
मुंबई विमानतळाच्या सुरक्षेत झाली मोठी चूक
मुंबई : मुंबई विमानतळावर (Mumbai Airport) एक मोठी दुर्घटना होता होता टळली आहे. सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याने हा प्रकार घडला. एकाच धावपट्टीवर दोन विमानांना परवानगी देण्यात आली, मात्र दोन्ही विमाने काहीशा वेळेच्या फरकाने जवळ आल्याने हा अपघात टळला. समोर आलेल्या माहितीनुसार, काल सकाळच्या सुमारास इंडिगोचे (Indigo) विमान रनवेवर उतरत होते, तर एअर इंडियाचे (Air India) विमान टेक ऑफ करण्यासाठी रनवेवर धावत होते त्यावेळी ही घटना घडली. या घटनेचा व्हिडीओ बाहेर आला आहे.
एअर इंडियाचं विमान धावपट्टीवर असतानाच इंडिगो विमानाला उतरण्याची परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार मुंबई विमानतळावर घडला होता. एअर इंडियाचं विमान हवेत झेपावत असतानाच इंडिगो विमानाचं लैंडिंग होत होतं. मिळालेल्या माहितीनुसार, इंडिगो फ्लाइट ५०५३ रनवे क्रमाक २७ वर उतरणार होते. त्याचवेळी एअर इंडियाची फ्लाइट ६५७ टेक ऑफ करण्याच्या तयारीत होती. त्यावेळी ही टक्कर वाचली. एअर इंडियाचे विमान है तिरुअनंतपुरमसाठी उड्डाण करणार होते अशी माहिती समोर आली आहे.
मुंबई विमानतळावरील या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर समोर आला आहे. यामध्ये एअर इंडियाचे विमान रनवेवर वेगाने जात होते, तर त्याचवेळी इंडिगोचे विमान लैंडिंग करत असल्याचे दिसत आहे. मात्र, जेव्हा इंडिगोचे विमान एअर इंडियाच्या विमानाजवळ आले तोपर्यंत एअर इंडियाच्या विमानाने टेकऑफ केले होते. त्यामुळे ही मोठी दुर्घटना टळली आहे, असे व्हिडीओत दिसत आहे. आता या प्रकरणाची चौकशी केली जात आहे.
Very Close call today at VABB. @IndiGo6E tries to land while an aircraft is still on the roll on RW27. #AvGeek pic.twitter.com/tbHsDXjneF
— Hirav (@hiravaero) June 8, 2024
रन वे २७ वर घडलेल्या प्रकाराची DGCA ने केली चौकशी सुरू केली आहे. या प्रकरणाशी संबंधित असलेल्या हवाई वाहतूक नियंत्रण कक्षातील (ATC) संबंधित कर्मचाऱ्यांना काम करण्यापासून रोखण्यात आलेलं आहे.