Wednesday, April 23, 2025

सेवाभाव

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, “गुरूचे नाव सांगायला लागू नये. आपल्या वागण्यावरून ते लोकांना ओळखता यावे.” त्यांनी आदर्श शिष्याची लक्षणे सांगितली आहेत. जसे की, कोठेही मान-सन्मान व्हावा, ही अपेक्षा ठेवू नये. कुणाही माणसाचा मत्सर करू नये. आळस टाकून द्यावा. अहंकाराचे विसर्जन करावे. गुरुवचनावर पूर्णपणे श्रद्धा असावी. सद्गुरूबद्दल नितांत प्रेम व सेवाभाव ठेवावा.

ओंजळ – पल्लवी अष्टेकर

खरोखरच या जगात येताना आपण काय घेऊन येतो व काय घेऊन जातो? आपल्या संकटाच्या व अडी-अडचणीच्या काळात आपल्याला देव आठवतो. आयुष्याच्या चढ-उताराच्या काळात आम्ही पती-पत्नी व मुलगा गोंदवले (जिल्हा सातारा), येथे ब्रह्यचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या पवित्र समाधीच्या ठिकाणी पोहोचलो. स्वच्छ परिसर, भक्तांसाठी धर्मशाळा, अन्नछत्र असे आम्हाला गोंदवले येथे दर्शन झाले. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांनी स्थापिलेली थोरला राम व धाकला राम यांची देवळेसुद्धा तेथे आहेत.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या समाधीस्थानी प्रवचनांचे कार्यक्रम होत असतात. आपल्या समाजात अनेक संतांनी लोकोद्धारासाठी जन्म घेतला. समाज प्रबोधन केले. त्यातलेच एक श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज. गोंदवले येथील धर्मशाळेत अनेक भक्तजन आसरा घेतात. तेथील अन्नछत्रात अनेक स्वयंसेवक स्वयंपाक करणे, दुपारी व रात्री तेथे आलेल्या भक्तांना स्वखुशीने जेवण वाढणे अशी कामे करतात. भक्तांना, थकलेल्या-भागलेल्या लोकांसाठी अन्नदान करण्याची महाराजांची इच्छा होती व ती फलद्रूप झाली.

मुंबईत एकदा मी व माझे पती मालाड येथील गोंदवलेकर महाराजांच्या मठात जाण्यासाठी, मालाड येथील स्टेशनजवळ पोहोचलो. तेथे पोहोचल्यावर प्रसाद वाटण्यासाठी, आम्ही केळी विकत घेतली. सहजच माझ्या मनात विचार आला की, स्वत:साठी आपण एक गजरा विकत घ्यावा. मी तिथल्याच शेजारच्या गजरेवाल्याला एका गजऱ्याची किंमत विचारली, तर त्याने एका गजऱ्याची किंमत पन्नास रुपये इतकी सांगितली व त्यापाठोपाठ म्हणाला की, “तुम्हाला महाराजांसाठी गजरे हवे आहेत का?” त्याच्या या प्रश्नाने मी व माझे पती अचंबित झालो. मी म्हटले, “हो, महाराजांसाठीच हवेत. द्या ना.” मग त्याने मोगऱ्याचे सहा गजरे व जाईचे चार गजरे जोडून, वेगवेगळे हार बनविले. त्यांच्यामध्ये सुंदर सोनचाफ्याची फुले गुंफली.

अगदी सहजतेने व प्रेमाने त्याचे हे काम चालले होते. मी त्याचे काम संपल्यावर, “किती पैसे?” असे विचारले, तर त्याने मला पुन्हा “पन्नास रुपये” असे उत्तर दिले. मला खरंच आश्चर्य वाटले. एवढ्या मोठ्या हाराचे त्याला सहज तीनशे-चारशे रुपये मिळवता आले असते; पण त्याने तसे केले नाही. गरिबी असूनही दातृत्वाची एक अविस्मरणीय झलक आम्हाला त्याच्यापाशी पाहायला मिळाली. मी गजरेवाल्याला हात जोडून नमस्कार केला व आम्ही मठात येऊन ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांच्या फोटोपुढे तो हार ठेवला, केळी ठेवली. थोडा वेळ जप केला व घरी परतलो. अजूनही हा प्रसंग आठवला की, मी अंतर्मुख होते व त्या साध्या-सुध्या गजरेवाल्यातील देवत्व पाहते. मन:शांतीची अनुभूती तेव्हा येते.

श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज म्हणायचे, “गुरूचे नाव सांगायला लागू नये. आपल्या वागण्यावरून ते लोकांना ओळखता यावे.” त्यांनी आदर्श शिष्याची लक्षणे सांगितली आहेत. जसे की, कोठेही मान-सन्मान व्हावा, ही अपेक्षा ठेवू नये. कुणाही माणसाचा मत्सर करू नये. आळस संपूर्णपणे टाकून द्यावा. अहंकाराचे विसर्जन करावे. गुरुवचनावर पूर्णपणे श्रद्धा असावी. सद्गुरूबद्दल नितांत प्रेम व सेवाभाव ठेवावा. हृदयात असूयेला तीळभरही थारा नसावा.

परमार्थाबद्दल मनात अत्यंत प्रेम असावे. शिष्याची बुद्धी वेदशास्त्रात पारंगत असूनही वादरहित संवादी अशी असावी.
सेवेमध्ये श्रीमंत व गरीब असा भेदभाव नसतो. याचे अनुभवातले एक उदाहरण. आमच्या परिचयातील गंगा मावशींना दोन मुली. त्यांचा नवरा बांधकामावर मजुरीचे काम करायचा व गंगा मावशीनी सुद्धा धुण्या-भांड्याची कामे करून, आपला संसार सांभाळला होता. प्रपंच चालवायचा म्हणजे असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो. एक ना दोन गंगा मावशीपुढे पाठोपाठ अडचणी उभ्या असायच्या. पैशाला पैसा जोडून, तिने आपल्या दोन्ही मुलींना चांगले शिक्षण दिले. त्यातील एक आता शिक्षिका व एक परिचारिका आहे. गंगा मावशीचे वय व्हायला लागले, आता धुण्या-भांड्याच्या कामातून थोडीशी मोकळीक घेऊया, असे तिला वाटू लागले. चार-सहा ठिकाणी भांडी घासून झिजलेले हात व तब्येतीच्या बारीक-सारीक तक्रारी मानवर काढू लागल्या होत्या. गंगा मावशींचा नवरा बांधकामावरची कामे करून थकला होता. आता आपल्या मुली आपल्या पायावर उभ्या आहेत म्हणून गंगा मावशींच्या नवऱ्याने आपले काम थांबविले, तसे गंगा मावशीदेखील आपली कामे बंद करण्याचा विचार करू लागली; परंतु एके दिवशी तिची आजारी बहीण यमुना देवाघरी गेल्याचा निरोप आला.

यमुनाचे वय जेमतेम चाळीसच्या आसपास असेल. ती त्याच गावात राहत होती. यमुनाच्या सर्व भावंडांनी तिच्या आजारपणात मदतीचा हात दिला होता; पण हा निरोप ऐकताच, गंगा मावशीला खूप वाईट वाटले. तिचा जीव गलबलला. यमुनाच्या तीन मुलींचे आता कसे व्हायचे, अशी चिंता तिला वाटू लागली. गंगा मावशींनी मनाशी एक ठाम निश्चय केला. तो म्हणजे आपल्या भाच्यांकरिता आपण पुन्हा उभे राहायचे. होतील तेवढी कामे करायची, कारण यमुनाच्या घरीही हाता-तोंडावरचे पोट होते. कमावणारा एकटाच यमुनाचा नवरा. त्याच्यावर संपूर्ण कुटुंबाची पोसण्याची जबाबदारी होती. त्यामुळे गंगा मावशीने पुन्हा कंबर कसली व आहे ती धुण्या-भांड्याची कामे तिने सुरू ठेवली. आपली मिळकत तिने आपल्या भाच्यांसाठी, त्यांचा कपडालत्ता, वह्या-पुस्तके, खाऊ यांसाठी वापरायची असे ठरविले.

आता ती हे पैसे भाच्यांसाठी खर्च करत आहे. सुट्टीच्या काळात गंगा मावशी आपल्या भाच्यांना घरी येऊन येते. त्यांची हौसमौज पुरविते. गंगा मावशीच्या मुली या पोरींना समुद्रकिनाऱ्यावर, एखाद्या चित्रपटाला घेऊन जातात. पोरींच्या आयुष्यातील उणीव गंगा मावशी भरून काढण्याचा प्रयत्न करीत होती. पोरींनी स्वावलंबी जीवन जगावे म्हणून त्यांना स्वयंपाक व इतर कामे शिकवित होती. गरिबी असूनही आपल्या भाच्यांना आधार देणारी, त्यांच्यावर भरभरून प्रेम करणारी-धन्य ती गंगा मावशी. अशी सेवाभावी वृत्ती जर समाजात वाढत राहिली, तर नक्कीच सुदृढ निकोप समाजाची निर्मिती दूर नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -