Wednesday, April 23, 2025
Homeताज्या घडामोडीAditya Sarpotdar : मुंज्याच्या यशानंतर आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट!

Aditya Sarpotdar : मुंज्याच्या यशानंतर आदित्य सरपोतदारचा आणखी एक हॉररपट!

‘ही’ जोडी दिसणार मुख्य भूमिकेत

मुंबई : मराठी सिनेसृष्टीला ‘नारबाची वाडी’, ‘उलाढाल’, ‘झोंबिवली’, ‘सतरंगी रे’, ‘माऊली’ असे अनेक उत्तमोत्तम चित्रपट देणारा मराठमोळा दिग्दर्शक आदित्य सरपोतदार (Aditya Sarpotdar) आता हिंदी चित्रपटसृष्टीत आपलं नाव कमावत आहे. त्याने दिग्दर्शित केलेला ‘मुंज्या’ हा चित्रपट (Munjya Movie) कोणतंही बिग बजेट नसताना आणि स्टारकास्टही नसताना प्रेक्षकांना सिनेमागृहात खेचून आणतो आहे. केवळ तीन दिवसांत या सिनेमाने २० कोटी रुपयांची कमाई केली आहे. मुंज्याच्या या यशानंतर आदित्य आपल्या नव्या प्रोजेक्टकडे वळणार आहे. एक नवा हॉररपट घेऊन तो प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ‘ककुडा’ (Kakuda) असं या चित्रपटाचं आहे

निर्माता रॉनी स्क्रूवाला यांनी २० जुलै २०२१ रोजी ‘ककुडा’ या चित्रपटाची घोषणा केली होती. यानंतर आता सिनेमा प्रदर्शित करण्याच्या कामाला सुरुवात केली जाणार आहे. बॉलिवूड आणि मराठीमध्ये आपल्या अभिनयाची छाप सोडणारा लय भारी अभिनेता रितेश देशमुख (Riteish Deshmukh) या सिनेमात मुख्य भूमिकेत पाहायला मिळणार आहे. तर सध्या भन्साळींच्या ‘हिरामंडी’ या वेब सिरीजमुळे प्रचंड चर्चेत असलेली अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha) रितेशच्या जोडीला या चित्रपटात मुख्य भूमिका साकारणार आहे.

रितेशचा हा आदित्य सरपोतदारसोबतचा दुसरा चित्रपट आहे. याआधी दोघांनी ‘माऊली’ या मराठी चित्रपटासाठी एकत्र काम केलं होतं. आता ते ‘ककुडा’ या चित्रपटातून पुन्हा एकत्र दिसणार आहे. भारतीय लोककथेवर हा चित्रपटाची कथा आधारीत आहे. ककुडादेखील हॉरर कॉमेडी चित्रपट आहे. या चित्रपटाचे लेखन चिराग गर्ग आणि अविनाश द्विवेदी यांनी केले आहे. तर या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला यांनी केली आहे.

सिनेमा ओटीटीवर होणार रिलीज?

मिळालेल्या माहितीनुसार, ‘ककुडा’ हा चित्रपट ओटीटीवर रिलीज होणार असल्याचे म्हटले जात आहे. मात्र, आदित्य सरपोतदारने याबाबत कोणतेही भाष्य केले नाही. ओटीटी अथवा थिएटरमध्येही हा चित्रपट रिलीज होऊ शकतो. येत्या २-३ महिन्यात हा चित्रपट रिलीज होईल असे आदित्यने सांगितले आहे.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -