मुंबई : सीईटीमार्फत (CET) बीएमएस, बीसीए अभ्यासक्रमांचे प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्यानंतर विद्यापीठांनी या अभ्यासक्रमांचे नामांतर करून सीईटीविनाच विद्यार्थ्यांना महाविद्यालयात प्रवेश दिले आहेत. त्यामुळे एआयसीटीईची मान्यता असूनही अभ्यासक्रमाच्या प्रवेशाबाबत विद्यापीठांकडून घालण्यात आलेल्या गोंधळामुळे अनेक जागा रिक्त राहण्याची शक्यता आहे. तसेच नामांतर केलेल्या अभ्यासक्रमांना प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांचे पुढील शैक्षणिक भवितव्य अडचणीचे ठरणार आहे. बीएमएस व बीसीए या पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी शैक्षणिक वर्ष २०२४-२५ पासून सीईटी बंधनकारक केली आहे.
यासाठी सीईटीकडे ५६ हजार ७९० विद्यार्थ्यांनी अर्ज केले आहेत. एआयसीटीईची मान्यता असलेल्या संस्थांमध्ये सुमारे १ लाखाहून अधिक जागा असण्याची शक्यता आहे. मात्र एआयसीटीईचे कठोर निकष आणि सीईटी कक्षाच्या नियंत्रणातून सुटका होण्यासाठी मुंबई विद्यापीठाने बॅचलर ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अभ्यासक्रमाच्या नावात बदल करण्यास परवानगी दिली आहे.