Sunday, July 7, 2024
Homeताज्या घडामोडीNaresh Mhaske : नरेश म्हस्के मागच्या दरवाजाने राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल!

Naresh Mhaske : नरेश म्हस्के मागच्या दरवाजाने राज ठाकरेंच्या शिवतीर्थावर दाखल!

म्हणाले, ‘चर्चा तर होणारच!’; नेमकं काय आहे भेटीमागचं कारण?

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे नेते नरेश म्हस्के (Naresh Mhaske) हे नुकतेच लोकसभा निवडणुकीत ठाणे लोकसभा (Thane Loksabha) मतदारसंघातून खासदार म्हणून निवडून आले. यानंतर आज त्यांनी शिवतीर्थावर मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांची भेट घेतली. मात्र, या भेटीसाठी ते मागच्या दाराने शिवतीर्थावर (Shivtirtha) दाखल झाले, त्यामुळे या भेटीची विशेष चर्चा होत आहे. दरम्यान, यावर नरेश म्हस्के यांनी भेटीनंतर माध्यमांना प्रतिक्रिया दिली आहे. ‘राज ठाकरेंचा आशीर्वाद घेण्यासाठी आलो होतो’, असं ते यावेळी म्हणाले.

नरेश म्हस्के म्हणाले, ‘राजसाहेबांनी स्वतः धर्मवीर आनंद दिघेसाहेब यांच्या कार्यालयाला आणि घराला भेट दिली होती. ठाणे व कल्याण लोकसभेसाठी त्यांनी महायुतीसाठी सभा देखील घेतली होती. राजसाहेबांचं मार्गदर्शन काय माझ्या पाठीशी असतं. ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली मी भारतीय विद्यार्थी सेनेचं काम सुरु केलं तेव्हासुद्धा ते माझ्या पाठीशी ठामपणे उभे होते. त्यामुळे आयुष्यात खासदारकीसारखं पद मिळाल्यानंतर त्या नेत्याचे आशीर्वाद घेणं मला क्रमप्राप्त ठरतं’, असं म्हस्के म्हणाले.

विधानसभा निवडणुकीसाठी शिवसेनेच्या रणनितीबाबत विचारले असता म्हस्के म्हणाले, ‘विधानसभेच्या आणि महानगरपालिकेच्या निवडणुका आता जवळ येत आहेत. मतदारसंघाच्या दृष्टीने जी काही समीकरणं बदलली आहेत, काही लोक विशिष्ट समाजाचं दृष्टीकरण करत आहेत आणि लोकांमध्ये, काही समाजांमध्ये, काही धर्मांमध्ये गैरसमज पसरवत आहेत, ते कशा पद्धतीने आपण लोकांसमोर मांडायला पाहिजे, तसंच त्यांचा जो खरा चेहरा आहे तो लोकांसमोर उघडा पाडायचाय, त्या दृष्टीने रणनिती आम्ही आखली आहे’. याच बाबतीत राज ठाकरेंशी चर्चा झाली का असं विचारलं असता, ‘चर्चा तर होणारच’ असं सूचक विधान नरेश म्हस्के यांनी केलं.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

- Advertisment -