Wednesday, April 30, 2025

महामुंबईब्रेकिंग न्यूजमहत्वाची बातमी

पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत; मुंबईला ‘यलो अलर्ट’

पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत; मुंबईला ‘यलो अलर्ट’

मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात हवामान ढगाळ राहणार असून मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याचा इशारा कुलाबा हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे मुंबईला मंगळवारी सावधगिरीचा ‘यलो’ अलर्ट देण्यात आला आहे. तर समुद्रालाही उधाण येणार असून दुपारी २.३८ वाजता ३.५४ मीटर तर ३.४३ मिनिटांनी ४.११ मीटर उंचीच्या लाटा उसळणार आहेत. त्यामुळे गरज असली तरच घरातून बाहेर पडा, असे आवाहनही प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

दरम्यान, पावसामुळे रस्ते वाहतूक विस्कळीत झाली तर विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू झाला. मुंबई शहर आणि उपनगरात रात्री ८ ते मध्यरात्री १ वाजेपर्यंत झालेल्या मुसळधार पावसामुळे दादर टीटी, हिंदू कॉलनी, हिंदमाता, लालबाग, वरळी, परळ, शिवडी ते वडाळा येथे तर पूर्व उपनगरात टागोरनगर विक्रोळी, सकीनाका, मुलुंड, भांडूप, विद्याविहार आणि पश्चिम उपनगरातून दहिसर, चेक नाका, अंधेरी, वांद्रे पश्चिम, विले पार्ले, मालाड या भागातून पाणी साचल्याच्या तक्रारी दाखल झाल्या.

संबंधित ठिकाणी कार्यवाही करून पाण्याचा निचरा केल्याची माहिती पालिका प्रशासनाकडून देण्यात आली.दरम्यान, मुंबईत पहिल्याच पडलेल्या पावसाने विक्रोळी येथील रविवारी रात्री इमारतीचा भाग कोसळला तर १० वर्षीय मुलासह एकाचा मृत्यू झाल्याची तर घाटकोपरमध्ये बेस्ट बस दुभाजकला धडकल्याने चालकासह एक प्रवासी जखमी झाल्याची घटना घडली.

रविवारी रात्री ९ नंतर रिमझिम बरसणाऱ्या पावसाने चांगलाच जोर धरला. विजेच्या गडगडाटासह दमदार हजेरी लावल्याने काही वेळातच पवई,अंधेरी, बोरिवली, कुर्ला आदी भागात पाणी साचल्याने रस्ते वाहतूक विस्कळीत झाली. दरम्यान,मुंबईसह राज्यात पावसाचा जोर पुढील दोन दिवस कायम राहणार आहे.

विक्रोळीत इमारतीचा स्लॅब कोसळून दोघांचा मृत्यू

विक्रोळी पश्चिम पार्क साईट, टाटा पॉवर हाऊस जवळील एसआरएच्या तळ अधिक पाच मजली कैलास बिझनेस पार्कच्या मागील बाजुकडील स्लॅब आणि पत्र्याची शेड रविवारी रात्री ११.१० वाजण्याच्या सुमारास कोसळली. या घटनेत नागेश रामचंद्र रेड्डी (३८) व रोहित रेड्डी (१०) जखमी झाले. त्यांना उपचारासाठी घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालयात दाखल केले. मात्र रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी त्यांचा मृत्यू झाल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.

तर दुसऱ्या घटनेत घाटकोपर येथील कोटक महिंद्रा बँक जवळील दुभाजकाला बस नंबर १४५३ मार्ग क्रमांक ५३३ मर्यादित वरील बस धडकली. या घटनेत चालक व प्रवासी किरकोळ जखमी झाले. त्यांना उपचारासाठी राजावाडी रुग्णालयात दाखल केले असता उपचारानंतर घरी सोडण्यात आल्याचे बेस्ट उपक्रमाकडून सांगण्यात आले.

Comments
Add Comment