Tuesday, October 8, 2024
Homeताज्या घडामोडीरात्रीस खेळ चाले! फुटपाथ खोदून लाखो रुपयांची केबल लंपास

रात्रीस खेळ चाले! फुटपाथ खोदून लाखो रुपयांची केबल लंपास

केबल चोरणारी टोळी मुंबईत कार्यरत, पाचजण अटकेत

मुंबई : दादर-माटुंगा परिसरात फुटपाथ खोदून त्याखाली असलेली एमटीएनएलच्या (MTNL) युटिलिटी केबल्समधून तांब्याच्या तारांची चोरी (Copper Wire Theft) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. स्थानिक रहिवाशांनी केलेल्या तक्रारीनंतर हा खळबळजनक प्रकार उघडकीस आला. मुंबई पोलिसांनी या प्रकरणात पाच जणांना अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडच्या दादर-माटुंगा मार्गावरील फुटपाथ खोदून तब्बल ६ ते ७ लाख रुपये किमतीच्या तांब्याच्या तारा चोरल्या. तांबे धातुची बाजारात सांगितली जाणारी किंमत ८४५ रुपये प्रति किलो आहे. तांब्याच्या भावामुळे चोरट्यांनी आपला मोर्चा फुटपाथखाली असलेल्या केबल्सकडे वळवला आहे. धक्कादायक म्हणजे माटुंगा, किंग्ज सर्कल, वडाळा आणि शिवाजी पार्कसह रस्ते खोदले जात असलेल्या इतर भागातही अशाच प्रकारच्या चोरीच्या घटना घडत असल्याचे सूत्रांनी म्हटले आहे.

किंग्ज सर्कल आणि दादर टीटी सर्कल दरम्यान अनेक ठिकाणी पदपथ तुरळकपणे खोदण्यात आले आहे. त्यामुळे स्थानिक नागरिकांनी महापालिकेकडे तक्रार केली. प्राप्त तक्रारीवरुन पाहणी केली असता हे खोदकाम पालिकेने केलेच नसल्याचे पुढे आले. त्यामुळे एकच खळबळ उडाली अखेर या प्रकरणाची दखल पोलिसांनीही घेतली. त्यानंतर हा फुटपाथ चोरट्यांनी खोदल्याचे पुढे आले. शहरातील सर्वात रुंद असलेला हा पदपथ पुन्हा खोदण्यापूर्वी बीएमसीने नुकताच सपाट केला होता. रहिवाशांनी बीएमसीला सूचना दिल्यानंतर, तपासणीसाठी कर्मचारी पाठवले, ज्यामुळे युटिलिटी केबल्समधून तांब्याच्या वायरची चोरी झाल्याचे उघड झाले.

वडाळा येथील स्थानिक सामाजिक कार्यकर्ते निखिल देसाई यांनी सांगितले की, “जूनचा पहिला आठवडा संपूनही पदपथ पूर्ववत होण्याचे कोणतेही चिन्ह दिसत नव्हते. त्यामुळे हे काम पूर्ण झाले किंवा नाही याची स्थिती पाहण्यासाठी मी बीएमसीमध्ये गेलो होतो. तेव्हाच मला या केबल्समधून तांब्याच्या तारांची चोरी झाल्याची माहिती मिळाली. चोरांनी रात्री ११ नंतर फूटपाथ खोदून आणि केबल्स काढून ही चोरी केली जात आहे. धक्कादायक म्हणजे हे अतिशय उघडपणे केले जात आहे.

सरकारी दूरसंचार कंपनी एमटीएनएलने दादर-माटुंगा परिसरात ४०० हून अधिक टेलिफोन लाईन्स विस्कळीत झाल्याची तक्रार दाखल केल्यानंतर तपास अधिक तीव्र झाला. “आम्ही अजूनही ते दुरुस्त करत आहोत. हे मुख्यत्वे हा प्रकार दादर टीटी सर्कलच्या आसपास घडला आहे. लाखो रुपये किमतीची १०५ मीटर तांब्याची तार चोरीला गेली आहे,” असे एमटीएनएलच्या अधिकाऱ्याने सांगितले.

माटुंगा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दीपक चव्हाण यांनी सांगितले की, तक्रार प्राप्त होताच पोलिसांनी चोरीच्या संशयित ठिकाणी सापळा रचला. “आम्ही रविवारी रात्री पाळत ठेवून खाजगी गाड्यांमधून संशयितांची वाट पाहत होतो. ते कंत्राटदाराच्या कर्मचाऱ्यांसह तेथे पोहोचल्यावर आम्ही त्यांना अडवून अटक केली. पाचही आरोपी भंगार व्यापारी आहेत आणि त्यांनी तांब्याच्या तारा विकण्याचा कट रचला होता. चोरटे दररोज फुटपाथचे काही भाग खोदण्याचे काम करत होते. या गुन्ह्यात आणखी काही जणांचा सहभाग असण्याची शक्यता आहे, असेही ते म्हणाले. माटुंगा पोलिसांतील आणखी एका अधिकाऱ्याने सांगितले की, “या पाच जणांचे इतर साथीदार आहेत. संपूर्ण भाग खोदणे केवळ पाच जणांना शक्य नव्हते. आम्ही त्यांच्या टोळीतील इतरांचा शोध घेत आहोत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -