
- कैलास ठोळे, आर्थिक घडामोडींचे अभ्यासक
मागील काही महिन्यांच्या तुलनेत मे महिना देशासाठी चांगला राहिल्याचा एक अहवाल सांगतो. या काळात हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक आणि बँकिंग उद्योग आदी सेवा क्षेत्रांमध्ये चांगली वाढ झाली. म्हणूनच इच्छुकांनी या परिस्थितीचा अभ्यास करणे गरजेचे आहे. दुसरीकडे, आंतरराष्ट्रीय पातळीवरही अनेक संधी उपलब्ध होत असून, सेवाक्षेत्रातील कर्मचाऱ्यांचा दबदबा वाढत आहे. हे सकारात्मक वातावरण नवी उभारी देणारे आहे. अर्थव्यवस्थेचा कणा असणाऱ्या भारतातील सेवाक्षेत्राचा जीडीपीमध्ये ५० टक्क्यांहून अधिक वाटा आहे आणि ते रोजगाराचे प्रमुख स्रोत आहे, तरीही अनेकदा या क्षेत्रातील कामगारांना कमी वेतन आणि टाळेबंदीचा धोका असतो.
एका सर्वेक्षणानुसार, मे महिना भारतातील व्यवसायासाठी खूप चांगला राहिला आहे. या काळात साधारणपणे सेवाक्षेत्रात हॉटेल, रेस्टॉरंट, वाहतूक आणि बँकिंग उद्योगांमध्ये जोरदार वाढ झाली. ‘एचएसबीसी’ आणि ‘एस. पी. ग्लोबल’च्या सर्वेक्षणात मे महिन्यात सेवाक्षेत्राची स्थिती गेल्या अनेक महिन्यांच्या तुलनेत खूपच चांगली होती. वस्तूंचे उत्पादन न करणाऱ्या क्षेत्रांचा सेवा क्षेत्रामध्ये समावेश होतो. बँका, विमा, रिअल इस्टेट, दूरसंचार, रुग्णालये, शाळा-कॉलेज, पर्यटन, हॉटेल्स, आयटी आणि बीपीओ कंपन्या आदींचा त्यात समावेश होतो आणि आधी उल्लेख केल्याप्रमाणे निम्म्याहून अधिक उत्पन्न या क्षेत्रातून येते. कोरोना महामारीमुळे अर्थव्यवस्थेतील बहुतांश क्षेत्रांचे नुकसान झाले असले, तरी त्याचा सर्वाधिक फटका सेवा क्षेत्राला बसला होता. २०१९-२०मध्ये ५५ टक्क्यांवरून हा वाटा २०२१-२२मध्ये ५३ टक्क्यांपर्यंत कमी झाला.
भारत हे सॉफ्टवेअर सेवांचे निर्यात केंद्र आहे. म्हणजे इतर देशांमध्ये सॉफ्टवेअर सेवा पुरवण्यात भारत आघाडीवर आहे. २०२१ ते २०२४ दरम्यान भारतीय आयटी आउटसोर्सिंग सेवा बाजार सहा ते आठ टक्क्यांनी वाढण्याची अपेक्षा आहे. सप्टेंबर २०२३ मध्ये भारताने ‘ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्स’ (जीआयआय) मध्ये ४० क्रमांक कायम ठेवला आहे. तंत्रज्ञानाशी संबंधित सेवांमध्ये सातत्याने होत असणारी प्रगती आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर या सेवांची वाढती मागणी हे त्याचे कारण आहे. एप्रिल २००० ते डिसेंबर २०२३ दरम्यान थेट विदेशी गुंतवणुकीचा (एफडीआय) सर्वाधिक फायदा सेवा क्षेत्राला झाला. या कालावधीत १०८ अब्ज अमेरिकन डॉलर्सची गुंतवणूक झाली.
सेवा क्षेत्राने गेल्या चार महिन्यांमधील उच्चांक गाठला आहे. मे महिन्यात सेवा क्षेत्राचा ‘पीएमआय’ निर्देशांक गेल्या चार महिन्यांमधील उच्चांकी ६१.४ पातळीवर पोहोचला. तो एप्रिलमधील ६०.८ पेक्षा किंचित जास्त होता. त्याच वेळी गेल्या महिन्याच्या तुलनेत किंचित कमी असले, तरी उत्पादनाशी संबंधित ‘पीएमआय’ निर्देशांकाचे प्रारंभिक आकडेदेखील चांगली वाढ दर्शवतात. हा निर्देशांक ५८.८ वरून ५८.४ पर्यंत घसरला. फ्लॅश कंपोझिट पीएमआय (परचेसिंग मॅनेजर्स इंडेक्स) भारतातील व्यवसायाच्या आरोग्याचे मूल्यांकन करण्याचे एक माध्यम आहे. बाजारात चांगली मागणी असल्याने, सेवा उद्योगाचा व्यवसाय जानेवारीपासून सर्वाधिक वेगाने वाढला आहे. याशिवाय मॅन्युफॅक्चरिंग आऊटपुट आणि नवीन ऑर्डर्सही वाढत आहेत. लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे निर्यातवाढीने या वर्षात दुसऱ्यांदा नवा विक्रम नोंदवला आहे. व्यवसायात चांगली वाढ झाल्याने, व्यावसायिकांचा आत्मविश्वास वाढला आहे. त्याचबरोबर उत्पादन क्षेत्रातील व्यावसायिकांचा आत्मविश्वासही गेल्या नऊ वर्षांमधील सर्वोच्च पातळीवर पोहोचला आहे. या सकारात्मक वातावरणामागील सर्वात मोठे कारण म्हणजे सप्टेंबर २००६ पासून खासगी क्षेत्रातील नोकऱ्यांमध्ये सर्वाधिक वेगाने वाढ झाली आहे. गेल्या २१ महिन्यांमध्ये सेवा क्षेत्रात सर्वाधिक नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत. दुसरीकडे, वस्तू बनवण्याचा खर्चही गेल्या नऊ महिन्यांमध्ये वेगाने वाढला आहे. परिणामस्वरुप एप्रिलच्या तुलनेत मे महिन्यात कंपन्यांनीही वस्तूंच्या किमती झपाट्याने वाढवलेल्या दिसल्या. सेवा आणि उत्पादन या दोन्ही क्षेत्रांमधील खर्चात वाढ झाल्यामुळे, कंपन्यांच्या नफ्यात घट झाली आहे. महागाई अशीच वाढत राहिल्यास, रिझर्व्ह बँकेला व्याजदर कमी करण्यात अडचण येईल; मात्र पुढील तिमाहीमध्ये व्याजदर कमी होण्याची शक्यता आहे. अर्थव्यवस्थेत महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या आव्हानांना तोंड द्यावे लागत आहे.