मरीन ड्राईव्ह ते वरळी फक्त ९ मिनिटांत
मुंबई : कोस्टल रोड (Coastal Road) हा महाराष्ट्रातील विकासकामांपैकी एक महत्त्वाकांक्षी असा प्रकल्प आहे. या रोडमुळे मुंबईच्या वाहतूक कोंडीपासून मुंबईकरांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे. त्यासाठी मुंबई कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन आज होणार आहे. त्यानंतर मरीन ड्राइव्ह ते वरळी (Marine drive to Worli) दुसरा बोगदा आजपासून वाहतुकीसाठी खुला करण्यात येणार आहे. त्यामुळे हे अंतर फक्त ९ मिनिटांत पार करता येणार आहे. दरम्यान, आज भूमिगत मार्ग नागरिकांना प्रवासासाठी खुला केला जाणार आहे.
मरीन ड्राइव्ह ते वरळी ही मार्गिका सोमवार ते शुक्रवार असे पाच दिवस सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत अशी १६ तास खुली ठेवली जाणार आहे. कोस्टल रोड प्रकल्पाचे आतापर्यंत ९० टक्के काम पूर्ण झाले असून उर्वरित कामं पूर्ण करण्यासाठी शनिवार आणि रविवारी ही मार्गिका बंद ठेवली जाणार आहे.
वरळी ते मरीन ड्राइव्ह दरम्यानच्या महत्त्वाकांक्षी कोस्टल रोड प्रकल्पाचा दक्षिणेकडील कॅरेजवे १२ मार्च रोजी वाहतुकीसाठी खुला करण्यात आला. तथापि, ३१ मे रोजी होणाऱ्या रस्त्याच्या दुसऱ्या टप्प्याचे उद्घाटन होण्यास उशीर झाल्यामुळे विरोधी पक्षांनी टीका केली. यानंतर आता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी १० जून रोजी उत्तरेकडील कॅरेजवे उघडण्याची घोषणा केली.
महापालिका आयुक्त भूषण गगराणी म्हणाले, “दुसऱ्या टप्प्याचा शुभारंभ सोमवारी होणार असून मंगळवारी सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत रस्ता वाहतुकीसाठी खुला असेल.” सध्या हा रस्ता १६ तास खुला राहील, कारण कोस्टल रोडला बीडब्ल्यूएसएलशी जोडण्याचे काम अद्याप सुरू आहे, अशी माहिती आहे. कोस्टल रोड आणि वांद्रे-वरळी सी लिंक (BWSL) ऑक्टोबर २०२४ पर्यंत पूर्ण होईल.