संवाद – गुरुनाथ तेंडुलकर
लहानपणी ऐकलेली एक गोष्ट. पावसाळ्याचे दिवस होते. आषाढ महिना सुरू झाला होता. हत्तीच्या सोंडेसारखा मुसळधार पाऊस अहोरात्र कोसळत होता. महिनाभरापूर्वी आकाशाकड डोळे लावून पाऊस केव्हा पडेल याची वाट पाहणारा प्रत्येकजण आता हा पाऊस केव्हा थांबेल या चिंतेत पुन्हा एकदा आकाशाकडे डोळे लावून बसला होता. पण पाऊस मात्र कोसळतच होता. एका क्षणाचीही उसंत न घेता…
गावाजवळची नदी दुथडी भरून वाहू लागली. हां हां म्हणता नदीच्या पाण्यानं धोक्याची पातळी ओलांडली आणि आता कोणत्याही क्षणी गावात पाणी शिरायला सुरुवात होईल या भीतीनं गावकऱ्यांनी किडूक मिडूक गोळा करून गाव सोडण्याचा निर्णय घेतला. घराघरांतून आपापल्या सामानांची बांधाबुंध करण्यात आली. गावकरी आणि त्यांचं सामान हलवण्यासाठी सरकारतर्फे बसगाड्या आणि ट्रक आले. एक एक करून सगळी कुटुंबं गावाबाहेर काढण्यात आली. अगदी गुरं-ढोरं, शेळ्या-मेंढ्या एवढंच काय तर कोंबड्या देखील सुरक्षित जागी उंचावर हलवल्या गेल्या पण…
पण… पण त्या गावातल्या देवळात राहणाऱ्या पुजाऱ्यानं मात्र गाव सोडून अन्यत्र जायला साफ नकार दिला. परमेश्वरावर नितांत श्रद्धा बाळगणाऱ्या त्या पुजाऱ्याला गावकऱ्यांनी परोपरीनं समजावलं.
‘पुजारीबाबा चला. पुराचं पाणी गावात शिरायला लागलंय. येताय ना?’
‘काहीही झालं तरी मी देवळातून बाहेर पडणार नाही.’ ठाम स्वरात पुजारी उत्तरला. ‘माझा भगवंत मला नक्की तारील. माझी श्रद्धा आहे त्याच्यावर.’
‘अहो पुजारी बाबा, श्रद्धा तर आमचीसुद्धा आहे पण आता आभाळच फाटलंय तर आपण तरी काय करणार?’ गावच्या पाटलांनी समजावण्याचा प्रयत्न केला.
‘चला सरकारनं ट्रक पाठवलेत… गावाबाहेर सुखरूप जागी जाऊया.’ आणखी एका वृद्ध गावकऱ्यानं सल्ला दिला.
‘हो नं पाऊस थांबला, पुराचं पाणी ओसरलं की पुन्हा परत यायचंच आहे की…’ एक प्रेमळ म्हातारी पुजाऱ्याला पटवून देण्याचा प्रयत्न करीत म्हणाली.
सर्व गावकऱ्यांनी परोपरीनं समजावलं पण त्या पुजाऱ्यानं आपला हेका सोडला नाही. तुम्ही हवं तर जा. पण मी मात्र देऊळ सोडून कुठंही जाणार नाही. माझी काळजी भगवंताला आहे.
शेवटी गावकऱ्यांचा नाईलाज झाला. परोपरीनं समजावूनही तो पुजारी बधला नाही. एक एक करून बहुतेक सर्व गावकऱ्यांनी गाव सोडलं. पाऊस कोसळतच होता. पुजारी परमेश्वरावर भार टाकून देवळात बसूनच राहिला. श्रीकृष्णाच्या अंगठ्याला स्पर्श होता क्षणीच यमुनेचा पूर ओसरल्याची कथा त्याच्या मनात पक्की होती…
पाऊस न थांबता कोसळतच होता आणि अखेरीस धरणाची भिंत कोसळली. पुराच्या पाण्याचा लोंढा गावात शिरला तसा देवळातही. पुजाऱ्यानं परमेश्वराचा धावा करून एका थोड्याशा उंच जागी आश्रय घेतला आणि तेवढ्यातच त्यांना शिट्टी ऐकू आली.
सरकारनं उर्वरित पूरग्रस्तांच्या सुटकेसाठी होड्या पाठवल्या होत्या. गावातली उरली-सुरली माणसं आपापलं सामान घेऊन त्या होड्यांमध्ये बसून गावाबाहेर सुरक्षित जागी रवाना होत होती.
होडीतली माणसं पुजाऱ्याला जाता जाता म्हणाली,
‘बाबा, चला. सरकारनं होड्या पाठवल्याहेत…!’
‘तुम्ही जा. मी येणार नाही. माझी चिंता परमेश्वराला.’ पुजारी अधिकच
ठामपणे म्हणाला.
सरकारने पाठवलेल्या होड्यांमध्ये बसून गावकरी निघून गेले… पाऊस कोसळतच होता. पुराचं पाणी
वाढतच होतं.
थोड्या वेळानं पुजाऱ्याला कसलीशी घरघर ऐकू आली. सरकारनं हेलिकॉप्टर पाठवलं होतं. त्या हेलिकॉप्टरमधून दोरीची शिडी खाली लोबकळत होती आणि त्यातील अधिकारी भोंग्यावरून ओरडून सांगत होते, ‘पुजारीबाबा चला. शिडीला धरून वर या.’
पुजारीबाबा हसले आणि नकारार्थी मान हलवीत म्हणाले, ‘तुमच्या मदतीबद्दल मी आभारी आहे पण मी येणार नाही. माझी चिंता करणारा माझा देव मला नक्की तारील.’ नाईलाजाने हेलिकॉप्टर भिरभिरत दूर निघून गेलं. पाऊस कोसळतच होता. पाणी वाढतच होतं आणि अचानक पाण्याचा एक मोठा लोंढा देवळात घुसला. काय होतंय हे समजण्यापूर्वीच पुजारी त्या लोंढ्याबरोबर वाहून गेला. बुडाला. मेला.
मेलेल्या पुजाऱ्याचा आत्मा स्वर्गातल्या परमेश्वरासमोर जाब विचारायला उभा राहिला. म्हणाला, ‘देवा, मी तुझ्यावर एवढा विश्वास टाकला. तुझ्यावर एवढी नितांत श्रद्धा ठेवूनही तू मात्र मला वाचवलंस नाही.
देव खो खो हसून म्हणाला,
‘अरे वेड्या, तुला वाचवण्यासाठी मी काहीच केलं नाही असं तू म्हणतोस. पण तुलाच नव्हे तर सर्व गावकऱ्यांना वाचवण्यासाठी मी ट्रक पाठवले, होड्या पाठवल्या, हेलिकॉप्टरसुद्धा पाठवलं. एकदा नव्हे तर तीन तीनदा मदत पाठवूनही तू ती मदत नाकारलीस त्याला मी तरी काय करणार…?’
माझ्या वडिलांनी मला ही लहानपणी कथा सांगितली होती.
पण आजही जरा डोळसपणे आजूबाजूला नजर फिरवली तर केवळ देवाच्या भरवशावर राहून ‘बुडालेले’ अनेक पुजारीबाबा आपल्याला आढळतील. फक्त त्या पुजाऱ्यांचे चेहरे आणि त्यांनी ज्यांच्यावर भरवसा ठेवलाय त्या देवांची रूपं थोडीफार बदलतात.
एखादा विद्यार्थी ‘जातीच्या जोरा’वर आपल्याला मेडिकलला किंवा इंजिनीअरिंगला अॅडमिशन मिळेल म्हणून अभ्यास न करता निर्धास्त असतो.
तर एखादा व्ही.आर.एस. घेतलेला मध्यमवयीन गृहस्थ ‘व्याजावर भागेल.’ असं म्हणून निष्क्रिय राहतो.
तर कुठं एखादी गृहिणी ‘बुवा-बापूच्या अंगाऱ्याने बरं वाटेल’ असं म्हणून जीवावरचं दुखणं अंगावर काढते… आणि परिणामी…? पदरी केवळ निराशाच येते.
देव स्वतः धावून मदत करायला आल्याची उदाहरणं फक्त ‘पौराणिक कथांतून’ आणि अलीकडे देवाचे अवतार म्हणून मिरवणाऱ्या तथाकथित भोंदू बुवा-बापूंच्या ‘चमत्काराच्या पोथ्यांतून’
वाचायला मिळतात…
देव कुणालाही काहीही फुकाफुकी देत नाही. त्यासाठी शारीरिक आणि बौद्धिक परिश्रम करावे लागतात. इंग्रजीत एक म्हण आहे.
God helps him, who helps himself.
जो स्वतःची मदत करतो, त्यालाच देव मदत करतो.
केवळ ‘असेल माझा हरी…’ असं म्हणून खाटेवर निष्क्रिय बसून राहणाऱ्याला काहीही साध्य होत नाही हे ठाऊक असून देखील अनेक माणसं ‘देवाच्या भरवशावर’ बसून राहतात. या कृतिशून्य आणि विचारशून्यतेमुळे पूर्वीपासून आपल्या देशाचं फार मोठं नुकसान होत आलंय. सोरटीच्या सोमनाथाच्या मंदिरावर गझनीच्या महंमदानं हल्ला केला त्यावेळी शंभू तिसरा डोळा उघडेल, शत्रूचं भस्म करून आम्हाला वाचवेल, अशा भ्रमात तिथले नागरिक राहिले आणि परिणामी…?
सोरटीच्या सोमनाथाच्या स्फटिकाच्या लिंगावर गझनीच्या महंमदानं घणाचे घाव घातले. स्फटिकाचं शिवलिंग छिन्नभिन्न केलं. ‘देवाला काळजी’ असं म्हणून गाफिल राहिलेल्या हिंदूंची मुसलमानांच्या आक्रमक सैन्यानं बेगुमान कत्तल केली, हिंदू स्त्रियांवर बलात्कार केले, कुमारिका भ्रष्ट केल्या. पिढ्यानपिढया जपलेली-जमवलेली मालमत्ता उद्ध्वस्त केली, संपत्ती लुटली आणि धान्याची कोठारं जाळून राखरांगोळी केली. हजारो ग्रंथ आगीच्या भक्षस्थानी पडले. संस्कृतीची धूळधांड झाली. पण भक्तांचा ‘शंभू’ मात्र धावून आलाच नाही. येणार कुठून?
जो शंभू देवळात कधी नव्हताच तो बिचारा येणार तरी कसा ?
देव देवळात नसतोच मुळी. तो असतो माणसाच्या मनात. किंबहुना देव ही संकल्पना माणसानंच निर्माण केलीये. ही संकल्पना योग्य प्रमाणात, योग्य जागी वापरली तर माणसाचं मनोधैर्य वाढतं. मनोबल वाढल्यामुळे अशक्य भासणाऱ्या अनेक अवघड गोष्टी सहज शक्य होतात. तसंच देवाचं अस्तित्व मान्य केल्यामुळे वाईट कर्म करण्यापासून माणूस काही प्रमाणात परावृत्त होतो. पाप लागेल या भीतीमुळे थोडीफार सामाजिक शिस्त लागते.
पण तरीदेखील देव ही केवळ माणसाच्या मनातून निर्माण झालेली एक संकल्पनाच आहे. या संकल्पनेवर अति विश्वास ठेवला तर मन आणि बुद्धी दोन्ही बधीर होतात.
भारतीय घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘मूकनायक’मधला एक उतारा ‘उन्नतीचा मूलमंत्र’ दहावीच्या पुस्तकात सामाविष्ट केलेला आहे. सभोवतालच्या जगात प्रगतीची धडपड चाललेली असताना आपला हिंदुस्थान त्याला अपवाद ठरत आहे हे शल्य बाबासाहेबांना टोचत होतं. धर्मभोळेपणाचं कातडं पांघरून निद्रावश राहाणं आत्मघातकीपणाचं असल्याचं सांगून बाबासाहेब म्हणतात,
‘कुणी आपला उद्धार करील असा अंधविश्वास बाळगू नका. मिळालेल्या संधीचा फायदा घ्या. परिस्थितीशी झगडा करून आपला उद्धार आपणच करून घ्यायला हवा.’
कोणत्याही समस्येकडे डोळसपणे पाहिलं आणि ती समस्या बुद्धीच्या निकषावर घासून विचार केला की, त्या समस्येचं समाधानकारक उत्तर सापडलं. कोणत्याही क्षेत्रात विचारांना विवेकपूर्ण कृतीची जोड दिली की यश हमखास मिळतं.
यश मिळविण्यासाठी हवा असतो फक्त योग्य दिशेनं केलेला विचार आणि विचारपूर्वक आचार… असा विचार आणि आचार करणाऱ्यालाच देव मदत करतो, देव कुणाला मदत करतो हे सांगताना एक सुभाषितकार म्हणतात…
उद्यमं साहसं धैर्यं बुद्धी शक्ती पराक्रमः।
षडेश जेथ वर्तंते तत्र देव सहाय्य कृत ।।
अर्थ : उद्योग, साहस, धैर्य, बुद्धी, शक्ती आणि पराक्रम हे सहा गुण ज्या माणसाच्या अंगी असतात त्यालाच देव सहाय्य करतो.
गाडगेबाबादेखील त्यांच्या कीर्तनातून श्रोत्यांना अशाच प्रकारचं प्रबोधन करीत असत.
गाडगेबाबा म्हणायचे, ‘अरे सत्यनारायणाच्या पोथीत लिहिलंय की प्रसाद न खाता गेला म्हणून त्या साधूवाण्याची नौका बुडाली. नंतर पुन्हा सत्यनारायणाची पूजा करून प्रसाद खाल्यानंतर त्याची बुडालेली नौका पुन्हा परत वर आल्याची कथा आहे. ही कथा साफ खोटी आहे. अशा प्रकारच्या कथांवर विश्वास ठेवू नका. सत्यनारायणाची पूजा करून काय होणार आहे?
आमच्या कित्तेक बोटी समुद्रात बुडाल्या आहेत. समुद्रकिनारी सत्यनारायणाची पूजा बांधून त्या बुडालेल्या बोटी वर आणता येतील का?
गाडगे महाराजांच्या या प्रश्नाचं उत्तर सत्यनारायणाची पोथी वाचणाऱ्या कुणाही भटजीला देता आलं नव्हतं.