कधी वणवा
पेटतो उभ्या देहात
तर कधी वादळे
थैमान चालतात…
कधी निश्चल,
निपचित देह मरणासन्न…
कधी दिशाहीन चित्त
कधी असंवेदनशील मन…
तारेवरची कसरत
स्थिर स्थावर होण्यासाठी…
तोल ढळताना दिसतोय…
हळव्या मनाचा
का? कधी? कोणासाठी?
आणि कशासाठी?
तळमळतोय हा जीव…?
अनेक प्रश्नांचा
भडीमार सतत…
निरुत्तर राहतात
सारेच प्रश्न…
घुसमट वाढते
मनाची अधिकच…
अन् मन हलकं..
करण्यासाठी
शोधते ती
किती विश्वासाने
विश्वासाचं नातं…
कधी हवा असतो
विसावण्यासाठी
खांद्याचा आधार …
अनुभवायची असते…
साथ आपलेपणाची…
वाट्याला येतं एकाकीपण…
ती चालत राहते
स्वतःच स्वतःचा
शोध घेण्यासाठी…
दुरदूर क्षितिजा पार…
सापडत नाही
कधीच तिलाही ती…
शोध अपूर्णच राहतो…
अगदी तुझ्या माझ्या
कहानी सारखा…
– स्नेहाराणी गायकवाड, कोपरखैरणे, नवी मुंबई
समई
समईतील ती शुभ्र वात
पसरूनी धुक्याची दुलई
पर्वा ना शुभ्र तमाची
मनी तेवते तव आठवणींची समई..
मन समईची वात मंद तेवते
त्यात मी पण जळते
मन सोने उजळता
मन सावळेची होते..
नयनातील काजळी
उगीच मना दुखविते
कोठूनी तो झरोका
आशा-किरण दाखविते…
दाखविते वाट
मनाच्या अंधारात
अंतरंग ते माझे
उगीच मंद हासते..
त्या किरणातूनी आशा
मजकडे पाहते
निराशलेले मन माझे
क्षणभरी आनंदते…