Wednesday, September 17, 2025

Price Hike : उन्हाळी सुट्टी संपताच शालेय वस्तू महागल्या!

Price Hike : उन्हाळी सुट्टी संपताच शालेय वस्तू महागल्या!

वह्या, पुस्तके, वॉटर बॅगसह खाऊचा डब्ब्याच्या किंमतीत पंधरा टक्क्यांनी वाढ

अलिबाग : विद्यार्थ्यांची उन्हाळी सुट्टी संपून आता शाळेला सुरुवात झाली आहे. दोन दिवसांत शाळा सुरु होणार असल्यामुळे सध्या शालेय वस्तूंच्या खरेदीसाठी पालकांची बाजारात रेलचेल दिसून येत आहे. नवीन पुस्तके, वह्या, वॉटर बॅग आणि खाऊचा डबा मिळणार म्हणून चिमुरड्यांमध्येही उत्साह आहे. मात्र वाढत्या महागाईत शालेय वस्तूंच्या किमतीतही वाढ झाल्याने पालक वर्गातून नाराजी व्यक्त होत आहे.

शालेय वस्तूच्या किमतीत १० ते १५ टक्क्यांनी वाढ

दुकानदार दर्शन शहा यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा शालेय वस्तूंच्या किमती १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली आहे. मात्र, त्याचा खरेदीवर हवा तितका परिणाम दिसत नाही. मुलांचे आवडते रंग आणि कार्टूनच्या वस्तूंना अधिक मागणी आहे. तर येत्या दोन दिवसांत शाळा सुरू होईपर्यंत वस्तूंच्या किमतीत आणखी वाढ होण्याची शक्यता दर्शन शहा यांनी वर्तवली आहे.

पालकांना बसला आर्थिक फटका

पावसाळ्याला सुरुवात झाली असून नागरिकही बाजारात पावसाळापूर्व छत्र्या, मेनकापड, रेनकोट आदी साहित्य खरेदी करताना पाहावयास मिळत आहेत. मात्र, यावर्षी सर्वच वस्तूंच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने पालकांना अधिकचा आर्थिक फटका बसला आहे. त्यासोबत मुलांना लागणाऱ्या शालेय बॅगच्या किमतीत अधिक वाढ दिसत आहे. उत्तम बॅग ३५० रुपयांपर्यंत आहे. मात्र, मुलांच्या आवडीसाठी किमतीत झालेल्या वाढीकडे दुर्लक्ष करीत खरेदी करावी लागतेच असेही पालकांकडून सांगितले जाते.

'असे' आहेत शालेय वस्तूंचे दर

  • कटवही (२०० पानी) : ४२० रुपये डझन
  • फूलसाइज वही (२०० पानी) : ४८० रुपये डझन
  • छत्री : २०० ते ५०० रुपये
  • टिफीन डबा प्लास्टिक : ४० ते १५० रुपये
  • स्टील डबा : १५० ते २५० रुपये
  • वॉटर बॅग : ४० ते १०० रुपये
  • वॉटर बॅग स्टील : २०० ते ४०० रुपये
  • रेनकोट : १०० ते ५०० रुपये
Comments
Add Comment