मनस्विनी – पूर्णिमा शिंदे
माणसाच्या आयुष्यात अनेक प्रकारची परिस्थिती उपलब्ध होते. कधी कधी तर नको त्या संकटांना सामोरे जावे लागते. अशावेळी माणसाने आपले मानसिक संतुलन ढळू न देता, अतिशय शिताफीने हाताळणे
गरजेचे आहे.
मानसिक संतुलन बिघडण्याची कारणे अनेक असतात. भावनिक जडणघडण, परिस्थिती कौटुंबिक संबंध, आर्थिक, मानसिक, समस्या, वैचारिक आंदोलन किंवा सामाजिक घटनांचा वैयक्तिक आयुष्यावर होणारा परिणाम. आपल्या आजूबाजूला दैनंदिन घडणाऱ्या घटना यामुळे मनुष्य एक तर संवेदनशील, हळवा होतोच… पण यातून बाहेर पडण्यासाठी मोठे धाडस हवे. आपल्या संवेदनशील मनाच्या कप्प्यामध्ये आपण कोणते विचार करत होतो. एक तर नकारात्मकतेचे झाड किंवा सकारात्मकतेचा तुम्ही ज्या झाडाला जितकं खतपाणी घालाल तितकंच ते फोपावेल. अशा परिस्थितीतसुद्धा आपल्या मनाला जर ध्येय निश्चितीकडे न्यायचं असेल, तर सावरलं पाहिजे आणि ते कसे सावरावे? उदा. नोकरी नाही. स्थैर्य नाही. आपण जेथे राहतो ते घर, आपली माणसं, आपली नोकरी या सगळ्या ठिकाणी अस्थिरता. आर्थिक चणचण यावर छोटा मोठा उद्योग किंवा अर्थार्जनाचा एखादा उपाय शोधून काढावा. छंद जोपासावा, सत्कर्म करावी. बिघडलेले नातेसंबंध कोणी चार पावलं मागे येत असेल, तर आपण दोन पावले मागे यावं. कारण जीवनात तडजोड अत्यंत महत्त्वाची असते आणि ही जर केली तर आपलंच भलं होईल.
हे वेळीच समजण्यासाठी अहंकार, गैरसमज, आत्मविश्वास आणि व्यसन बाजूला ठेवले पाहिजेत. माणसाने माणसाशी माणसाप्रमाणे वागलं पाहिजे. समोरच्याच्या जागी स्वतःला उभे करून विचार केला पाहिजे. मनावर काही कंगोरे नकळत उमटले जातात. कधी अतिविचार करणे या वाहत्या जखमाची सल. आपलीच लढाई आपल्याला कमकुवत करू शकते. तेव्हा ती हाताळण्यासाठी चांगल्या पद्धतीने जिंकू शकतो मानसिक संतुलन राखून. व्यक्तिमत्त्व विकासाची एक जमेची बाजू म्हणजे मानसिकता. आपापल्या स्वभावानुसार आणि परिस्थितीनुसार आपण आपल्या मनावर नियंत्रण ठेवू शकतो. मनावरच ओझं हलकं करण्यासाठी चिंता, भीती, दबाव, दडपण झटकून टाका. विचार कृतीत आणा. अपेक्षा ठेवू नका. खंबीर राहा. स्वावलंबी बना.
परावलंबित व जुगारा आनंदी होण्याचे मार्ग स्नेह आदराबरोबर काळजी जाणीव भूतदया मनी असू द्या. रोजच्या दिनचर्येत बदल करा. पूजा, प्रार्थना, भक्ती, संगीत, प्रवास, सेवा, खेळ, हास्य यांना प्राधान्य द्या. ध्यान, योगा, वाचन, अनुभव, प्रेरणांमुळे आपले मानसिक संतुलन अधिक चांगल्या पद्धतीने राखू शकतो. तुझे आहे तुझपाशी तरी जागा भुललासी. मनाच्या गुंत्याला सोडवायचं असेल तर एकाग्र, ध्यानस्थ होणं अत्यंत महत्त्वाचं. दैनंदिन जीवनात उद्भवणाऱ्या समस्या, अपेक्षा, गरजा कमी केल्या तरी बऱ्याच गोष्टी सहज होतात. नाही तर आहेच रात्रंदिन आम्हा युद्धाचा प्रसंग! अशा या मनाला आवरण्यासाठी लगाम घालावेत. षडरिपूंचा त्याग करावा. जीवनाची गोडी अविट आहे. जीवन सुंदर आहे. त्याचा अनुभव शरीर आणि मन सुदृढ निकोप बलशाली असेल, तरच खरा जीवनाचा आनंद प्रेरणादायी ठरेल आणि हे सगळं मानसिक संतुलनावरच अवलंबून आहे.