विशेष – भालचंद्र ठोंबरे
कौरव-पांडवांमध्ये झालेल्या द्युतात कौरवांनी कपटाने पांडवांना हरवल्यामुळे, पांडवांना खेळातील अटीप्रमाणे बारा वर्षं वनवास व एक वर्ष अज्ञातवास पत्करावा लागला. पांडव वनवासात असतानाची ही कथा आहे. पांडव बद्रिकाश्रमात असताना, एक दिवस एक हजार पाकळ्या असलेले कमळाचे फूल उडत उडत, द्रौपदीजवळ आले. ते पाहून द्रौपदीने भीमाजवळ मला अशी आणखी कमल पुष्पे हवीत, अशी इच्छा प्रकट केली. तेव्हा भीम ज्या दिशेकडून ते फूल आले, त्या दिशेकडे फुलाच्या शोधात निघाला. चालता चालता तो गंधमादन नामक पर्वतावर आला. तेव्हा वाटेत एक वृद्ध व जर्जर वानर रस्त्यात झोपलेले व त्याची शेपटी रस्ता अडवून आडवी पडलेली भीमाला आढळून आली.
अशा प्रकारे आपल्या वाटेत एका वृद्ध वानराला पाहून, भीमाने मोठी गर्जना करून, त्यांना वाटेतून दूर होण्यास सांगितले. तेव्हा त्या वृद्ध कपीने डोळे किलकिले करून, भीमाकडे उपेक्षेपूर्ण कटाक्ष टाकून विचारले कोण तू? इकडे कशाला आला आहेस? मी वृद्ध व अशक्त असून या ठिकाणी आराम करीत आहे. मला का उठवलेस? तेव्हा भीमाने आपण कुंती पुत्र भीम असून, महाराज पंडूंचा पुत्र आहे. तसेच वायुपुत्र हनुमंताचा बंधू आहे. मला तुम्हाला ओलांडून जाणे योग्य वाटत नाही म्हणून तुम्हाला जागे करून बाजूला होण्यास व आपली शेपटी रस्त्यातून बाजूला करण्यास सांगत आहे. अन्यथा शेपटीच काय हा पर्वतही एका क्षणात ओलांडून जाण्याची शक्ती माझ्यात आहे. मी महापराक्रमी हनुमानाचा बंधू आहे. “कोण हनुमान?” वृद्ध कपीने विचारले.
राम भक्त हनुमान ज्याने माता सीतेच्या शोधासाठी १०० योजने लांब समुद्र एका उड्डाणात पार केला. मी त्याच हनुमानाचा बंधू असल्याने, तुम्हालाच काय या पर्वतालाही ओलांडून जाणे मला अशक्य नाही; परंतु सर्वांमध्ये ईश्वराचा अंश असल्याचे, मी मानत असल्याने, आपणास ओलांडून जाणे, मला योग्य वाटत नाही म्हणून माझ्या मार्गातून दूर व्हा व मला मार्ग द्या. अन्यथा तुम्हाला ठार करून, मला पुढे जावे लागेल. भीमाचे हे उद्दाम व गर्विष्ठपूर्ण उद्गार ऐकून वृद्ध कपी म्हणाला, ‘‘आपण रागावू नका, मी म्हातारा असल्याने उठू शकत नाही, इतकेच काय माझ्या या वृद्धापणामुळे मला या पुच्छाचाही भार झालेला आहे, मी तेही हलवू शकत नाही, तेव्हा तुम्हीच पुच्छ बाजूला करून पुढे जा.’’ हे ऐकून भीम तुच्छतेचा एक कटाक्ष टाकून, एका हाताने ते पुच्छ बाजूला करू लागला; परंतु एकाच काय दोन्ही हातांनी प्रयत्न करून व जोर लावूनही भीमाला ते शेपूट दूर करता आले नाही.
तेव्हा ही कोणी तरी महान व्यक्ती असावी, हे ओळखून भीमाने त्यांना वंदन करून, आपल्या उद्गाराबद्दल व कटू बोलण्याबद्दल क्षमा मागून परिचय देण्याची विनंती केली. भीमाचे हे पश्चातापाचे उद्गार ऐकून, कपीने आपला परिचय दिला. ते म्हणाले, ‘‘मी स्वतः रामभक्त हनुमान आहे.’’ हे एेकताच भीमाने पुन्हा त्यांना आदरयुक्त वंदन करून, आपल्या कृत्याची क्षमा मागितली व हनुमंताला आपले विराट रूप दाखवण्याची विनंती केली. ते पाहिल्याशिवाय आपण येथून जाणार नसल्याचे स्पष्ट केले. भीमाच्या विनंतीवरून हनुमंताने आपल्या विराट रूपाचे दर्शन दिले. भीमाला आलिंगन देऊन, तू माझा बंधू आहेस, त्यामुळे पुढील येणाऱ्या युद्धात मी तुला सहाय्यभूत कृती करीन, तू करशील त्या युद्ध गर्जनात मी माझा आवाज मिसळवून, त्याला विशाल गर्जनेत रूपांतर करीन. अशा प्रकारचा आशीर्वाद देऊन, हनुमंत अंतर्धान पावले.
तात्पर्य : कोण कोणत्या रूपात आपल्या समोर येईल, हे सांगता येत नाही. त्यामुळे आपल्या सामर्थ्याचा अथवा अन्य कोणत्याही बाबीचा गर्व करू नये.