प्रवाशांकडून प्रशासनावर तीव्र संताप
मुंबई : काही दिवसांपूर्वी रेल्वे फलाट विस्तारीकरणासाठी मेगाब्लॉक (Megablock) घेतला होता. त्यावेळी असंख्य रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला होता. मात्र तरीही मध्य रेल्वेची (Central Railway) परिस्थिती फारशी सुधरली नसल्याचे चित्र दिसून येत आहे. तीन दिवसीय जम्बोब्लॉक नंतरही खोळंबा होत असल्यामुळे प्रवाशांकडून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रेल्वे मार्गावर सुधारणा करूनही कालपासून अनेक गाड्या उशिराने धावत असल्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला होता. दादर (Dadar) ते सीएसएमटी (CSMT) स्थानकादरम्यान रेल्वेचा वेग मंदावल्याने प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागला होता. आजही परिस्थितीत फारशी सुधारणा नसल्यामुळे प्रवाशांना अडचणींचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे प्रवाशांनी जास्तीचा वेळ हातात घेऊन प्रवासासाठी निघावे, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे.
प्रवाशांकडून प्रशासनावर संताप
पावसाळ्याच्या दिवसांमध्ये रेल्वे रुळांवर पाणी आल्यानंतरही मध्य रेल्वेवरील अनेक गाड्यांचा वेग मोठ्या फरकाने मंदावतो. त्यातच आता विलंबात यंत्रणेमुळे होणाऱ्या उशिराची भर पडताना दिसत आहे. त्यामुळे कामावर जाणाऱ्यांसह इतर प्रवाशांकडून प्रशासनावर संताप व्यक्त केला जात आहे.