‘या’ दिवशी प्रदर्शित होणार मिर्झापूर ३
मुंबई : आजवर सगळ्यात जास्त गाजलेली वेबसिरीज म्हणजे मिर्झापूर (Mirzapur). क्राईम-थ्रिलर या विषयावर बेतलेल्या या वेबसिरीजचे दोन्ही सीजन खूप गाजले. कालीन भैय्याचं गुन्हेगारी जग आणि त्यात सुरु असलेली सत्तेची चढाओढ यावर ही वेबसिरीज आधारलेली होती. मिर्झापूरच्या पहिल्या दोन सीझनला चाहत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला होता. त्यानंतर आता लवकरच मिर्झापूरचा तिसरा सीजन प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. निर्मात्यांनी मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनच्या दमदार टीझरसह रिलीज डेट जाहीर केली आहे.
‘या’ तारखेला होणार प्रदर्शित
अॅमेझॉन प्राइमकडून ‘मिर्झापूर’ च्या तिसऱ्या सिझनच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर केली आहे. प्राईम व्हिडीओने ‘कर दिए है प्रबंधन मिर्जापूर ३ का’ अशा कॅप्शनसह पोस्टर रिलीज केले आहे. ५ जुलैपासून ही वेब सीरिज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
दरम्यान, ‘मिर्झापूर सीझन ३’ मध्ये यावेळी मुन्ना भैयाची भूमिका साकारणारा दिव्येंदू शर्मा दिसणार नाही. मागील सीझनच्या शेवटच्या एपिसोडमध्ये गुड्डू भैया आणि गोलू मिळून मुन्ना भैय्याला चकमकीत ठार करतात आणि सूड उगवतात. तर शरद शुक्ला कालीन भैय्याला वाचवण्यात यशस्वी होतो. या सीझनमध्येही मिर्झापूरच्या सत्तेच्या खुर्चीसाठी संघर्ष सुरू राहणार आहे. ही खुर्ची कोणाला मिळणार हे पाहणे उत्सुकतेचे ठरणार आहे.