Wednesday, April 23, 2025
Homeसाप्ताहिककोलाज‘राह निहारू बडी देरसे...’

‘राह निहारू बडी देरसे…’

नॉस्टॅल्जिया – श्रीनिवास बेलसरे

फणी मुझुमदार यांनी दिग्दर्शित केलेला ‘उंचे लोग’ हा १९६५ सालचा सिनेमा! प्रसिद्ध तमिळ नाट्यलेखक के. बालचंदर यांच्या ‘मेजर चंद्रकांत’ या नाटकावर तो आधारित होता. चित्रपटात सुप्रसिद्ध तमिळ अभिनेत्री के. आर. विजया यांच्याबरोबर अशोककुमार, राजकुमार, फिरोजखान, देवेन वर्मा, कन्हैयालाल, तरुण बोस, कुमुद त्रिपाठी यांच्या भूमिका होत्या. चित्रपटाने १३व्या ‘राष्ट्रीय चित्रपट पारितोषिक समारंभात’ सर्वोत्तम हिंदी चित्रपटाचे दुसऱ्या क्रमांकाचे गुणवत्ता प्रमाणपत्र मिळवले.

‘उंचे लोग’ची कथा खरेच उच्च नैतिक मूल्ये पाळणाऱ्या महान पिता-पुत्राची होती. निवृत्त मेजर चंद्रकांत (अशोककुमार) यांची दृष्टी एका युद्धात गेलेली आहे. त्यांची दोन मुले म्हणजे पोलीस इन्स्पेक्टर श्रीकांत (राजकुमार) आणि रजनीकांत (फिरोज खान). मेजर चंद्रकांत यांचे शेजारी गुणीचंद (कन्हैयालाल) त्यांचे चांगले मित्र आहेत. जुन्या प्रथेप्रमाणे त्यांनी गुणीचंद यांची मुलगी पल्लवी हिला रजनीकांतसाठी सून करून घेण्याचे वचन त्यांना दिलेले आहे.

रजनीकांत कॅडेट ट्रेनिंगसाठी चेन्नईला (तत्कालीन मद्रास) गेलेला असताना, विमलाच्या (के. आर. विजया) प्रेमात पडतो. प्रकरण फार पुढे जाऊन, ती गर्भार राहते. पण आपल्या प्रेमप्रकरणाविषयी वडिलांना सांगण्याची हिंमत नसलेला रजनीकांत तिला गर्भपात करायला सांगून, कायमचे सोडून निघून येतो. तिच्या अगतिक अवस्थेत तिने लिहिलेल्या पत्रामुळे ही बातमी मोठ्या भावाला (राजकुमार) कळते. आपल्या वडिलांसारखा तोही उच्च जीवनमूल्ये पाळणारा आहे.
श्रीकांत रजनीकांतवर अतिशय चिडतो आणि त्याला जाब विचारतो. जेव्हा रजनीकांत म्हणतो, “तिच्याकडे आमच्या प्रेमाचा काहीच पुरावा नाही.” तेव्हा राजकुमार चिडून त्याच्या तोंडात मारतो. त्याचा त्यावेळचा संवाद मोठा प्रभावी होता-

“रज्जो, जमीरको सबूतकी जरुरत हमेशा नही पडती.” मोठा भाऊ म्हणून तो रजनीकांतला स्पष्ट ताकीदही देतो की, ‘‘तू एका प्रामाणिक मिलिटरी अधिकाऱ्याचा मुलगा आहेस. तुला असे करणे शोभत नाही. तू त्या मुलीला मानाने घरी घेऊन यायलाच हवे आणि तिच्याशीच लग्न कर.’’ पुढे तो स्वच्छंदी रजनीकांतला धमकीही देतो, ‘तू त्या निरपराध मुलीचा गुन्हा केला आहेस. तिच्याशी लग्न करून, त्याचे प्राय:श्चित्त कर नाही तर मी तिचा सहानुभूतीदार आणि तुझा शत्रू होईन.’’
मात्र रजनीकांतकडून ते प्राय:श्चित्त घडत नाही आणि जनलज्जेची भीती वाटून, बिचारी विमला आत्महत्या करते. ही घटना तिच्या भावाला कळल्यावर, त्याला राग अनावर होऊन, तो रजनीकांतला ठार करतो. खास सिनेमॅटिक योगायोगाने विमलाचा भाऊ (तरुण बोस) अंध मेजर चंद्रकांतच्या आश्रयाला येतो. त्याची कहाणी ऐकल्यावर, मेजरला त्याच्याबद्दल सहानुभूती वाटून, तो त्याला आश्रय देतो. मात्र त्याने बहिणीच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी, ठार केलेली अधम व्यक्ती हा आपलाच मुलगा आहे, हे मेजरना माहीत नसते.

पोलीस इन्स्पेक्टर श्रीकांतपासूनही मेजर त्याचा बचाव करतात. पण शेवटी सगळे सत्य बाहेर पडून, श्रीकांत भावाच्या खुन्याला अटक करताना, वडिलांनाही गुन्हेगारास मदत केल्याच्या आरोपावरून अटक करतो. चित्रपटातील सर्व संवाद अतिशय प्रभावी होते. त्यावेळच्या एकंदर समाजाच्या मानसिकतेप्रमाणे उच्च नैतिक आदर्श सूचित करणारे होते.
‘उंचे लोग’मधली चारही गाणी अतिशय श्रवणीय होती. चित्रगुप्त श्रीवास्तव यांचा भर शास्त्रीय संगीतावर आधारित सांगीतिक मेजवानी देण्यावरच होता. त्यामुळे रफीसाहेबांच्या आवाजातले ‘जाग दिल-ए-दिवाना, ऋत जागी, वस्ल-ए-यारकी’ लतादीदी आणि महेंद्रकपूरच्या स्वरातले ‘हाय रे तेरे चंचल नैनवा, कुछ बात करे रुक जाये’ मन्ना डे आणि आशाताईच्या आवाजात ‘कैसी तुने रीत रची भगवान, पाप करे पापी, भरे पुण्यवान’ या गाण्यांनी रसिकांनी अनेक वर्षं रिझवले.

सिनेमातील एक रोमँटिक गाणे आजही अनेकांच्या ओठावर आहे. विमला आणि रजनीकांतच्या सुरुवातीच्या प्रेमाच्या काळातले हे गीत खूप लोकप्रिय झाले होते. मजरूह सुलतानपुरींच्या शब्दांना चित्रगुप्तांनी अतिशय कर्णमधुर संगीत दिले होते. स्व. लतादीदी आणि स्व. महेंद्रकपूरच्या आवाजातले त्या गाण्याचे शब्द होते की,

आ जा रे मेरे प्यारके राही,
राह निहारू बड़ी देरसे..’

प्रेयसी एका रम्य ठिकाणी, खरे तर संकेतस्थळी, प्रियकराची वाट पाहत उभी आहे, अशी कल्पना! पण जुन्या कवींचे शब्दातील सूक्ष्म अर्थछटेकडे किती बारीक लक्ष असायचे, पाहा! मजरूहजींनी ‘राह देखू’ किंवा ‘राह तकू’ म्हटलेले नाही. ‘राह निहारू’ म्हटले आहे. हा ‘निहारू’ शब्दच मोठा काव्यात्म आहे, रोमँटिक आहे! निहारण्यात ती प्रतीक्षा किती दीर्घ आहे, ते सूचित होते. वाट पाहण्यातली फक्त आतुरताच नाही, तर अगतिकता, ओढ आणि हुरहुरही ‘निहारू’मधून जाणवते. हे वाट पाहणे अगदी शांत आहे, त्यात तक्रार नाही. त्यात फक्त ‘वाट पाहणे’च आहे असे नाही, तर ‘भेटीलागी जीवा लागलीसे आस’मधली आर्तता भरलेली आहे.

ती पुढे म्हणते, मी दिवस-रात्र तुझी वाट पाहते आहे. रोज रात्र होते आणि चंद्र येतो; पण तू आला नाहीस म्हणून माझ्या ओठावर शब्दच येत नाहीत. सकाळ होते, सूर्य उगवतो; पण मला झोपेतून उठावेसेच वाटत नाही. मी कधीची डोळे मिटून, तुझी मूर्ती डोळ्यांसमोर आणून, फक्त वाटच पाहते आहे.
जो चाँद बुलाये, मैं तो नहीं बोलू,
जो सूरज आये, आँख नहीं खोलू,
मुण्डके नैना मैं तिहारी,
राह निहारू बडी देरसे.

मजरूह सुलतानपुरी यांनी या रोमँटिक गाण्यात कमालीचा कल्पनाविलास साधला होता. त्यांनी चितारलेला प्रियकर म्हणतो की, “तू कुठे आहेस ते मला तुझ्यासह येणाऱ्या सुवासानेच कळते! मला तुझ्या केसांशी खेळायचे आहे. त्या स्पर्शाने मला आकाशातल्या रंगीबेरंगी छटांशी खेळल्याचा आनंद मिळतो. तुझ्या सुंदर रूपाचा मी तर पूजारीच झालो आहे. कधीपासून तुझ्या येण्याची वाट पाहतो आहे.
कहा है बता दे तनकी खुशबुसे,
घटासे मैं खेलु जुल्फ़ तेरी छु के.
रूपका तेरे मैं पुजारी,
राह निहारू बड़ी देरसे..
आजा रे मेरे प्यारके राही…

प्रेम उभयपक्षी यशस्वी असल्याने, दोघेही परस्परांच्या प्रेमात आकंठ बुडालेले आहेत. मग ती म्हणते की, “मी कुठेही असले तरी तुझीच आहे. मी जणू तुझी सावली बनले आहे.’’ मात्र त्याला एवढ्यात समाधान नाही. तो म्हणतो, “मी तुझ्या भेटीसाठी इतका आसुसलो आहे की, तुझे प्रेम प्राप्त करूनही, मला समाधान वाटतच नाही. असे वाटते तू अजून मला मिळालेलीच नाहीयेस.”

“कही भी रहूंगी, मैं हूँ तेरी छाया.
तुझे मैंने पाके फिर भी नहीं पाया.”
तिचे उत्तर आहे मी तर तुझ्या प्रेमाची शिकारच झाले आहे. किती उत्कंठेने तुझ्या वाटेकडे डोळे लावून
बसले आहे.

आता कुठे असले उंचे लोग, त्यांच्या उंची कथा आणि वेगळ्याच उंचीवर वाजत राहणारी, वर्षानुवर्षे रसिकांच्या मनावर राज्य करणारी ती कर्णमधुर गाणी!

Get latest Marathi News, Maharashtra News and Latest Mumbai News from Politics, Sports, Entertainment, Business and local news from Mumbai and All cities of Maharashtra

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

- Advertisment -