सेवाव्रती: शिबानी जोशी
शेती हा भारतीय अर्थकारणाचा, जीवनशैलीचा व संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. शेतकरी सक्षम व सुखी झाला, तर समाज व पर्यायाने देश सक्षम व संपन्न होईल, अशी धारणा ठेवून सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे “शेती परिवार कल्याण संस्था” मागच्या चार दशकांहून अधिक काळ कार्यरत आहे. संस्थेची खरी सुरुवात झाली शेळी पालनाच्या बंदिस्त पद्धतीतून. शेळ्यांचे बंदिस्त पद्धतीने खाणं सुरू झाल्यानंतर प्रजोत्पादन व संशोधन, जनावरांच्या संकरीकरणावर भर, स्थानिक जातीवर संशोधन करून प्रजोत्पादन अशा गोष्टींवर संशोधन केले जाऊ लागले.
सांगली जिल्ह्यातील आटपाडी हा पाणीटंचाईग्रस्त तालुका, सतत पाण्याची वाट पाहणारा तालुका. पण इथे पाणीप्रश्न व त्यावर अवलंबून उद्योगांवर संशोधन करणारा एक संशोधक निपजला तो म्हणजे नारायणराव देशपांडे. शेळ्या-मेंढ्यांना माळरानावर मोकाट सोडून देण्यापेक्षा बंदिस्त चारा उपलब्ध करून द्यावा यासाठी नारायणराव देशपांडे यांनी प्रयत्न सुरू केले आणि त्यांच्या प्रयत्नांना यश आले. या पद्धतीमुळे त्यांना एक आगळीवेगळी पदवी प्रदान झाली ती म्हणजे “बकरी पंडित”. नारायणराव देशपांडे यांचा जन्म शेतकरी कुटुंबात झाला. त्यांच्या घरी दोन-चार शेळ्या होत्या. लहानपणापासूनच ते मोकाट सुटलेल्या शेळ्यांना इथे तिथे चरताना पाहत असत आणि त्यांच्या लक्षात येत असे की, या शेळ्या उत्पन्न खूप देतात पण त्यापेक्षा जास्त निसर्गाची हानी करतात. यांना मोकाट सोडण्यापेक्षा बंदिस्त पद्धतीने चारा दिला, तर खूप फायद्याचे ठरेल आणि त्यातूनच १९७६ साली त्यांचा शेळी प्रकल्प सुरू झाला. शेळी संशोधन सुरू केल्यावर देशपांडे यांच्या शेळ्यांची काही वैशिष्ट्ये लक्षात आली की शेळी हा अतिशय माणसाळलेला प्राणी आहे. त्यांना माणसांचा सहवास आवडतो. तसंच ते अतिशय स्वच्छता प्रिय आहेत.
घाणेरडी जमीन असेल, तर ते रात्रभर त्या जमिनीवर बसत नाहीत, उभे राहतात. शेळी, बकरी प्रामुख्याने मांसासाठी पाळली जाते आणि मेंढ्या लोकर, ब्लॅकेट्स आणि इतर वस्तू विणण्यासाठी लोकप्रिय आहेत. त्यांची कामाची सुरुवात १९७६ पासून शेळी बंदिस्त करणे या उपक्रमातून झाली. त्यानंतर शेळ्यांचे व्यवस्थापन आणि त्यांना बंदिस्त ठिकाणी खाण्याचे ट्रेनिंग देणे सुरू केले. शेळ्या हे सर्व अतिशय योग्य पद्धतीने शिकून घेतात असं त्यांच्या लक्षात आलं. बंदिस्त शेळी पालन सुरू झाल्यावर त्यांच्या चाऱ्याचा प्रश्न उभा राहिला. त्यामुळे देशपांडे यांनी पडीक जमिनीवर सहजरीत्या जगू शकतील अशी झाडे लावली आणि चाऱ्याचा प्रश्न सोडवला. बंदिस्त शेळीपालनाच्या या संशोधनाचं हळूहळू कौतुक होऊ लागलं आणि अनेक शासकीय अधिकारी, मंत्री गण त्यांच्या या प्रकल्पाला भेट देऊ लागले. या कामाची दखल घेऊन ज्येष्ठ नेते राम नाईक, गोपीनाथ मुंडे, प्रकाश जावडेकर अशा अनेकांनी प्रकल्पाला भेट देऊन नावीन्यपूर्ण उपक्रमाचं कौतुक केलं आहे. बंदिस्त शेळीपालनाचा आयाम वाढत गेला त्यातून मग १९८५ साली “शेती परिवार कल्याण संस्थेची” निर्मिती झाली.
संस्थेचे संस्थापक अध्यक्ष नारायणराव देशपांडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुरू केलेल्या संस्थेचे सध्या शुभदा देशपांडे, प्रसाद देशपांडे, संजय भागवत, चंदनराव पाटील, मदनराव देशपांडे, गोरख पाटील, अशोकराव देशपांडे, शामराव गेजगे, विजयकुमार कुलकर्णी अशी सर्व शेतकी, डॉक्टरी पेशातील मंडळी संचालक मंडळावर कार्यरत आहेत. संस्थेमध्ये प्रशिक्षणाला खूप महत्त्व आहे. राजेश कुलकर्णी संस्थेचे प्रशिक्षण प्रमुख म्हणून उत्तम कार्य करत आहेत. बंदिस्त शेळीपालनाचा हा उपक्रम यशस्वी होत आहे म्हटल्यानंतर शेळी उत्पादन आणि त्यांच्या विक्रीला देखील संस्थेने सुरुवात केली. ज्याप्रमाणे कुक्कुटपालनात कोंबड्यांची पैदास, त्यांचं खाणं, लसीकरण आणि विक्री हे टप्पे असतात, त्याचप्रमाणे बकरी पालनात देखील हे टप्पे अवलंबून नफा मिळवता येतो हे देशपांडे यांनी स्वतः दाखवून दिले. देशपांडे यांना शेळी पालनामध्ये संशोधन आणि यशस्विता यांची खात्री पटल्यानंतर त्याला एक संस्थात्मक रूप द्यावं असं त्यांना वाटलं आणि त्यातूनच शेती परिवार कल्याण संस्थेची स्थापना झाली. त्यानंतर संस्थेतर्फे एक अभिनव चळवळ सुरू करण्यात आली.
शेतकऱ्याने स्वतःच्या शेतीचा हिशोब लिहिणं, त्यासाठी एक डायरी संस्थेने तयार केली. या हिशोब वहीला “कृषी नारायण दैनंदिनी” असं नाव देण्यात आलं. यात शेतकरी उत्पादन खर्च, हवामान, बाजारभाव, उपलब्ध पाणी अशा सर्व गोष्टींची नोंद करू शकतो. याचा उपयोग त्याला आपल्या शेतीचा आढावा घेण्यासाठी होतो. पहिल्या दहा वर्षांत एक हजार शेतकरी या दैनंदिनीचा उपयोग करू लागले. ‘कृषी नारायण दैनंदिनी’ ही अशी एक डायरी आहे, जी शेतकऱ्याला लागवडीसाठी वापरल्या जाणाऱ्या प्रत्येक वस्तूची नोंद ठेवायला मदत करते. उदा. कोणत्या शेतात कोणते पीक निवडले आहे, खतं कोणती वापरली आहेत आणि त्यांची किंमत, मजुरीचे शुल्क, पिकाची वाढ, निरीक्षण, कोणत्याही किडीच्या हल्ल्यासाठी केलेले उपचार, इ. या नोंदी शेतकऱ्यांना इतक्या उपयोगी पडू शकतील की, त्या आधारे ते पुढच्या वर्षी पाण्याचं, शेतीचं व्यवस्थापन, उन्हाळी पीक घेणे या गोष्टी सुद्धा करू शकतात. ही दैनंदिनी अनेक शेतकरी वापरू लागले आहेत आणि ती अधिकाधिक शेतकऱ्यांकडे पोहोचावी अशी संस्थेची इच्छा आहे. त्याचबरोबर या दैनंदिनीवर आधारित एक अभ्यासक्रम सुरू करण्याचा संस्थेचा विचार आहे असं प्रसाद देशपांडे यांनी सांगितलं.
संस्थेने शेळी, शेती आणि पाणी व्यवस्थापनासाठी प्रशिक्षणाचे एक पद्धतशीर आणि वैज्ञानिक मॉड्यूल विकसित केले आहे, जे केवळ शेतकऱ्यांना प्रशिक्षित करत नाही, तर त्यांना उपलब्ध संसाधनांचा सर्वोत्तम वापर करण्यासाठी पुरेसे प्रशिक्षीतही बनवते. शेळीपालनाचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर गाई पाळणे, चारा विकास, कृषी प्रक्रिया, कृषी संलग्न प्रशिक्षण, दूध प्रक्रिया, वर्मी कंपोस्ट, धान्याची प्रतवारी अशा अनेक क्षेत्रांत गावोगावच्या शेतकऱ्यांना प्रशिक्षण आयोजित करत असते. या प्रशिक्षणाचा लाभ हजारो शेतकऱ्यांना होऊन त्यांच्या शेती, शेळी पालनामध्ये आणि दर्जामध्ये खूप परिवर्तन झाले आहे. हा प्रकल्प इतका यशस्वी ठरला की, ईशान्येकडील अरुणाचल प्रदेश विकास परिषद आणि दोनी पोली एलेन यांनी शेळीपालन संशोधनाची माहिती घेऊन त्यांना मार्गदर्शनासाठी निमंत्रित केले. तेथे प्रसाद देशपांडे यांनी स्थानिक आमदार बामिओ थापा यांच्या उपस्थितीत तेथील काळी बंगाल या जातीच्या शेळीच्या संगोपन व उत्पादनाबाबत मार्गदर्शन केले.
अरुणाचल प्रदेशमधील शेतीसाठी शेळ्यांच्या लेंडी खताची मात्रा लाभदायक असल्याने वनशेती व बंदिस्त शेळीपालन तंत्राद्वारे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात शेळीपालनातून कसे उत्पन्न मिळेल? याची शास्त्रोक्त माहितीही प्रसाद देशपांडे यांनी दिली आणि सांगलीच्या आटपाडीतलं हे संशोधन थेट अरुणाचल प्रदेशमध्ये सुद्धा पोहोचले. संस्थेने त्यानंतर आणखी एक नवा उपक्रम हाती घेतला तो म्हणजे जिवंत वजनावर शेळी विक्रीची सुरुवात. त्याची सुरुवात आटपाडीच्या प्रकल्पापासून झाली आहे. जबलपूर इथल्या अखिल भारतीय शेळीपालन परिसंवादात जिवंत वजनावर शेळी विक्री या शोध निबंधाचे सादरीकरणही करण्यात आलं होतं. संस्थेचे आणखी एक महत्त्वाचं कार्य म्हणजे शेती आणि शेतीपूरक व्यवसायांचे संशोधन, प्रशिक्षण, प्रबोधन, मार्गदर्शन सातत्याने सुरू असतं. गेल्या काही वर्षांत दोन गावांमध्ये पाणी व्यवस्थापनासाठी “जलदूत” हा प्रकल्प संस्थेने राबवला होता. आजही दोन्ही गावं पाणीटंचाई मुक्त झाली आहेत. यापुढेही आणखी काही गावांत हा प्रकल्प संस्थेला पोहोचवायचा आहे.
या सर्व अभिनव उपक्रमासाठी संस्थेला अनेक पुरस्कार हे मिळाले आहेत. श्रमिक पत्रकार संघ सोलापूर, इंडियन सोसायटी फॉर शीप अॅण्ड गोट प्रोडक्शन अॅण्ड युटिलायझेशनतर्फे देशपांडे यांना बकरी पंडित पदवी, ९ वी महाराष्ट्र राज्य सिंचन परिषद, सांगली येथे प्रमाणपत्र आणि स्मृतिचिन्ह, वसंतराव नाईक स्मृती प्रतिष्ठान पुसदतर्फे अनुबंध पुरस्कार, पुण्यश्लोक सद्गुरू शिवपार्वती प्रतिष्ठान नाशिकतर्फे स्मृतिचिन्ह, सामायिक क्षेत्र विकास प्राधिकरण, सोलापूर, शिंदे माला शेतकरी विकास मंच, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या ग्रामविकास-गो सेवा विभागातर्फेही, तसंच महाराष्ट्र शासनातर्फे शेळी, शेती आणि पाणी व्यवस्थापनासाठीचे अनेक पुरस्कार संस्थेला मिळाले आहेत. शेतकऱ्यांचा क्षमता विकास, शेतीचा शाश्वत विकास, राष्ट्राचा सर्वांगीण विकास करणं आणि समतायुक्त, शोषणमुक्त, पर्यावरणपूरक, उद्योगप्रधान, वैभवसंपन्न, समर्थ, समरस, सुरक्षित जनजीवन निर्माण करणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश असून त्यादृष्टीने संस्थेची वाटचाल सुरू आहे.
joshishibani@yahoo. com