Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाजवाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर

वाडातरचे निसर्गरम्य हनुमान मंदिर

निसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र हनुमान मंदिर आहे. सागरतरंगांवर सूर्यकिरणात तळपणारे मंदिर त्याच्या सभोवतालच्या गर्द हिरव्या वनराईत विलोभनीय दिसते. गर्द वनराईत असणारे हे मंदिर पर्यटकांना मनमुराद आनंद देऊन जाते.

कोकणी बाणा – सतीश पाटणकर

हिंदू धर्मात हनुमानाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. भारतात प्रत्येक गावात आणि शहरात हनुमानाचे मंदिर हे तुम्हाला दिसेल. भक्त मोठ्या श्रद्धेने मंदिरात जाऊन, हनुमानाची मनोभावे पूजा करतात. श्री हनुमान शक्ती, भक्ती व त्याग यांचे प्रतीक मानला जातो. कोकणात प्रत्येक गावाच्या बारा-पाच मर्यादेत म्हणजेच गावराठीत हनुमानाचे एक स्थान असते. त्याची गावच्या देवळातील गावकराला जाणीव ठेवावीच लागते. गावात मारुतीचे मंदिर नसले, तरी या बजरंगाची शक्ती गावात अस्तित्वात असते.

निसर्गरम्य कोकणात देवगडपासून सहा किलोमीटर अंतरावरील वाडा गावात वाडातर ही वाडी आहे. तेथे अगदी समुद्रालगत भराव टाकून, डोंगराच्या पायथ्याशी माडांच्या कुशीत बांधलेले प्रेक्षणीय श्रीक्षेत्र हनुमान मंदिर आहे. मंदिरातील श्री हनुमान मूर्तीची प्राणप्रतिष्ठा गगनगिरी महाराजांच्या हस्ते १९८१ मध्ये करण्यात आली. मंदिराचा २००८ साली जीर्णोद्धार करून, वास्तूची पुनर्बांधणी करण्यात आली. मंदिराचा घुमट उंच व अष्टकोनी आहे. तो सुमारे २० फूट उंच आहे. मारुतीची गदाधारी, पर्वत उचलून घेतलेली व गगनात झेपावणारी साडेतीन फूट उंचीची आकर्षक मूर्ती गाभाऱ्यात आहे, ती पूर्वाभिमुख आहे. मूर्तीसमोर गाभाऱ्याच्या बाहेर खांब असून, त्यावर अष्टकोनी कळस आहे. मंदिरासमोर भव्य पटांगण आहे. सभोवती कठड्याचे बांधकाम केलेले आहे. मंदिरात आतपर्यंत सूर्यकिरण येत असल्याने, सबंध मंदिर तेजोमय भासते. सागरतरंगांवर सूर्यकिरणात तळपणारे मंदिर त्याच्या सभोवतालच्या गर्द हिरव्या वनराईत विलोभनीय दिसते. देवगड व विजयदुर्ग यांच्या मध्यभागी असलेल्या पुलावरून दिसणारा वाडातर मंदिराचा परिसर तेथे येणाऱ्या पर्यटकांना मनमुराद आनंद देऊन जातो.

मंदिरात चैत्र पौर्णिमेपासून चार दिवस श्री हनुमान जयंती उत्सव थाटात साजरा केला जातो. शिमगोत्सवानंतर मुंबईत परतलेले वाडा गावाचे चाकरमानी तितक्याच श्रद्धेने त्या सोहळ्यासाठी सहकुटुंब परत येतात. त्यावेळी किनारपट्टीलगत मंदिर परिसरात कमानी उभारल्या जातात. विद्युत रोषणाई असते. मंदिरात धार्मिक कार्यक्रम असतातच; पण कला, क्रीडा व सांस्कृतिक कार्यक्रम यांचेही आयोजन करण्यात येते. धार्मिक उत्सवामध्ये श्रीजन्मोत्सव, होमहवन, लघुरुद्राभिषेक, ग्रंथवाचन, भजन-प्रवचन, महापूजा, आरती, भंडारा, पालखीची मिरवणूक, अवसर काढणे, नवस बोलणे व फेडणे अशा कार्यक्रमांची रेलचेल असते. चार दिवस वातावरण आनंदी व भक्तिमय असते. त्यामध्ये श्रद्धा व संस्कृती यांच्या मिलाफाची अनुभूती येते. मुंबईकर व ग्रामस्थ मंडळातर्फे काही शैक्षणिक उपक्रम राबवण्याचा संकल्प सोडण्यात आला आहे. त्या दृष्टीने व्यवसाय मार्गदर्शन, मच्छीमारी प्रशिक्षण, मत्स्यशेती, वाचनालय, व्यायामशाळा, संगणक कक्ष व रुग्णवाहिका यांची उपलब्धता करण्याचा मंडळाचा मानस आहे.

(लेखक मुख्यमंत्र्यांचेे माजी माहिती अधिकारी आहेत.)

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -