वाळवंटात हिरवळ फुलणार?

Share

मिलिंद बेंडाळे, पर्यावरण अभ्यासक

बदल हा सृष्टीचा स्थायीभाव आहे. सृष्टीची उत्पत्ती, स्थिती आणि लय अशाच चक्राचा एक परिणाम वा परिपाक असतो. याच न्यायाने सध्याच्या बदलत्या काळात वातावरणबदल अनुभवास येत असून त्याचे बरे-वाईट परिणाम आपण भोगत आहोत. चांगली बाब म्हणजे वाळवंटी प्रदेश अशी ओळख असणारा थरचा रखरखीत भाग या बदलांमुळे हिरवळीने भरू शकतो. संशोधकांनी अभ्यासाद्वारे ही शक्यता व्यक्त केली.

जलद विकासाचा भारतासह जगभरातील इतर देशांमधील हवामान बदलांवर परिणाम होत आहे. याबाबत शास्त्रज्ञ संशोधनातून वेळोवेळी सावध करत असतात; परंतु तमाम राज्यकर्ते आणि सर्वसामान्य जनता त्यांच्या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करते. योग्य खबरदारी न घेतल्याचे विपरित परिणाम होण्याचा त्यांचा इशारा असतो. आपल्यासाठी, विशेषतः नवीन पिढीसाठी ही बाब चांगली नाही, असे ते वारंवार सांगत असतात. अलीकडेच एका नव्या संशोधनात चांगली बाब पुढे आली. हा अभ्यास राजस्थानच्या थरसह जगभरातील वाळवंटावर करण्यात आला. हवामान बदलाच्या परिणामांमुळे थर वाळवंटातील रखरखीत प्रदेशात बदल घडू शकतो, असे या अभ्यासात म्हटले आहे. वाढत्या तापमानामुळे जगभरातील बहुतांश वाळवंटांचा विस्तार होण्याचा अंदाज वर्तवला जात असताना, थर वाळवंटामध्ये उलट परिणाम दिसू शकतो.

थर हे जगातील १८ वे सर्वात मोठे तर जगातील नववे सर्वात मोठे उष्ण कटिबंधीय वाळवंट आहे. हे राजस्थानपासून पाकिस्तानच्या सिंधपर्यंत सुमारे दोन लाख चौरस मीटरमध्ये पसरलेले आहे. हा अभ्यास ‘अर्थ फ्युचर जर्नल’मध्ये प्रकाशित झाला. अभ्यासात शास्त्रज्ञांनी थरच्या वाळवंटाबद्दल भाकीत वर्तवले आहे. हे शतक संपण्यापूर्वी वाळवंट नाहीसे होईल, म्हणजेच ते हिरवे होईल, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. त्यांच्या अभ्यासात २०५० पर्यंत सहारा वाळवंटाचा आकार सहा हजार किलोमीटरपेक्षा जास्त वाढू शकतो, असा अंदाज व्यक्त केला आहे. इथे लक्षात घ्यायला हवे की, १९०१ ते २०१५ दरम्यान थरच्या वाळवंटातील सरासरी पर्जन्यमान १०-१५ टक्क्यांनी वाढले आहे. हरितगृह वायूंच्या प्रभावामुळे भविष्यात येथील पावसाचे प्रमाण ५० ते २०० टक्क्यांनी वाढू शकते, असा दावा शास्त्रज्ञांनी केला आहे. या अभ्यासात पुढे म्हटले आहे की, भारतीय मॉन्सून पूर्वेकडे सरकल्यामुळे पश्चिम आणि उत्तर-पश्चिम भागात दुष्काळ पडला आणि हळूहळू या भागाचे वाळवंटात रूपांतर झाले.

हजारो वर्षांपूर्वी येथे सिंधू संस्कृती अस्तित्वात होती. नंतर या भागात जोरदार पाऊस सुरू झाला. संशोधकांच्या मते, सध्याच्या मॉन्सूनच्या पश्चिम दिशेच्या विस्तारासह हा कल बदल झाला आहे. तो भारताच्या पश्चिम आणि वायव्य प्रदेशांना मूलत: आर्द्र मान्सून हवामानात बदलू शकतो. या बदलामुळे देशाच्या वाढत्या लोकसंख्येसाठी अन्नसुरक्षा वाढू शकते. जगातील १८ व्या सर्वात मोठ्या थरच्या वाळवंटाला ‘ग्रेट इंडियन वाळवंट’ असेही म्हणतात. हा भारतीय उपखंडाच्या वायव्य भागातील एक शुष्क प्रदेश आहे. तो भारत आणि पाकिस्तानमधील दोन लाख किलोमीटर क्षेत्र व्यापतो. थरच्या वाळवंटाचा ८५ टक्के भाग भारतात, तर १५ टक्के पाकिस्तानमध्ये आहे. थरच्या वाळवंटाने भारताच्या एकूण भौगोलिक क्षेत्रापैकी ४.५६ टक्के क्षेत्र व्यापले आहे. ६० टक्क्यांहून अधिक वाळवंट राजस्थानमध्ये आहे. त्याचा काही भाग गुजरात, पंजाब आणि हरियाणापर्यंत पसरलेला आहे.

जगभरातील अनेक शास्त्रज्ञांनी केलेल्या संशोधनानुसार, येत्या ९० ते १०० वर्षांमध्ये पश्चिम राजस्थानचे वाळवंट नाहीसे होईल. त्यामुळे पश्चिम राजस्थान चार हजार वर्षांपूर्वीसारखे हिरवेगार होईल. पृथ्वीवरील विविध प्रकारचे हवामान आणि पर्यावरणीय बदलांमुळे समुद्र, पर्वत, जंगले, वाळवंट, नद्या इत्यादींमध्ये व्यापक बदल होत आहेत. सृष्टीचक्रात यापूर्वीही असे घडले आहे. आतापर्यंत हिंदी महासागर आणि अरबी समुद्रात वाढणारा मॉन्सून फक्त पूर्व राजस्थानसाठी अधिक दयाळू होता. पश्चिम राजस्थानमध्ये नाही. त्यापेक्षा पश्चिम भारतातील मोठ्या भागात गुजरातमधील कच्छ, राजस्थानमधील थर, पाकिस्तानमधील थर आणि हरियाणा-पंजाबच्या दक्षिणेकडील भागात फारच कमी पाऊस झाला आहे. मात्र गेल्या काही वर्षांमध्ये पश्चिम राजस्थानमधील पावसाची सरासरी प्रतिवर्षी वाढत आहे. बारमेर, जोधपूर, जालोर, सिरोही, पाली आदी भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होत आहे.

२०२३ मध्ये ‘बिपरजॉय’ वादळाने या भागात कहर केला होता. त्याचा परिणाम गुजरात आणि पाकिस्तानमध्येही बघायला मिळाला. गेल्या दोन दशकांमध्ये पश्चिम राजस्थानच्या काही भागात अतिवृष्टी, वादळ आणि चक्रीवादळानंतर अशी दृश्ये सर्रास पाहायला मिळत आहेत. पश्चिम राजस्थानमध्ये इंदिरा गांधी कालवा आल्यावर लोकांनी तिथे शेती करायला सुरुवात केली. श्रीगंगानगर-हनुमानगडचा भाग या पूर्वीच हरित भागात रूपांतरित झाला आहे. आता असेच बदल जैसलमेर, बारमेर, जालोरसारख्या भागांमध्येही दिसत आहेत. पर्यावरणाविषयीच्या वाढत्या जागरूकतेमुळे वनविभाग, विविध सरकारी-निमसरकारी संस्था आणि लोकांनी गेल्या काही दशकांमध्ये थरच्या वाळवंटात मोठ्या प्रमाणावर झाडे लावली आहेत. त्याचाही परिणाम दिसू लागला आहे.

सहारा (आफ्रिका) हे जगातील सर्वात मोठे वाळवंट दर वर्षी विस्तारत आहे. असे असताना थर वाळवंटामध्ये होणारे बदल हा देखील सकारात्मक बदल म्हणायला हवा. या बदलास तोंड देण्यासाठी सरकारी आणि सामाजिक पातळीवर आतापासूनच तयारी करायला हवी. या संपूर्ण परिसरात पावसाच्या पाण्याची बचत करणे, नद्या, तलाव, ओढे यांचे व्यवस्थापन करणे, हिरवाई टिकून राहण्यासाठी काम होणे गरजेचे आहे. निसर्ग आपले काम करत असतो. त्याच्याशी ताळमेळ राखून आपणही चांगला पुढाकार घेतला पाहिजे.

आधी उल्लेख केल्याप्रमाणे दहा हजार वर्षांपूर्वी गुजरात, राजस्थान, हरियाणा, पंजाब आणि पाकिस्तानच्या भागांमध्ये सिंधू संस्कृतीचे पुरावे सापडले आहेत. सुफल भाग असल्यामुळे लोथल, पिलीबंगा, कालीबंगा, अहार, धोलावीरा, राखीगढी, मोहेंजोदारो या सर्व प्रदेशांची भरभराट झाली. त्या वेळी या प्रदेशांमध्ये मॉन्सूनची सक्रियता अधिक होती. नंतर, मॉन्सून पूर्वेकडे सरकू लागला आणि हा भाग हळूहळू कोरड्या आणि वालुकामय भागात बदलला. आता पश्चिमेकडील भागात नैऋत्य मोसमी वारे पुन्हा पाऊस आणत आहेत.

अरवली पर्वताने देशातील हिरवेगार, डोंगराळ भाग वाळवंटात बदलण्यापासून वाचवले आहेत. या पार्श्वभूमीवर अरवली वाचवणे अत्यंत गरजेचे आहे. तो निसर्गाचा एक महत्त्वाचा भाग आहे. वाढत्या जागतिक तापमानवाढीमुळे हिंदी महासागर सतत गरम होत आहे. शास्त्रज्ञांनी या परिस्थितीला ‘इंडियन ओशन वॉर्म पूल’ असे नाव दिले आहे. या ऊबदार तलावामुळे हिंदी महासागराचा एक भाग असणाऱ्या अरबी समुद्रातून वाढणारा मान्सून पश्चिमेकडे अधिक सरकत आहे. त्यामुळे, राजस्थान आणि गुजरातमध्ये गेल्या काही दशकांपासून सामान्यपेक्षा जास्त पाऊस झाला आहे. त्या खालोखाल हिमाचल प्रदेश आणि तेलंगणा यांचा क्रमांक लागतो. तिथे अनुक्रमे ६३ आणि ६२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. भारतीय हवामान विभागाच्या अहवालानुसार, राज्यांमधील पावसाचे आकडे १९६१ ते २०१० आणि १९७१ ते २०२० या काळात बदलले आहेत. पावसाचा ट्रेंड सर्वाधिक आणि वेगाने बदलला आहे अशा राज्यांच्या यादीमध्ये राजस्थानचाही समावेश होतो.

गेल्या दोन दशकांमध्ये बारमेर, जैसलमेर, नागौर, पाली, जालोर, सिरोही, जोधपूर यांसारख्या भागांमध्ये डाळिंब, पेरू, सफरचंद, द्राक्षे ही फळे; मेथ्या, जिरे, मिरची यांसारखे मसाले तसेच पालक, कोबी, मटार, बटाटे, टोमॅटो, वांगी इत्यादींच्या लागवडीतही लक्षणीय वाढ झाली आहे. राजस्थानमध्ये गेल्या दोन-तीन दशकांमध्ये, पश्चिम विभाग (थर) आणि पूर्वेकडील प्रदेशांमध्ये (अरवली) पर्जन्यमान अनुक्रमे ३२ आणि १४ टक्क्यांनी वाढले आहे. २०२४ ते २०४९ दरम्यान, राजस्थानच्या पश्चिम भागात पावसाचे प्रमाण २० ते ३५ टक्क्यांनी वाढेल, तर पूर्वेकडील भागांमध्ये ही वाढ पाच ते २० टक्क्यांच्या दरम्यान राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राजस्थानच्या पश्चिम भागात असणाऱ्या काही जिल्ह्यांचे कमाल तापमान ४५ ते ४७ अंशांच्या दरम्यान आहे. मात्र असे असताना गेली दोन दशके सतत जुलै ते सप्टेंबर दरम्यान कोणत्या ना कोणत्या भागात पूरसदृश परिस्थिती उद्भवते.

राजस्थानमध्ये १९६१ ते २०१० या ५० वर्षांमध्ये सरासरी ४१४ मिलिमीटर पाऊस पडला. त्याच वेळी १९७१ ते २०२० दरम्यान, हा आकडा ४३५ मिलिमीटरपर्यंत वाढला आहे. कमी पाऊस पडत असणाऱ्या जिल्ह्यांमध्ये आता सर्वाधिक पाऊस पडत आहे. पश्चिम राजस्थानमध्ये गेल्या दशकांत जास्त पाऊस झाला आहे. थोडक्यात मान्सूनने पश्चिम राजस्थानवर कृपा केली असून पूर्व राजस्थानमध्ये २०२२ मध्ये नियोजित आकड्यापेक्षा २५ टक्के जास्त पाऊस झाल्याची नोंद आहे. पश्चिम राजस्थानमध्ये ते प्रमाण ५८ टक्के अधिक होते. याचा अर्थ आता वाळवंट संपून हिरवळीचे दिवस येणार आहेत.

Recent Posts

Virar Waterfall : विरारमध्ये धबधबा शोधताय? आ जाओ बॉस दिखा देंगे…

मुंबई : मुंबई शहरातील विरार हे एक गजबजलेले उपनगर आहे. मुंबईत असले तरीही अनेकजण या…

15 mins ago

Vicky Kaushal : कतरिना प्रेग्नंट आहे का? अखेर विकी कौशलने पॅपराझींच्या प्रश्नाला दिलं उत्तर!

लवकरच येणार 'ती' न्यूज... मुंबई : बॉलिवूडमध्ये (Bollywood) आपल्या विविधांगी भूमिकांनी अल्पावधीतच प्रेक्षकांच्या मनात स्थान…

39 mins ago

Indian Army : नदीची पातळी वाढल्याने भारतीय सैन्यदलाच्या रणगाड्यांचा मोठा अपघात!

दुर्घटनेत ५ जवान शहीद लेह : कारगिलच्या लेह जिल्ह्यातून एक मोठी बातमी समोर आली आहे.…

1 hour ago

UGC NET Exam : पेपरफुटी प्रकरणाला बसणार लगाम! आता ‘या’ पद्धतीने होणार परीक्षा

परीक्षेत नव्या विषयाची पडणार भर; तारखा जाहीर मुंबई : यूजीसी नेटचा पेपर (UGC NET Exam)…

1 hour ago

RBI Action : आरबीआयचा अ‍ॅक्शन मोड! नियमांचे उल्लंघन केलेल्या ‘या’ बँकेवर लाखोंची कारवाई

मुंबई : देशातील आर्थिक डबघाईला आलेल्या बँकांसह नियमांचे उल्लंघन करणाऱ्या बँकांवर आरबीआय (RBI) नेहमीच महत्त्वाची…

2 hours ago