षांपासून गोंधळाचे वातावरण आहे. २०२१ मध्ये द्रमुकचे सरकार आल्यानंतर, नीट परीक्षेचा विद्यार्थ्यांच्या प्रवेश प्रक्रियेवर होणाऱ्या परिणामांचा आढावा घेण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती. या समितीने विद्यार्थी, पालक आणि नागरिकांशी संवाद साधून आणि या परीक्षेसंबंधी विस्तृत माहिती गोळा करत तिचे विश्लेषण करून एक अहवाल तयार केला. त्या समितीने नुकताच ‘नीट’ परीक्षेबाबत सरकारला अहवाल सादर केला आहे. हा अहवाल प्रसिद्ध झाल्यानंतर, नीट परीक्षा ही गरीब विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी आणि सामाजिक न्याय विरोधी असल्याचे तामिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन यांनी म्हटले आहे.
वैद्यकीय शिक्षण घेण्याची इच्छा असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नीट (NEET) म्हणजे National Eligibility cum Entrance Test ही महत्त्वाची परीक्षा घेतली जाते. मेडिकल कॉलेजला याच परीक्षेतील गुणांवर मेरिट लिस्ट तयार केली जाते. एकूण ७२० मार्कांच्या या परीक्षेमध्ये विद्यार्थ्यांना योग्य पर्याय निवडून आपली उत्तरे द्यायची असतात. यामध्ये प्रत्येक बरोबर उत्तरासाठी विद्यार्थ्यांना ४ मार्क मिळतात, तर प्रत्येक चुकीच्या उत्तरामागे १ मार्क कापला जातो.
नीट परीक्षेचा निकाल ४ जूनला लागला. ओएमआर शीट फाडल्याचा आरोप होत आहे. अनेक विद्यार्थ्यांचे निकाल ऑनलाइन दाखवले जात नाहीत. अनेक विद्यार्थ्यांचे गुण कमी आहेत, म्हणजेच त्यांना ओएमआर शीटनुसार जे गुण मिळायला हवे होते, ते मिळालेले नाहीत. अशा विविध कारणांमुळे देशभरातील विद्यार्थ्यांनी या निकालावर आक्षेप घेतला. परीक्षेचे आयोजन योग्य प्रकारे करण्यात आल्याचा आरोप करत परीक्षा पुन्हा घेण्याची मागणी विद्यार्थी वर्गातून करण्यात आली. राजस्थान, हरियाणा येथील विद्यार्थ्यांनी सोशल मीडियावर या संदर्भात टाकलेल्या पोस्टनंतर, विद्यार्थ्यांच्या मनात आता आपले नक्की काय होणार हा प्रश्न पडला असेल. संशयास्पदरीत्या समान रोल नंबर, निकाल जाहीर करण्याच्या तारखेत अचानक झालेला बदल आणि पेपर लीकचे आरोप यामुळे नीट यूजीचा यंदाचा निकाल खरा मानायचा का अशी भावना विद्यार्थी, पालकांमध्ये निर्माण झाली. कारण, नीट परीक्षेचा निकाल १४ जूनला लागेल, असे जाहीर करण्यात आले होते. पण ४ जूनला देशामध्ये सार्वत्रिक निवडणुकांचे निकाल जाहीर होत असतानाच अचानक नीट परीक्षेचा निकाल दहा दिवस आधीच जाहीर करण्यात आला. त्यामुळे संशयाची सुई निर्माण झाली. ५ मे रोजी या वर्षीची नीट परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी २४ लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यापैकी २३ लाख ३३ हजार विद्यार्थी परीक्षेला बसले.
२०२२ मध्ये पैकीच्या पैकी गुण कोणालाही मिळाले नाहीत. २०२३ मध्ये देशभरातून फक्त दोन मुलांना असे शंभर टक्के मार्क मिळाले होते. या परीक्षेतल्या चार टॉपर्सना ७२० पैकी ७१५ मार्क मिळाले होते. यंदा मात्र ६७ विद्यार्थ्यांना ७२० पैकी ७२० गुण मिळाले आहेत. त्यामुळे या निकालात अनपेक्षित घडल्याने पेपरफुटी आणि परीक्षेच्या निकालात घोळ झाल्याचा आरोप विद्यार्थी आणि पालकांकडून केला जात आहे. विद्यार्थ्यांमध्ये संम्रभ निर्माण व्हावा, अशा काही गोष्टी सोशल माध्यमातून जनतेमध्ये पसरल्या आहेत. अनेक नीट परीक्षेचे टॉपर्स एकाच परीक्षा केंद्रातील आहेत. ज्या विद्यार्थ्यांनी ७१८, ७१९ गुण मिळवले, ते नीट मार्किंग योजनेनुसार अशक्य असल्याचा दावा केला गेला आहे. त्यामुळे बारावी सायन शाखेच्या उच्च माध्यमिक परीक्षेमध्ये मिळालेल्या गुणांच्या आधारेच वैद्यकीय शिक्षणासाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात यावेत, या मागणीला जोर धरू लागला आहे. राज्याराज्यांनी कितीही आदळआपट केली तरीही केंद्रीय स्तरावरील नीट परीक्षेमार्फतच मेडिकल कॉलेजच्या प्रवेशाचा मार्ग जात असल्याने, नीटची जरी विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असले तरी, मेडिकलच्या प्रवेशासाठी भविष्य टांगणीला बांधलेल्या लाखो विद्यार्थ्यांपुढे मेरिट लिस्टच्या यादीत आपले नाव झळकते का? याची प्रतीक्षा करणे सध्या तरी हाती आहे.