Sunday, May 18, 2025

देशताज्या घडामोडीब्रेकिंग न्यूजक्राईम

Manipur News : धक्कादायक! मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावर अतिरेकी हल्ला

Manipur News : धक्कादायक! मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या सुरक्षा ताफ्यावर अतिरेकी हल्ला

अनेक राऊंड फायर; बराच काळ गोळीबार सुरु


इंफाळ : दोन गटांतील वादांमुळे आधीच धुमसत असलेल्या मणिपूरमधून एक धक्कादायक बातमी (Manipur News) समोर आली आहे. दहशतवाद्यांनी (Terrorists) थेट मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंग (N Biren Singh) यांच्या सुरक्षा ताफ्यावर हल्ला केल्याची घटना घडली आहे. कांगपोकपी जिल्ह्यात सकाळी १०.३० च्या सुमारास राष्ट्रीय महामार्ग-३७ वर हा हल्ला झाला असून त्यामध्ये एक सुरक्षा रक्षक जखमी झाल्याची माहिती आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्री एन बिरेन सिंह हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर जिरीबामचा (Jiribam) दौरा करणार आहेत. त्यासाठी त्यांचं अतिरिक्त सुरक्षा पथक पाहणीसाठी इंफाळहून मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त जिरीबाम जिल्ह्यात जात होतं. मात्र त्यादरम्यान त्यांच्या ताफ्यावर अचानक अनेक राऊंड फायर करण्यात आले. या पार्श्वभूमीवर सुरक्षा दलांनी तात्काळ प्रत्युत्तराची कारवाई केली. हा गोळीबार बराच काळ सुरू असल्याची माहिती आहे.


मणिपूरच्या मुख्यमंत्र्यांच्या अतिरिक्त सुरक्षा दलावर झालेल्या हल्ल्यात एक सुरक्षा रक्षक जखमी झाला असून त्याच्या उजव्या हाताला गोळी लागल्याची माहिती आहे. त्याला जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दोन महिन्यांपूर्वी जिरीबाममध्ये हिंसा झाल्याची घटना घडली होती. त्यामुळे या भागात परिस्थिती तणावपूर्ण आहे. या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मणिपूरचे मुख्यमंत्री बीरेन सिंह यांना मंगळवारी जिरीबाम येथे जायचं होतं.



जिरीबाममध्ये का उफाळला हिंसाचार?


६ जून रोजी अज्ञात हल्लेखोरांनी जिरीबामध्ये एका समाजातील ५९ वर्षीय व्यक्तीची धड छाटून हत्या करण्यात आली होती. तेव्हापासून जिरीबाममध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार उफाळला होता. हल्लेखोरांनी परिसरातील घरे पेटवली होती. ७० घरे आणि काही सरकारी कार्यालयांना आग लावण्यात आली होती. या घटनेनंतर १०० पेक्षा जास्त नागरिकांचे शिबिरांमध्ये स्थलांतर करण्यात आले होते. तसेच या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्तही तैनात करण्यात आला होता. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री सिंह जिरीबाम दौऱ्यावर जाणार होते.



हल्ल्यानंतर काय म्हणाले मुख्यमंत्री एन बिरेन सिंग?


'मुख्यमंत्र्यांवरील हा हल्ला म्हणजे मणिपूरच्या लोकांवरील थेट हल्ला असल्याचं समजलं जाईल. त्यामुळे या प्रकरणाचा तपास करून योग्य ती कारवाई केली जाईल', असं मणिपूरचे मुख्यमंत्री एन बिरेन सिंह यांनी म्हटलं. वांशिक गृहकलहामुळे आधीच मणिपूर अशांत आहे, त्यात या घटनेने आणखी खळबळ उडवून दिली आहे.

Comments
Add Comment