Wednesday, April 23, 2025
Homeसंपादकीयरविवार मंथनकवितेची उत्कट लय

कवितेची उत्कट लय

मायभाषा: डॉ. वीणा सानेकर

भाषा आणि साहित्य या दोन गोष्टी सारख्या नाहीत पण साहित्य निर्मितीसाठी भाषेचाच आधार लागतो. लेखकाला किंवा कवीला व्यक्त होताना स्वत:च्या भाषेचा शोध घ्यावा लागतो. ती घडवणं, वाकवणं, लवचिक वा प्रसरणशील करणं या सर्वातूनच स्वत:ची भाषा सापडते. ही भाषा आधीच तयार झालेल्या भाषेला धक्का देते. तिच्या बंदिस्त चौकटी मोडून टाकते. संत तुकारामांच्या अभंगात भाषेच्या पातळीवरचा विद्रोह लख्खपणे दिसतो. नामदेव ढसाळ तर प्रस्थापित भाषेला सुरुंगच लावतात.

स्त्रीच्या हाती लेखणी उशिराच आली कारण आमच्या पुरुषप्रधान संस्कृतीला तिची अभिव्यक्ती धोक्याची वाटत होती. तरीही स्त्रियांनी आपले शब्दांचे निखारे धगधगते ठेवले. “ राम म्हनू न्हाई सीतामाईच्या तोलाचा…” असे शब्द ओव्यांतून लिहिणाऱ्या बाईला स्त्रीवाद कुठे ठाऊक होता? ‘‘डोईचा पदर आला खांद्यावरी, भरल्या बाजारी जाईन मी…” असे म्हणण्याचा निर्भयपणा जनाईने दाखवला. ‘मी सुमुक्त झाले आहे’, हे धाडसी शब्द थेरीगाथेत उमटले तेव्हा भिक्षुणींनी पाली भाषेला नवे परिमाण दिले. स्त्रियांनी लिहिलेल्या आत्मकथनांच्या फडफडणाऱ्या पानांतून नवा इतिहास मुखर झाला. हे सारं बोलावेसे वाटण्याचे कारण म्हणजे प्रज्ञा दया पवार यांचा तब्बल दहा वर्षांनंतर वाचकांसमोर आलेला कवितासंग्रह ‘हिल्लोळ हरवून आतबाहेरचा!’ कविता लिहिते म्हणजे मी काय करते? याची स्पष्ट व ठाम जाणीव तिच्या कवितेतून व्यक्त होते.

‘मी तर पाण्यावरही लिहीन वाहत्या’ हे भान यातूनच आले आहे. आपल्या शब्दांना विद्रोहाच्या फांद्या फुटतील, हा कवयित्रीचा विश्वास प्रज्ञाच्या सबंध काव्य प्रवासात सापडतो. जात, धर्म, लिंग यांच्या नावावर होत राहिलेल्या शोषणाच्या परंपरेला नाकारण्याचा ठामपणा आणि एकूणच संस्कृतीची पुनर्मांडणीची अनिवार्यता तिची कविता अधोरेखित करते. जागतिकीकरणानंतरच्या विस्कटलेल्या अवकाशात साहित्याची जागा ही खूप महत्त्वाची आहे नि ती जपावी म्हणून भाषेच्या शोधाची तहान लागलेल्या कवयित्रींमध्ये प्रज्ञा पवार हे नाव आवर्जून घ्यायला हवे. ‘कविता राहू नये शोकेसमध्ये निरुपयोगी’ हे कवयित्रीचे शब्द तिच्या सृजनामागची दृष्टी उलगडतात. स्वत:च्या संवेदनेत समष्टीला सामावून घेण्याची तिची आस व्यक्त करतात.

आपल्या अवतीभवती घडणाऱ्या घटना, या घटनांना सामोरा जाणारा समाज, जगणारी माणसं या सर्वांना कवेत घेऊन या कवयित्रीची कविता नव्वदोत्तर काळाचा अखंड प्रवास करते आहे. ‘अं:तस्था’पासून तिचा प्रवास सुरू होऊन समग्राशी डोळा भिडवत ती व्यापक झाली. प्रज्ञा दया पवार यांच्या शब्दांत सांगायचे तर…

“ कवितेच्या एकमेव फांदीला घट्ट धरून
चालते आहे मी अल्लाद
एखाद्या डोंबाऱ्याच्या मुलीने जसं चालत जावं डगमगणाऱ्या दोरीवरून…
तोल सावरत, जगणं पणाला लावून!’’
कविता ही चार घटका मनोरंजन करण्यासाठी लिहिण्याची गोष्ट नाही, ती जगणं पणाला लावून करण्याची गोष्ट आहे, हे सजग भान असणारे कवी दुर्मीळ आहेत. समाजातील शोषणाचे नानाविध स्तर खरवडून काढण्यासाठी वाचकांच्या मनात सुरुंग पेरण्याची ताकद कवितेत असते. हा विश्वास देणारी भाषा घडवणे खरोखर सोपे नाही.

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

Previous article
Next article
RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -