Wednesday, September 17, 2025

भेट...

भेट...
हलकं-फुलकं - राजश्री वटे एक संध्याकाळ जवळून गेली... मनी नवा तरंग उठवून गेली... भूतकाळ आठवून गेली... भविष्याची चाहुल लावून गेली... आपल्या खुणा ठेवून गेली...! आयुष्याची संध्याकाळ होती...मनाला अस्वस्थ वाटत होतं... तशी पण ही संध्याकाळची वेळ... ही कातरवेळ असते... मनाला हुरहूर लावणारी... मग ती दिवसाची असो की आयुष्याची!! आयुष्य... नुसते तीन शब्द नव्हेत ... इतिपासून अंतापर्यंत... धरणीपासून क्षितिजापर्यंतही नक्कीच नाही... त्या पलीकडेही अनंत... अमर्याद असेल... रात्र सरते... दिवस उगवतो... मध्यान्ह होते... अन् येते संध्याकाळ...! दिवस व रात्र यामधील ही वेळ... कधी शांत...कधी अशांत...हुरहुरणारी म्हणून कातर! तसंच आहे आयुष्याच्या संध्याकाळचं... थरथरणारं... हुरहुरणारं... कातर वय...!! आज कोणाला तरी खूप भेटावसं वाटत होते... कोणाला भेटावं बरं? काहीतरी बोलावं... काहीतरी सांगावं... काहीच सुचत नव्हतं... अन्... अचानक उत्तर सापडलं... स्वतःलाच भेटलं तर! आजपर्यंतच्या आयुष्यात दुसऱ्याची विचारपूस करताना, स्वतःपर्यंत पोहोचताच आलं नाही... बसावं जरा निकट आयुष्याच्या... असा विचार करत हातात हात घेतला त्याचा, जरासे थोपटले त्यावर... विचारले आयुष्याला, आता तू थकलास; पण काय केलंस आजपर्यंत... काही हिशोब आठवतात का? मनातून आवाज आला, फक्त गोळाबेरीजच केली मी, इतरांनी वजाबाकी केली असेल नकळत तर... काही देणे घेणे नाही त्याचे.... आयुष्याचा सूर्य डोक्यावर आला जन्मापासून... अन् ऊन, सावलीचा खेळ सुरू झाला... कधी चटके... कधी थंडावा... कधी दिलासा तर कधी आसवांचा पाऊस... कसं आयुष्य सरलं कळलंच नाही... असे आयुष्याच्या ऋतूचे बदलणारे रूप बघताना... कधी बनवले कणखर त्याने... कधी हळवे! हसते खेळते बालपण सरले, ओझे जबाबदारीचे तारुण्यात पेलले... निभावल्या वेळा कर्तव्यपूर्तीच्या... अन् सांजवेळ येऊन ठेपली! निरागस ते बालपण... उमेदीचे तारुण्य... सरले ते दिन... पापणी उघडताच मिटताना!! चाळीशीची सोनेरी काडी, रुपेरी केसांत विसावते... हे आयुष्या... प्रौढत्वाची ही खूण दिमाखात मिरवली! कर्तव्याची पूर्ती झाली... मग स्फूर्तीही मंदावली... अन् हळूच वळावे मनाकडे... थकलास का रे? हलणाऱ्या मानेचा होकार व मनातून हुंकार! नजरेनंचं खुणावलं हृदयाला कसं काय? ते मात्र हसले प्रसन्न! म्हणाले... मला थकून चालणारच नाही शेवटच्या श्वासापर्यंत! अंधुक डोळ्यांतला प्रकाश चमकला... आयुष्याच्या हृदयस्पर्शी उत्तराने! काही स्वीकारलं काही सोडून दिलं... आयुष्याचे चढ-उतार अलगद पार केले... आयुष्य फक्त धावण्यातच गेले... जगण्याच्या शर्यतीमध्ये! मन थकले ओझ्याने... तर पायही थकले भाराने!! हे आयुष्या.... आज या उभ्या जीवनाच्या कातरवेळी तुझ्याशी केलेलं हितगुज आंतरिक समाधान देऊन गेले... तू कधी तक्रार केली नाहीस... ऊन-पावसाची... चढ-उताराची... थकला म्हटलं नाहीस... कंटाळलाही नाहीस... लढत राहिलास फक्त... आज तुझ्याशी केलेला मुक्त संवाद म्हणजे दोघांनी वाटून खाल्लेली खिरापतच जणू! पण... आता विश्रांतीची वेळ आहे ही सांजवेळ! देव्हारातल्या समईप्रमाणे शांत तेवत राहा... हळुवार... मंद... मंद! मोकळे वाटले तुझ्याशी बोलून... खूप जवळ होतो दोघे आपण... पण एकमेकांच्या अंतरंगात कधी डोकावलोच नाही!! भेट तुझी माझी स्मरते.. अजून त्या दिसाची...!
Comments
Add Comment