Wednesday, July 2, 2025

सर आली धावून पुल गेला वाहून!

सर आली धावून पुल गेला वाहून!

पुलाच्या कामाच्या चौकशीची मागणी


पुणे : दौंड तालुक्यात नव्याने बांधकाम सुरु असलेल्या भीमा नदीवरील (Bhima River Bridge) पुलाचे खांब पहिल्याच पावसात कोसळल्याने या कामावर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे.


दौंड (Daund) आणि अहमदनगर (Ahmednagar) जिल्ह्याला जोडणाऱ्या पुलाचे काम चालू होते. २० कोटी रुपये खर्चून हे काम करण्यात येत होते. मात्र पूल उभारण्याचे काम सुरू असताना काल रात्री झालेल्या पावसात नदीला पूर आल्याने पुलाचे खांब कोसळले. या दुर्घटनेत सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी पुलाच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे.


दौंड येथील भीमा नदीवर सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत दौंड आणि गार या दोन गावांना जोडणारा या पुलाचे काम सुरू असून उन्हाळ्यात भीमा नदी ही पूर्ण कोरडी होती. परंतु गेल्या तीन-चार दिवसापासून राज्यात सर्वत्र पाऊस सुरू झाला आहे आणि धरणातून देखील थोडे पाणी नदी पात्रात सोडण्यात आले आहे. काल रात्री मोठ्या प्रमाणात पाऊस झाला. त्यामुळे नदीला पूर आला होता. यावेळी येथील पिलरचा एक भाग कोसळला. त्यामुळे या कामाची पात्रता किती निकृष्ट दर्जाची होती हे यावरून सिद्ध होते. जर दिवसा काम सुरू असताना हा असा प्रकार घडला असता तर नक्कीच कोणाला तरी आपला जीव गमवावा लागला असता.


या घटनेचा व्हिडीओ समोर आला आहे. या पुलासाठी २० कोटी रूपये खर्च करण्यात आला आहे. या पुलाचे भूमीपूजन २०२१ साली झाले. या पुलाचे काम निकृष्ठ दर्जाचे असल्याचे समोर येत आहे. तसेच पुलाचे काम करताना सतत अडचणी येत असल्याचे समोर आले आहे. निकृष्ट कामामुळेच हा पूल कोसळल्याचे स्थानिक म्हणत आहेत.


याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाकडे चौकशी केली असता, या विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हा पडला नसून याचा काही भाग वाकडा झाला होता. त्यामुळे आम्ही तो काढायला सांगितला असे म्हणून आपली चूक झाकणाच्या प्रयत्न बांधकाम विभागाकडून करण्यात येत आहे.


दरम्यान, भीमा नदीवरील पुलाच्या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. दौंड सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी देखील कोणतीही माहिती देत नाही, असा आरोप देखील होत आहे. त्यामुळे या कामाची चौकशी होणे देखील गरजेचे आहे. तसेच दोषींवर कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे.

Comments
Add Comment