Monday, March 17, 2025
Homeताज्या घडामोडीOnion price hike : कांद्याने पुन्हा रडवलं, गृहिणींचं बजेट कोलमडलं!

Onion price hike : कांद्याने पुन्हा रडवलं, गृहिणींचं बजेट कोलमडलं!

फक्त १५ दिवसांत कांद्याच्या दरात ३० ते ५० टक्क्यांनी वाढ!

मुंबई : देशात लोकसभा निवडणुका (Loksabha Election) पार पडल्यानंतर दैनंदिन गरजेच्या वस्तूंमध्ये तसेच भाजीपाल्याच्या दरात घट होईल, अशी आशा होती. मात्र, सर्वसामान्यांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागणार आहे. कांद्याने पुन्हा सामान्य माणसावर रडायची वेळ आणली असून कांद्याचे भाव गगनाला भिडत आहेत. त्यामुळे गृहिणींचं बजेटही कोलमडलं आहे. मागील १५ दिवसांमध्ये कांद्याचे भाव ३० ते ५० टक्क्यांनी वाढले असल्याचं (Onion Price Hike 30 To 50 Percent) समोर आलं आहे.

काही दिवसांपूर्वी बटाट्याच्या किंमती वाढल्या होत्या. आता कांदा महागला आहे. सध्या देशात कांद्याची आवक कमी होत आहे, तर मागणीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे त्यामुळे कांद्याचे भाव वाढले आहेत. जून महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारात येणारा कांदा हा साठ्याचा आहे. २०२३-२४ मध्ये रब्बी पिकामध्ये घट होण्याची शेतकऱ्यांना भीती आहे. त्यानंतर कांद्याचा दर वाढण्याचा अंदाज त्यांना आहे. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवेल, अशी आशा शेतकऱ्यांना आहे. यामुळेच शेतकरी कांदा साठवणूक करत आहेत.

निर्यात शुल्क सध्या ४० टक्के असल्यामुळे कांद्याची निर्यात कमी होत आहे. सरकारने निर्यात शुल्क हटवल्यास कांद्याला चांगला भाव मिळेल अशी आशा शेतकऱ्यांना आहे. त्यामुळेच त्यांनी कांदा साठवून ठेवले असल्याची माहिती हॉर्टिकल्चर प्रोडक्ट्स एक्सपोर्टर्स असोसिएशनचे अध्यक्ष अजित शहा यांनी दिली आहे. केंद्र सरकारने आता कांद्याच्या वाढत्या भावावर नियंत्रण ठेवण्यासाठी निर्णय घेणं अपेक्षित आहे.

कांद्याच्या सरासरी घाऊक किमतीत मोठी वाढ

नाशिकच्या लासलगाव मार्केटमध्ये कांद्याच्या सरासरी घाऊक किमतीत मोठी वाढ झाली आहे. १० जून रोजी सरासरी घाऊक दर प्रतिकिलो २६ रुपये होता. मागील महिन्यात २५ तारखेला हा दर प्रतिकिलो १७ रुपये होता. राज्यातील अनेक घाऊक बाजारात कांद्याचे दर ३० रुपये किलोच्या पुढे गेले आहेत.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -