
मोदींच्या विश्वसनीय टीमकडेच सोपविली महत्त्वाची मंत्रालये
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांच्या कॅबिनेटमध्ये यंदा ७१ मंत्र्यांचा समावेश आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, गृहमंत्री अमित शहा, परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांच्याकडे जबाबदारी सोपवली आहे. राष्ट्रीय हित आणि सुरक्षेच्या दृष्टीने महत्त्वाचे निर्णय घेणाऱ्या सुरक्षा मंत्रिमंडलीय समितीशी निगडित सर्व खाती भाजपाने स्वत:कडे ठेवली आहेत. इतकेच नाही तर नरेंद्र मोदी यांनी पुन्हा त्यांच्या विश्वसनीय टीमकडेच ही मंत्रालये सोपवली आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी सातत्याने त्यांच्या तिसऱ्या कार्यकाळात मोठे निर्णय घेतले जातील, असे सांगत आहेत. मागील १० वर्षे फक्त ट्रेलर होता असे ते म्हणतात. नरेंद्र मोदी यांनी प्रत्येक मंत्र्यांना खातेवाटप केले आहे. त्यात संरक्षण, गृह, परराष्ट्र आणि अर्थ यासारखी हायप्रोफाईल खाती भाजपाकडेच ठेवली आहेत. त्यासोबतच आरोग्य, परिवहन, शिक्षण, ऊर्जा, शहरी विकास, कृषी, वाणिज्य उद्योग, दूरसंचार, पर्यावरण, पर्यटन, महिला व बालविकास, रोजगार, जलशक्ती मंत्रालय हेदेखील भाजपाकडे आहे.
सहकारी पक्षांच्या मदतीने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश
- भाजपा यंदा स्वबळावर बहुमत आणू शकली नाही; परंतु एनडीच्या सहकारी पक्षांच्या मदतीने तिसऱ्यांदा सत्ता मिळवण्यात यश मिळाले आहे. देशात सर्वांसाठी समान कायदा बनवणे हे भाजपाच्या अजेंड्यावर आहे. भाजपाच्या जाहीरनाम्यातही हे आश्वासन आहे. भाजपाने उत्तराखंडमध्ये याचा प्रयोग केला आहे. आता एनडीच्या तिसऱ्या कार्यकाळात यूसीसी लागू करण्यावर भाजपाचा भर असेल. यूसीसीच्या मुद्द्यांवर सहकारी मित्रपक्षांना एकत्र करणे गरजेचे आहे. भाजपाने देशात वन नेशन, वन इलेक्शनचे आश्वासन दिले आहे.