मुंबई: मुंबईच्या विक्रोळी पश्चिम येथील टाटा पॉवर हाऊसच्या एका साईटजवळ कैलास बिझनेस पार्कमध्ये स्लॅब कोसळल्याची घटना समोर आली आहे. बीएमसीच्या माहितीनुसार १० वर्षीय मुलगा आणि ३८ वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला आहे.
रविवारी रात्री ही दुर्घटना घडली. हा १० वर्षीय मुलगा सिक्युरिटी गार्ड असलेल्या वडिलांना जेवण देण्यासाठी गेलेला असताना ही घटना घडली. मुसळधार पाऊस असल्याने हा मुलगा वडिलांसोबत होता. यावेळी बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब यांच्यावर कोसळला. या दुर्घटनेत बापलेकाचा जागीच मृ्त्यू झाला. नागेश रेड्डी(३८) आणि रोहित रेड्डी(१०) अशी मृत व्यक्तींची नावे आहेत.
मुसळधार पावसाचा अंदाज
भारतीय हवामान विभागाच्या मुंबई केंद्राने सोमवारीही मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. आयएमडीच्या माहितीनुसार पुढील तीन ते चार तासादरम्यान मुंबईसह रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड, औरंगाबाद, अहमदनगर, बीड, उस्मानाबाद आणि लातूर जिल्ह्यात विविध ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.