नरेंद्र मोदी यांनी देशाचे पंतप्रधान म्हणून शपथ घेतली, त्याचबरोबर तीन विक्रमांची निर्मिती झाली. सध्या टी-२० क्रिकेटचा विश्वचषक सुरू आहे. क्रिकेटच्या सारीपाटावर षटकार-चौकार, बळी, धावा याचे नवनवीन विक्रम घडत असताना देशाच्या राजकारणातही मोदींच्या शपथविधीमुळे काही विक्रम नव्याने घडले आहेत. सलग तीन वेळा पंतप्रधानपदाची शपथ घेणारे पंडित जवाहरलाल नेहरू यांच्यानंतर ते देशाचे दुसरे पंतप्रधान ठरले आहेत. मोदींबरोबर एनडीएचे सरकारही तिसऱ्यांदा सलग सत्तेवर आले आहे. नरेंद्र मोदी, भाजपा व एनडीएचे सरकार पुन्हा सत्तेवर येणार आणि नरेंद्र मोदी हेच सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदी विराजमान होणार, ही काळ्या दगडावरची रेघ होती. गेल्या दहा वर्षांमध्ये मोदी यांनी केलेल्या जनकल्याणकारी कामाची पोहोचपावती जनतेने मतदानातून दिल्याने तिसऱ्यांदा देशामध्ये मोदी पर्व सुरू झाले आहे. काँग्रेसला देशाच्या स्वातंत्र्यापासून ६० वर्षांच्या कालावधीत जे जमले नाही, ते मोदी सरकारने दहा वर्षांमध्ये करून दाखविल्याने ‘अब की बार, मोदी सरकार’ हे घोषवाक्य भारतीयांच्या मनावर बिंबवले होते.
मोदींनी महाराष्ट्राच्या जनतेवर नेहमीच भरभरून प्रेम केले आहे. त्यामुळे लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाच्या जागा घटूनही सरकारच्या पहिल्याच शपथविधी कार्यक्रमात महाराष्ट्राला झुकते माप देण्याला मोदींनी प्राधान्य दिले. महाराष्ट्रातील भाजपाचे अग्रणी नेतृत्व असणाऱ्या नितीन गडकरींचा मोदींनी मंत्रिमंडळात समावेश केला, इतकेच नाही तर शपथविधी सोहळ्यात त्यांना चौथ्या क्रमाकांवर पाचारण करताना भाजपा व महाराष्ट्राचे एक आगळे-वेगळे नाते असल्याचे संकेतही मोदी यांनी यातून दिले. लोकसभा निवडणुकीत १४ जागा गमावल्यानंतर नरेंद्र मोदी यांच्या ७१ सदस्यीय मंत्रिमंडळात महाराष्ट्रातील ६ जणांची निवड झाली आहे. यामध्ये भाजपाला चार, तर मित्रपक्षांना दोन जागा मिळाल्या आहेत. नितीन गडकरी आणि पीयूष गोयल या दोन ज्येष्ठ नेत्यांचा मोदींनी पुन्हा मंत्रिमंडळात समावेश केला आहे. याशिवाय महाराष्ट्रातून निवडून आलेल्या १७ भाजपा खासदारांपैकी रक्षा खडसे आणि मुरलीधर मोहोळ या आणखी दोन खासदारांचाही मंत्रिमंडळात समावेश करण्यात आला आहे. अर्थात हे आघाडी सरकार असल्याने मंत्रिमंडळामध्ये केवळ एका पक्षाच्या सर्वांचाच समावेश होणे शक्य नव्हते. मित्रपक्षाच्या घटकांचाही समावेश करणे आवश्यक होते.
उत्तर महाराष्ट्रातील रावेर मतदारसंघातून तिसऱ्यांदा लोकसभेवर निवडून आलेल्या रक्षा खडसे यांचा समावेश मंत्रिमंडळात करण्यात आला आहे. रक्षा या लेवा पाटील समुदायातून येतात, ज्यांचे उत्तर महाराष्ट्रातील काही भागांमध्ये मजबूत अस्तित्व आहे. दुसरे नाव आहे ते भाजपाच्या तिकिटावर पुण्यातून निवडून आलेले मुरलीधर मोहोळ यांचे. मोहोळ हे मराठा असून ते पश्चिम महाराष्ट्रातील राजकीयदृष्ट्या महत्त्वाच्या प्रदेशातून पक्षाचे प्रतिनिधित्व करणार आहेत. ऑक्टोबर महिन्यात महाराष्ट्र राज्याच्या विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक होत असून त्यादृष्टीने भाजपाने एक प्रकारे ही मोर्चेबांधणी करत कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांना तसे संकेतही दिले आहेत. जरांगे-पाटील यांच्या मराठा आंदोलनाचा फटका काही प्रमाणात भाजपाला निवडणुकीत बसला असून रावसाहेब दानवे, पंकजा मुंडेंसारखे मातब्बर त्यामुळेच पराभूत झाले आहेत. त्याचाही विचार करून मराठा समाजातील तळागाळातील नेतृत्व म्हणून परिचीत असणाऱ्या मुरलीधर मोहोळ यांना प्रथमच लोकसभेत गेलेले असतानाही मंत्रीपद देण्यात आले.
देशामध्ये विस्कटलेल्या आर्थिक घडीला शिस्त लावण्याचे काम खऱ्या अर्थाने मोदी सरकारने दहा वर्षांमध्ये केले आहे. मोदी सरकारच्या दहा वर्षांच्या कालावधीत पंतप्रधान मोदींसह त्यांच्या मंत्रिमंडळातील कोणत्याही सहकाऱ्यांवर पाच पैशाचाही भ्रष्टाचार केल्याचा आरोप विरोधी पक्षाला करता आलेला नाही. स्वच्छ, पारदर्शक व भ्रष्टाचारविरहीत कारभार ही मोदी सरकारची दहा वर्षांतील जमेची बाजू आहे. अर्थकारणाला शिस्त लावताना परकीय धोरणातही मोदी सरकारने सुधारणा केली आहे. जागतिक पातळीवर भारताची आदरयुक्त प्रतिमा निर्माण झाली. जागतिक घडामोडींबाबत निर्णय घेताना प्रगत राष्ट्रांना आज भारताच्या अस्तित्वाची दखल घेणे भाग पडत आहे. देशातील हिंसाचार, जातीय दंगली, दहशतवादाचे प्रमाण मोदी राजवटीच्या काळात जवळपास संपुष्टात आले आहे. सीमेपलीकडून होणाऱ्या कुरापतींनाही मोदी राजवटीत आळा घातला गेला आहे. ‘न खाऊँगा और न खाने दूँगा’ अशी घोषणा देतच मोदी दहा वर्षांपूर्वी पंतप्रधानपदी विराजमान झाले होते. आपल्या कारभारात त्यांनी ते वास्तवात करूनही दाखविले. उलटपक्षी यापूर्वी केलेल्या भ्रष्टाचाऱ्यांची चौकशी करून इंडिया आघाडीच्या घटकांनी केलेला भ्रष्टाचार उजेडात आणला आहे.
भ्रष्टाचाऱ्यांना तुरुंगात धाडले असून त्यांची न्यायालयीन, ईडी व अन्य शासकीय यंत्रणांकडून चौकशी सुरू आहे. सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे अयोध्येतील राम मंदिर हे होय. देशातील जनता ज्या स्वप्नाची गेल्या ५०० वर्षांहून अधिक काळ वाट पाहत होती, ते स्वप्न मोदींमुळेच प्रत्यक्षात वास्तवात साकारले गेले आहे. यापूर्वी बिगर भाजपा सरकारांनी राम मंदिराच्या निर्मितीकडे दुर्लक्ष केले होते. अल्पसंख्याकांना चुचकारण्याच्या नादात त्यांनी बहुसंख्याक असणाऱ्या हिंदूंच्या भावनांना पायदळी तुडविण्याचे काम केले होते. मोदींमुळेच अयोध्येत राम मंदिराचे काम झाले व त्या ठिकाणी रामलल्ला विराजमान झाले. आपल्या सरकारमध्ये सलग तिसऱ्यांदा मोदींनी रामदास आठवले यांची केंद्रीय राज्यमंत्रीपदी वर्णी लावली आहे. देशातील आंबेडकरी नेतृत्वाचा एक प्रकारे रामदास आठवलेंच्या माध्यमातून गौरव करताना या समाजाचाही मंत्रिमंडळात समावेश केला आहे. याशिवाय निर्मला सितारामन यांची मंत्रिमंडळात वर्णी लावताना अर्थमंत्रीपदावरून त्यांनी केलेल्या गौरवास्पद कामगिरीचा एक प्रकारे सत्कारच केला आहे.
भाजपाला स्वबळावर बहुमत न मिळाल्याने आघाडीचे सर्वसमावेशक सरकार पाच वर्षे चालवावे लागण्याचे अग्निदिव्यही पुढील काळात मोदींना करून दाखवावे लागणार आहे. आगामी काळात महाराष्ट्रासह अन्य काही राज्यांच्या विधानसभा निवडणुका होत असल्याने या निवडणुकांचीही तयारी भाजपाला करावी लागणार आहे. लोकसभा निवडणुकीत अपेक्षित यश न मिळाल्याचे दु:ख विसरून भाजपाला नव्याने सुरुवात करावी लागणार आहे. देशाला मोदी सरकारकडून खूप अपेक्षा आहेत. गेल्या दहा वर्षांतील मोदी यांचा कारभार पाहिल्यामुळे देशातील जनतेच्या मोदींबाबतच्या अपेक्षा उंचावल्या आहेत. मोदी त्या अपेक्षा नक्कीच पूर्ण करतील. देशापुढील समस्या सोडविण्यास व देशाची प्रगती करण्यास मोदी निश्चितच सक्षम आहेत. त्यांना पंतप्रधान म्हणून देशाचा कारभार चालविण्यासाठी देशातील जनता त्यांच्यासोबत आहे. आजवरच्या अन्य पंतप्रधानांच्या तुलनेत मोदींची लोकप्रियता कैक पटीने अधिक आहे.
मुंबई: "भिऊ नको मी तुज्या पाठीशी आहे" संकट काळात स्वामी समर्थांच हे वाक्य जगण्यासाठी नवी…
शिबानी जोशी जगभरात आज मराठी माणूस पोहोचला आहे. अमेरिका, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशात शिक्षणाच्या निमित्ताने, नोकरीच्या…
वर्षा फडके - आंधळे जागतिक ऑडिओ-व्हिज्युअल आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वपूर्ण पर्व ठरणारी ‘वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल…
काश्मीरमध्ये गेले दोन दिवस पावसाने हाहाकार माजवला आहे आणि असे वाटते आहे की, निसर्गाचा कोप…
पंचांग आज मिती चैत्र कृष्ण नवमी शके १९४७. चंद्र नक्षत्र श्रवण. योग शुभ. चंद्र राशी…
किमतीचे नवे सूत्र समिती ठरवणार मुंबई : स्वत:च्या हक्काचे घर घेण्याचे अनेकांचे स्वप्न असते. मात्र…