निसर्गवेद – डॉ. महालक्ष्मी वानखेडकर
पाचवे शतक. हजारो विद्यार्थी निसर्गाच्या सान्निध्यात हसत-खेळत अभ्यासात गुंग होते आणि हुणांनी आक्रमण केले. बघता बघता लहान-मोठे कोणीही न बघता सर्व विद्वान शिक्षक, विद्यार्थ्यांना कापून काढले. हजारो बौद्ध भिक्षुक, हिंदू यांचा नरसंहार केला. तेथील मंदिर, मूर्त्या, रचना सगळ्या तोडल्या. ग्रंथ जाळले. पूर्णपणे वास्तूचा विध्वंस केला. शेवटी नैसर्गिक आपत्तीचे निमित्त करून, या भूमातेने या नगराला स्वतःच्या कवेत घेतले.
कालांतराने जेव्हा इंग्रज आलेत, तेव्हा इंग्रज अधिकारी जनरल कनिंघम यांनी यासंदर्भात अनेक पुस्तकांमध्ये भारतीय संस्कृतीचे वाचन केले. त्यात त्यांनी या परिपूर्ण नगर तक्षशिलाचे वर्णन वाचले आणि त्यांनी १९व्या शतकात याचे उत्खनन करण्यास सुरुवात केली. पुढे जाऊन १९१२ मध्ये जॉन मार्शल या अधिकाऱ्याने या विशालकाय परिसरात जेव्हा उत्खनन केले, तेव्हा त्यांना हे तक्षशिला सर्व जगासमोर आणता आले. खरं तर ब्रिटिशांनी हे एक मौल्यवान कार्यच केले. १९८० मध्ये युनेस्कोने हे एक प्रथम प्राचीन विश्वविद्यालय म्हणून घोषित केले. आता आपण याचा मूळ रक्तरंजित, हृदयद्रावक इतिहास पाहूया.
प्राचीन भारतातील गांधार याची राजधानी तक्षशिला. जेव्हा भारतापासून पाकिस्तान वेगळा झाला, तेव्हा दुर्दैवाने हा भाग पाकिस्तानकडे गेला. सध्याच्या पाकिस्तानमधील रावळपिंडीपासून हे १८ मैलांवर वायव्य दिशेला आहे. या प्राचीन विश्वविद्यालयाची स्थापना ईसा पूर्व ५व्या शतकात राजा भरत यांनी केली होती. त्यांचा मुलगा तक्ष हा शासक असल्यामुळे, त्याच्या नावावर हे विद्यापीठ होते. तक्षचा मूळ अर्थ होतो भक्कम मजबूत. म्हणजेच मजबूत अशी शीला, खडक किंवा दगड. तक्षशिला भारतीय महाकाव्यानुसार, ‘तक्षाचे खडक किंवा कट दगडाचे शहर’ असे म्हटले आहे. खरं तर बऱ्याच वेळा स्थापनेबद्दल संभ्रम दिसून येतो. महाभारतकालीन गंधार याचे राजा शकुनी हे होते. गंधारच्या जवळ असणारे उज्बेकीस्थानचे राजा त्यांचे नाव सुद्धा तक्षच्या नावावर ताश्क आहे. नालंदा विद्यापीठापेक्षा तक्षशिला विद्यापीठ हे प्राचीन आहे. तक्षशिला म्हणजे भारताचा बुद्धी विकासाचा खजिना. खरं तर नालंदा आणि तक्षशिला ही दोन्ही विद्यापीठे शैक्षणिक बाबतीत उच्च प्रतीची आहेत.
तक्षशिलाचा उल्लेख वाल्मिकी रामायण, ऋग्वेद, बौद्ध ग्रंथामध्ये मिळतो. याचा अर्थ हे अतिप्राचीन विद्यापीठ आहे. पर्शियन राज्याच्या शिलालेखात सुद्धा गांधारचा उल्लेख आहे. या विद्यापीठात वैद्यकशास्त्र, विज्ञान, कला, ज्योतिषशास्त्र, समाजकारण-राजकारण, चिकित्साशास्त्र, धनुर्विद्या, मंत्रविद्या, वैद्यकशास्त्र, वेद म्हणजेच शस्त्र-अस्त्र विज्ञान-अध्यात्म अशा सर्व विषयांचे ज्ञान इथे दिले जात असे. निसर्गाच्या सान्निध्यात राहून, अनेक शोध लावण्याचे कार्य येथे होत असे. आपल्या प्राचीन वेदांमध्ये असणारे सर्व विषय येथे शिकवले जात असत. येथे जवळजवळ दहा हजार विद्यार्थी शिक्षण घेत असत. चाणक्य हेसुद्धा तक्षशिलेतलेच विद्यार्थी होते. चंद्रगुप्त मौर्य यांच्यासाठी चाणक्य हे अध्यापकांच्या भूमिकेत येथे होते. असे म्हटले जाते की, चाणक्यांचा अर्थशास्त्र हा प्राचीन ग्रंथ तक्षशिलेमध्येच रचला गेला. येथील शिक्षण हे जनकल्याण, विश्वकल्याणासाठी असे. येथे कोणतीही पदवी दिली जात नसे. महर्षी चरक यांनीसुद्धा ऋषी परंपरेनुसार येथे शिक्षित होऊन, आरोग्य चिकित्सेमध्ये महान कार्य करून, चरकसंहिताच्या रूपामध्ये विश्वकल्याण केले. पंचतंत्र महाकाव्याचे जनक विष्णू शर्मा यांनीसुद्धा कल्याणकारी कार्य केले.
जेव्हा मी अध्ययन केले, तेव्हा माझ्या एक गोष्ट लक्षात आली की, या संपूर्ण रचनेचा वास्तुशास्त्र आणि निसर्ग नियमानुसारच, विज्ञान आणि शास्त्र यांच्या संगमानंतरच गहन अध्ययनांतर्गत त्याची निर्मिती केली गेली. कारण इथे येणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला त्याचे परिपूर्ण ज्ञान व्हावे, हाच मूळ उद्देश होता. तिकडची वास्तुरचना बरंच काही सांगून जाते. वास्तुनिर्मितीत दगडी विटांचा पुरेपूर वापर करण्यात आला आहे. विद्यार्थी आणि शिक्षक बसण्याच्या व्यवस्था, रचनासुद्धा नियमाप्रमाणे झाल्या आहेत. शैक्षणिकविषयक नियम पूर्णपणे वेदांतीत आहेत. वास्तुकला पाहत असताना, एक गोष्ट लक्षात आली की, चारही दिशांनी इथे यावे, अशी पूरक रचना तिथे केली गेली. मध्यभागी स्तूप रचना आणि त्याच्या भोवताली चौकोनी वर्गाच्या रचना. त्याच्या बाहेरच्या भागात अनेक विद्याशास्त्र शिकण्यासाठी आवश्यक असणाऱ्या पूरक रचना. प्राचीन काळापासून या विश्वविद्यालयात जगभरातील लोक शिक्षणासाठी येत असत. प्राचीन काळात नालंदा इथूनसुद्धा विद्यार्थी तक्षशिलेत शिक्षण घेण्यासाठी येत असत. या तक्षशिलेत राजे, सामान्य विद्यार्थीसुद्धा शिक्षणासाठी येत असत. या विद्यापीठाचे वैशिष्ट्य म्हणजे येथे राजा असो की प्रजा, सर्वांना समान वागणूक होती. तक्षशिलेला त्या काळात राजकीय संरक्षण होते. हे खरे तर एक प्रगत गुरुकुलच होते.
तक्षशिलेतील एक अध्ययन केंद्र जिथे सर्व विश्व विषयांचे ज्ञान दिले जात होते. जवळजवळ ६४ विषय तिथे शिकवले जात होते. दहा हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी येथे शिक्षण घेत असत. चीनचे फाह्यान आणि श्यानजांग हे बौद्ध भिक्षुक येथे आले होते. त्यांनी या विद्यापीठाचे वर्णन केले आहे. येथे अनेक विहार दिसून आले आहेत, याचा अर्थ येथे बौद्ध भिक्षुक आणि विद्यार्थ्यांच्या राहण्याची व्यवस्थासुद्धा होती. येथील विषयांमध्ये ध्यान-धारणा ही दिसून येते. निसर्गाच्या सान्निध्यात राहून, अनेक शोध लावण्याचे कार्य येथे होत असे. तक्षशिला हे पूर्ण विकास आणि प्रगतशील शहर होते. हे एक व्यापाराचे पूर्ण केंद्र होते. असे लक्षात येते की, त्याच्या मूळ रचना जर पाहण्यात आल्या, तर या खरोखर एखाद्या मठाच्या-विद्यापीठाच्या दिसून येतात. तक्षशिला म्हणजे भारताचा प्राचीन बुद्धी विकासाचा खजिना.
तक्षशिलेवर अनेक राजांनी आक्रमण केले. मौर्य साम्राज्यामध्ये युनानी आक्रमण झाले. जर युनानी आक्रमण केले गेले, तर त्यांनी सुद्धा आपल्या ग्रंथांची खूप लुटालुट केली. युनानी औषधे हीसुद्धा आपलीच असावीत.
असं वाटतं की, या जगामध्ये आज जो आयुर्वेद पोहोचला आहे, तो आपल्यावर केलेल्या आक्रमणांमधून, लुटालुटीमधून, आपल्या ग्रंथांमधून केला असावा. अलेक्झांडरने सुद्धा आक्रमण केले, तेव्हा तक्षशिला शासक अंभी याने शरणागती पत्करली होती. भारताकडे असलेले मंदिर, शहर, स्थापत्यकला आणि अतिउच्च बौद्धिक विकासाची विद्यापीठं यांचा नाश हे शत्रूंचे लक्ष्य होते. कारण जगातील सर्वश्रेष्ठ हिंदू धर्म यांचा विकास यांना होऊ द्यायचा नव्हता. या विद्यापीठातून विद्वान होऊ नयेत. कुठे तरी त्यांच्या विद्वत्तेला तडा जावा म्हणून ही विध्वंसकता अनेक आक्रमकांनी केली.
आपल्या ऋषी-मुनींनी वैज्ञानिक व आध्यात्मिकपणे केलेल्या अतिउच्च अध्ययनाचा उपयोग कुठेही येणाऱ्या पिढीला होऊ द्यायचा नव्हता. त्यांना हिंदू धर्म या जगातून नष्ट करायचा होता; परंतु सनातन धर्म हा श्रेष्ठ असल्यामुळे, तो कधीच नष्ट होऊ शकणार नाही, कारण त्याची परिपूर्ण योजना परमेश्वराने हे विश्व बलशाली करण्यासाठीच केली आहे. या विध्वंसक शत्रूला ही गोष्ट कधीच समजणार नाही. आश्चर्य वाटते की, या भूमीवर जन्मणारे, विद्वत्ता असणारे विद्वान हे पंचतत्त्व आणि जीवसृष्टीचे संरक्षकच असणार एवढे निश्चित. मग त्यांचा विध्वंस का? राक्षसी बुद्धी असणारे हे शत्रू ज्यांच्यामुळे आज ही वास्तव्य, मंदिर, विद्यापीठ उद्ध्वस्त होत आहेत. पण त्यांना त्या वास्तूंचा सर्वनाश करून काही साध्य झाले नाही. कारण ही भूमी संतांची असल्यामुळे येथे संत आणि विद्वान जन्म घेतच राहणार. या विश्वासाठी या निसर्गासाठी कल्याणकारी कार्यरतच असणार. खरं तर खूपच दुर्भाग्यपूर्ण गोष्ट आहे की, ज्याचे जतन करण्यात आपण कमी पडलो.
अच्युतानंदानी दिलेल्या भविष्यातही हे सांगण्यात आले आहे की, जो हिंदुत्वाचे रक्षण करेल, अशा व्यक्तींनाच परमेश्वर संरक्षित करेल. जर याचे कारण खोलवर विचार करून समजून घेतले, तर याचा अर्थ असा आहे की, फक्त या सनातन धर्मांमध्येच परिपूर्ण जीवन जगण्याचे, ब्रह्मांडापासून या विश्वापर्यंत असणाऱ्या पंचतत्त्व संतुलनाचे सार दिले आहे. आपण सनातनी आहोत, याचा अभिमान बाळगून आपल्याला हे सर्व संरक्षित करावेच लागेल.
क्रमश:
dr.mahalaxmiwankhedkar @gmail.com